– दिगंबर शिंदे

मिरजेच्या तांदूळ मार्केटमध्ये दुकान आणि निवास एकत्रच असल्याने दुकानमालक वेळ संपली तरी दुकानाबाहेर उभा होता. इतक्यात दबकत दबकत एक जण आला आणि म्हणाला, ‘‘अण्णा, थोडा माल देता का?’’ त्याचं आर्जवयुक्त मागणं असल्याने दुकानदार म्हणाला, ‘‘वेळ संपली आहे, मात्र काय हवंय ते एकदाच सांग.’’ ‘‘जास्तीच काय नगं. फकस्त पाच किलो जुंधळं.’’ दुकानदाराने वजन करून ज्वारी दिली. ज्वारीचे दीडशे रुपये झाल्याचं सांगितलं. त्यानं दोनशे रुपयांची नोट दिली आणि म्हणाला, ‘‘अण्णा, अजून दोन जिन्नस देता का?’’ त्रासलेला दुकानदार त्रागा करीत म्हणाला, ‘‘एकदाच सांगायचं होतंस. काय हवं ते लवकर बोल, नाही तर तुझ्याकडून मिळायचे दहा अन् पालिकेचा दंड व्हायचा शंभर रुपये.’’ ‘‘फकस्त पावशेर रवा अन् पावशेर गूळ पायजेल.’’ मला राहावलं नाही, विचारलं तर मन आणि विचार सुन्न करणारं कानी पडलं. टाळेबंदी लागू झाल्यापासून रोजगाराचे तीनतेरा झालेलं. आज दुपारपासनं एक दिवसाचा रोजगार मिळाला तो दोनशे रुपये.

‘‘यातच पाच किलो जुंधळं आणि गरा व गूळ पावशेर घेतलं ते वटपुनवला सात जन्माचं ह्योच नवरा पाहिजे म्हणून उपास करणाऱ्या सावित्रीच्या मुखात काय तरी गोडधोड मिळावं म्हणून.’’ अशा कैक कहाण्या या करोनासंकटात मूक झाल्या असतील. आता पाचव्या टप्प्यात काही सवलती मिळाल्या. कामधंदा सुरू करण्यास परवानगी मिळाली; पण या करोनाच्या संसर्गाचे चटके किती तरी कुटुंबांना बसले. या चटक्यांची जाणीव धोरणकर्त्यांना होईलच असे नाही. रेशनवर धान्य मिळते, पण रेशनकार्डाचा पत्ता नाही. पहिल्या टाळेबंदीत कुणी किट आणून देत होतं, कुणी विचारपूस करीत होतं. मात्र आता बऱ्यापैकी व्यवहार सुरू झाल्याने कोणी विचारपूस करायलाही येत नाही.

२२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्लामपूरला एकाच कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आणि एका आठवडय़ात चाराचे पंचवीस झाले. त्या वेळी शेजारच्या सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्य़ांत ‘करोना म्हणजे काय रं भाऊ’ अशी स्थिती होती. यावरून राजकीय पातळीवरही आरोप झाले. पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्तक्षेपामुळेच बाधितांची तपासणी न करता करोनाबाधित इस्लामपूरला आल्याची बतावणीही झाली. तर कोणी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याचे पाप म्हणून करोनाबाधितांचा आकडा पावशतकी झाला. मात्र काहीही असले तरी जिल्ह्याच्या दृष्टीने ही इष्टापत्तीच ठरली. यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले. आरोग्य विभागाने संकट हीच संधी समजून उपाययोजना सुरू केल्या. संसर्ग रोखण्यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी पोलीस दलाच्या मदतीने केली. शहरातून येणाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी गाव पातळीवर समिती स्थापन करण्यात आल्या. आगंतुकांवर आरोग्य विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. आशा कर्मचारी, परिचारिका यांच्या माध्यमांतून दिवसातून तीन वेळा तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. अलगीकरणातील व्यक्तींचा इतरांशी संपर्क येणार नाही याची दक्षता गाव पातळीवरील समितीला घेण्यास सांगितली. जिल्हा प्रवेश असलेल्या ३२ ठिकाणी तपासणी नाके बसविण्यात आले. रात्रंदिवस या नाक्यांवर पोलिसांबरोबरच आरोग्य पथक तैनात करण्यात आले. यामुळे बाधित झालेले आणि बाधित होण्याचा संभव असलेल्या व्यक्ती आपोआपच आरोग्य विभागाच्या हाती लागल्या. दुसऱ्या बाजूला बाधित व्यक्तींवर चांगल्या पद्धतीचे उपचार होतील याची दक्षता घेण्यात आली. यामुळेच आज करोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या पावणेदोन शतकापर्यंत रोखण्यात यश मिळाले.

उपचार सुरू असताना सात जणांचा मृत्यू झाला असला तरी करोनावर मात करणाऱ्यांची संख्याही नव्वदीत पोहोचली आहे. आजच्या घडीला कोविड रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ६८ असून करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. हे जिल्हा प्रशासनाचे यशच मानले पाहिजे, कारण याच कालावधीत सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांत करोनाबाधितांची संख्या वाढत गेली.

टाळेबंदीचा पाचवा टप्पा सध्या सुरू आहे. शाळा, महाविद्यालये कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. जिल्हाबंदीही अद्याप कायम आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे पैशाची चणचण तर आहेच. करोनाने जिल्ह्य़ाचे अर्थकारणच थंडावले आहे. एकीकडे करोनाशी युद्ध सुरू असतानाच पुन्हा एकदा गतसालच्या आठवणी गाठीशी घेऊन महापुराची धास्ती असताना खरिपाचा पेरा करण्याच्या तयारीत आज बळीराजा आहे.