– अविनाश कवठेकर

मार्च महिन्यात करोनाचे रुग्ण सापडण्यास आणि त्यानंतर रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आणि पुणे शहरात करोनाची धास्ती निर्माण झाली. शहराचे चित्रही अचानक बदलून गेले. संसर्गाच्या भीतीपोटी शहरातील व्यवहारही टाळेबंदीत ठप्प झाले. घरी सुरक्षित थांबण्यास प्राधान्य देण्याबरोबरच स्वच्छतेसंदर्भात नागरिक कमालीचे दक्ष झाले. करोनाच्या संसर्गाची अशीच धाकधूक रोज रस्ते झाडण्याचे काम करणारे, कचरा संकलित करणारे सफाई कर्मचारी आणि स्वच्छ या संस्थेच्या सेवकांमध्येही दिसण्यास सुरुवात झाली. मात्र करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावातही शहर स्वच्छतेचा वसा घेऊन महापालिका आणि स्वच्छ सहकारी संस्थेच्या तब्बल साडेचौदा हजार कर्मचाऱ्यांनी अहोरात्र झटून शहर स्वच्छतेचा वसा अखंडित ठेवण्याचे लक्षणीय कार्य केले. दररोज असंख्य अडचणी समोर असतानाही त्यावर मात करत या स्वच्छतादूतांनी एक दिवसही त्यांच्या कामात खंड पडू दिला नाही.

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक सोसायटय़ांनी घराघरातून कचरा गोळा करणाऱ्या सेविकांना सोसायटय़ांमध्ये येण्यास मज्जाव केला. अगदी दरवाज्याला, कडी-कोयंडय़ाला चुकूनही स्पर्श करू नये, अशा सूचना नागरिकांकडून कचरा सेविका-सेवकांना देण्यात आल्या. काही ठिकाणी असंवेदनशील वागणुकीचाही सामना त्यांना करावा लागला. खासगी वाहनांना मनाई होती. त्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद असल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या सेवकांना असंख्य अडचणी आल्या. अत्यावश्यक सेवेत असूनही वाहतुकीचे साधन तातडीने उपलब्ध झाले नाही, त्यामुळे काही किलोमीटर पायी जावे लागले. कधी पोलिसांनी हटकल्यानंतर त्यांना या कामाचे महत्त्व पटवून देण्याची वेळही या सेवकांवर आली.

घरोघरी जाऊन कचरा संकलन, रस्त्यावरील स्वच्छतेची दैनंदिन कामे हे कर्मचारी भल्या पहाटे पाच वाजल्यापासून करत असल्यामुळे आपल्यालाही संसर्ग होईल का, या भीतीनेही स्वच्छता सेवकांना घेरले. एका बाजूला नागरिक भीतीपोटी कडय़ा लावत असताना, कचऱ्याच्या बादल्या सॅनिटायझरने स्वच्छ करत असताना वापरलेले मास्क, ग्लोव्हज् उघडपणे कचऱ्यात फेकून देत होते.

करोना संकटामुळे उडालेली घबराट, गोंधळ, शहर बंदमुळे संचारावर आलेल्या मर्यादा, सोसायटय़ांचे इशारे अशा बिकट वातावरणात कचरा संकलन करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि दैनंदिन साफसफाईची कामे रखडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र हा प्रश्न योग्य रीतीने मार्गी लागला. यात महत्त्वाचा वाटा राहिला तो स्वच्छ संस्थेचा आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा.सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, करोनासंदर्भातील जनजागृती या कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आली. त्यांना धीर देण्यात आला. प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले. प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत मास्क, ग्लोव्हज्, सॅनिटायझर नियमितपणे देण्यात आले.

सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीही नियमित होऊ लागली. शहरातील कचराच उचलला गेला नाही तर, आजारात वाढ होईल, हे सांगतानाच कचरासेवकांमधील सामाजिक भावना जागृत करण्यात आली. ते करत असलेले काम महत्त्वाचे असल्याची भावना त्यांच्या मनात रुजविण्यात आली.

‘टाळेबंदीच्या काळात स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. एकदा घरमालकांनीही खोली सोडण्यास सांगितले. या परिस्थितीतही स्वच्छ सहकारी संस्थेच्या ३ हजार ६०० कर्मचाऱ्यांनी विनातक्रार स्वच्छतेचे काम सुरू ठेवले. त्यांना आवश्यक संरक्षक साधने उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचे काम पाहून काही सोसायटय़ांनी नंतर कचरासेवक-सेविकांचा पैशांची माळ घालूनही सत्कार केला. तर काही नागरिकांनी संरक्षक साधने, जीवनावश्यक वस्तूही त्यांना उपलब्ध करून दिल्या. करोना संकटातही कामाचा आदर्श कचरा संकलन करणाऱ्या सेविकांनी घालून दिला’, असे स्वच्छ सहकारी संस्थेचे संचालक हर्षद बर्डे सांगतात.

महापालिका आणि स्वच्छ संस्थेचे मिळून साडेचौदा हजार कर्मचारी अहोरात्र स्वच्छतेच्या कामात गुंतले होते. याशिवाय अभियंता, वरिष्ठ—कनिष्ठ आरोग्य निरीक्षक असे साडेतीनशे अधिकारी-कर्मचारीही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभागी होते. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, प्रभागातील स्वच्छतेची दैनंदिन कामे करण्यासाठी साडेतीन हजार कर्मचारी, महापालिकेकडे कायमस्वरूपी सेवेत असलेले सात हजार कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर होते, अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.

ते सांगतात, स्वच्छतेच्या कामांचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना काम देण्यात आले. त्यात कुठेही खंड पडला नाही. करोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिकेकडून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. त्यासाठी शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, मैदाने, मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात आली. या विलगीकरण कक्षातही कचरा उचलणे महत्त्वाचे होते. त्यासाठी स्वतंत्र पथके करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालयांवर त्याची जबाबदारी देण्यात आली. विलगीकरणातील कचऱ्याबरोबरच महापालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालयातील वैद्याकीय कचऱ्याची तातडीने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. हे काम जिकिरीचे होते. मात्र कर्मचाऱ्यांनी ते नियोजन करून पूर्ण केले.

सध्याही हे काम अव्याहतपणे सुरू आहे. सफाई कर्मचारी, स्वच्छ सेवक यांच्यातील सामाजिक जाणीव आणि स्वच्छ, सुंदर शहर हेच आपले कार्य या भावनेतूनच करोनाभयग्रस्त वातावरणातही शहर स्वच्छता टिकून राहिली.