04 August 2020

News Flash

Coronology: विषाणूवर मात करणारा मालेगाव पॅटर्न

सामूहिक प्रयत्नांमुळे एप्रिलमध्ये २.२ दिवसांवर असणारा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता ४९ दिवसांवर पोहचला

– अनिकेत साठे

मालेगावात करोनाचे पहिल्यांदा पाच रुग्ण आढळल्यानंतर घरोघरी सर्वेक्षण, लक्षणे वा तत्सम माहिती देखील मिळत नव्हती. सर्वेक्षण करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविकांना कमालीचा विरोध झाला. संशयित रुग्ण स्वत:हून पुढे येत नव्हते. दाट लोकवस्तीच्या मालेगावात करोनाचा उद्रेक होण्यामागे जागरुकतेचा अभाव मुख्य अडसर ठरला. रुग्णांबरोबर मृतांचाही आकडा वाढू लागला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असतांना प्रशासकीय यंत्रणांनी अथक परिश्रम घेऊन हे चित्र बदलले. पोलिसांनी ऊर्दू भाषेत संवादाचा सेतू बांधला. लोकप्रतिनिधी, धर्मगुरूंना सोबत घेतले. स्थानिकांना आजाराचे गांभिर्य लक्षात आणून दिले. रमजान पर्वात गर्दीमुळे प्रसार वाढणार नाही, याची दक्षता घेतली गेली. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग, महापालिका यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे एप्रिलमध्ये २.२ दिवसांवर असणारा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता ४९ दिवसांवर पोहचला आहे. तपासणी, उपचाराला गती दिल्याने करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

वाढत्या रुग्णांमुळे मालेगावमध्ये एक ते दीड महिना करोनाचा चढता राहणारा आलेख आता उतरणीला लागला आहे. मालेगाव शहरात करोनाचे आतापर्यंत ७७९ रुग्ण आढळले असून यातील ६११ पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. तर ५५ जणांचा मृत्यू झाला. सध्या ११३ रुग्ण उपचार घेत आहेत. करोनाच्या विळख्यात सापडलेली राज्यातील इतर शहरे आणि मालेगाव यांच्यात कमालीचा फरक आहे. अतिशय कमी जागेत वसलेली १० लाख लोकसंख्या. दाटीवाटीची घरे अन् लहान गल्ली-बोळा. अंतर्गत रस्ते दिवस-रात्र ओसंडून वाहतात. अस्वच्छता, वातावरणात भरलेली दुर्गंधी. शिक्षितांचे प्रमाण कमीच. यंत्रमाग व्यवसायावर शहराचे अर्थकारण फिरते. चार ते पाच लाख लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यावर अवलंबून आहेत. दुर्बल आर्थिक स्तर. मालेगावात करोनाचा विळखा घट्ट होण्यास अनेक घटकांनी हातभार लावला. त्यात समाज माध्यमांवरील अपप्रचाराने भर घातली. स्थानिकांना करोनाची प्रचंड भीती बसली. त्याचा प्रादुर्भाव झाला म्हणजे सर्व संपलेच, अशी मानसिकता बळावली. धास्तीपोटी लक्षणे असूनही कित्येकांनी रुग्णालयात जाणे टाळले. कोणी आरोग्य सर्वेक्षणातील माहिती संकलनाचा एनआरसी कायद्याशी संबंध जोडला. यामुळे घराघरात सर्वेक्षण करणाऱ्यांना काही भागातून पिटाळण्यात आले. नमुने द्यायला कोणी तयार होत नसे. सामाजिक अंतरासह अन्य नियमांकडे डोळेझाक झाली. याची परिणती एप्रिलमध्ये मालेगाव करोनाचे केंद्रबिंदू ठरले. अत्यवस्थ झाल्यानंतर रुग्ण येत असल्याने त्यांना वाचविणे अवघड बनले. दुसरीकडे अन्य आजारांचे रुग्ण भरडले गेले. बहुसंख्य खासगी दवाखाने बंद असल्याने गर्भवतींसह अन्य रुग्णांना उपचार मिळणे जिकिरीचे ठरले. कित्येकांना उपचाराविना प्राण गमवावे लागले.

ही कठीण परिस्थिती हाताळताना शासकीय यंत्रणांचा कस लागला. काही अधिकारी तडकाफडकी बदलले गेले. नव्या दमाचे अधिकारी मैदानात उतरले. मालेगावच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला. स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया गतिमान झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, नगरसेवकांना विश्वासात घेऊन जनजागृतीवर लक्ष केंद्रित केले. रुग्णांचे अहवाल लवकर मिळत नसल्याने अडचणींना तोंड द्यावे लागत होते. यावर नाशिक येथे नवीन प्रयोगशाळा तर धुळे, पुणे, नागपूरच्या प्रयोगशाळेपर्यंत अहवाल पाठविण्याची कसरत करावी लागली. करोना रुग्णालय, आवश्यक त्या वैद्यकीय सामग्रीची उपलब्धता करत रुग्ण तपासणीला गती देण्यात आली. रुग्णांवर यशस्वी उपचार होऊ लागले. लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांच्या प्राथमिक तपासणीसाठी ‘डिजिटल एक्स रे’चा पर्याय निवडला गेला. या प्रणालीत ऑनलाइन तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत निदान होऊन उपचाराला दिशा मिळाली. लवकर उपचार घेतल्यास करोनावर मात करता येते, हा विश्वास निर्माण करण्यात प्रशासनास यश आले.
कारवाईचा बडगा दाखवल्याने बंद असणारी खासगी रुग्णालये सुरू झाली. शासकीय, महापालिकेच्या रुग्णांवरील ताण कमी झाला. अपुरे मनुष्यबळ, साधनांनी आरोग्य विभाग लढाईत उतरला. व्यवस्थेत काही त्रुटी आहेत. पण उपलब्ध आयुधांनी लढाई निर्णायक टप्प्यावर नेण्यात आली. महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, १५० पोलीस अशा अनेकांना प्रादुर्भाव होऊनही लढाई अव्याहतपणे सुरू आहे.

रमजान काळात करोनाच्या प्रसाराचा धोका होता. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. अनेकांना प्रादुर्भाव होऊनही पोलीस दल हिंमतीने उभे राहिले. खुद्द ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी ४५ दिवस मालेगावात मुक्काम ठोकला. टाळेबंदीत ६०० मस्जिदींमध्ये शुक्रवारचे सामूहिक नमाज पठण झाले नाही. रमजान ईदच्या दिवशी इदगाह मैदानावर दीड लाखाची गर्दी जमते. यंदा तिथे एकही व्यक्ती आली नाही. ‘शब्ब ए बारात’च्या दिवशी बडा कब्रस्तानमध्ये होणारी तीन लाखाची गर्दी रोखण्यात आली. करोनाचा प्रसार रोखण्यात ग्रामीण पोलिसांचे नियोजन महत्वाचे ठरले. सामूहिक प्रयत्नांची फलश्रृती करोनावर नियंत्रण मिळविण्यात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:17 am

Web Title: coronology malegaon pattern to control corona virus
Next Stories
1 Coronology: सोलापूरचे दुखणे
2 BLOG: पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह आणि घबराट
3 Blog : करोना पॉझिटिव्ह वॉर्डात जगलो…
Just Now!
X