– प्रशांत देशमुख

करोनाचे संकट अद्याप मावळलेले नाही, संकटाचा सामना सुरू असतांनाच या लढ्यात साथ देणाऱ्या सेवाभावींचा सत्कार करीत प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त करण्याची भूमिका राज्यात आगळीवेगळी ठरावी. मार्चच्या मध्यावर संकटाला तोंड फुटल्यावर एकच धावपळ सुरू झाली. समाजातील प्रत्येकच सार्वत्रिक टाळेबंदीच्या प्रकाराला प्रथमच सामोरे जात होता. सर्व ठप्प म्हणजे नेमके काय, हे न कळणारे असंख्य स्तब्ध होवून बसले होते. मोठ्या उद्योगातील कामगार तसेच लहानसहान व्यवसायातील मजूरवर्ग रोजीरोटीच्या चिंतेने भयग्रस्त झाले होते.

रूग्णाची चाचणी व उपचार यापेक्षा मोठा प्रश्ना या मजूरवर्गाचा समजल्या गेला. रखरखत्या उन्हात, अनवाणी पायाने पायपीट करणारे मजूर परतीच्या प्रवासाला निघाले. सोय नाही म्हणून गावाकडे जाण्याची बाबसुध्दा नियमबाह्य असल्याचे त्यांच्या गावीही नव्हते. म्हणून प्रशासन व पोलिसांच्या नजरेत सापडलेले आहे तिथेच थांबले. वर्धा जिल्ह्यात आठ हजारावर स्थलांतरीत मजूर अडकून पडल्याने प्रशासनापूढे मोठा पेच उभा झाला होता. त्यांच्या अन्ननिवाऱ्याची तातडीने व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली. स्थानिक पातळीवर तरतूद नसल्याने व राज्य शासनाकडून मदत जाहीर न झाल्याने या मजूरांची सोय कशी लावायची, हा प्रश्ना होता. मात्र त्याचे उत्तरही तत्परतेने मिळाल्यावर प्रशासनाचा जीव भांड्यात पडला.

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वास्तव्याने व विचाराने जिल्ह्यात सेवाभाव रूजला. सेवाभावी कार्यकर्ते व संस्थांचे विश्वाच आकारास आले. हेच हात करोना संकटात पूढे आले. मुख्य जबाबदारी प्रशासनाची असूनही स्वखर्चाने मदत करण्याची तयारी व्यक्ती व संस्थांनी दाखविली. टाळेबंदीच्या पहिल्या आठवड्यात वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री व युवा उद्योजक प्रदीप बजाज यांनी प्रशासनाची निकड लक्षात घेवून निवारागृहासाठी मंगल कार्यालय व शिक्षण संस्थांच्या इमारती खुल्या केल्या. पहिल्या दिवसापासून दोन्ही वेळचे जेवण, नास्ता, व विरंगुळ्यासाठी टिव्ही संच उपलब्ध करून दिले. एवढेच नव्हे दैनंदिन व्यवस्थेसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून दिले.

यासोबतच शिक्षक संघटना पूढे आल्या. राज्य प्राथमिक शिक्षक समितीने साडेतीनशेवर गरजवंतांना धान्य व किराण्याची प्रत्येकी साडेआठशे रूपये किंमतीची साहित्य पिशवी दिली. शिवाय एका निवारागृहाची जबाबदारी घेवून दीड महिने भोजनादी सोय केली. आठही तालूक्यातील आरोग्य केंद्रांना फेसमास्क, हातमोजे, सॅनेटाईजर व तत्सम मदत पुरवून प्रशासनाचा भार हलका केला. तसेच राज्य शिक्षक परिषदेने शंभरावर मजूरांचे निवारागृह ताब्यात घेत सर्व ती व्यवस्था केली. या मजूरांसाठी विविध उपक्रम राबविले. सारथी संस्थेने कंत्राटदार सोडून गेल्याने निराधार झालेल्या पन्नास मजूरांची व्यवस्था सांभाळली.

या खेरीज प्रशासनाच्या विविध उपायांना सेवाभावींनी सहकार्याची साथ दिली. आरोग्य तपासणी, बाजाराचे नियमन, उन्हात राबणाऱ्या पोलिसांना चहापाणी, मजूरांचे समुपदेशन, मोफत आरोग्य तपासणी व उपचार करणारे डॉक्टर अशा व अन्य स्वरूपात प्रशासनाला मदत मिळाली. आपापल्या राज्यात परत जाण्याची परवानगी मिळाल्यानंतरही सेवाकार्य सुरूच राहिले. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून गावाकडे निघालेल्या मजुरांची वाटेत आबाळ होत होती. ते उपाशीच प्रवास करीत असल्याचे पाहून युवा कार्यकत्र्यांनी भोजनाचे डबे पुरविले. प्रवासाच्या तीनच दिवसात दोन हजारावर मजूरांची सोय युवा सोशल फोरम, काजवा, फाईट अगेन्स्ट करोना, आरंभ, निवेदिता निलेयम व अन्य संघटनांनी केली. अनेक दवाखाने बंद असतांना संकटात सापडलेल्या रूग्णांना डॉ. सुघोष व डॉ. भाग्यश्री भेंडे तसेच डॉ. सतीश हरणे यांनी दिवसरात्र सेवा दिली. मजूरांना मोफत उपचार दिले. आपुलकी संस्थेने अत्यंत गरजवंतांना प्रत्येकी एक हजार रूपये या प्रमाणे अडीच लाख रूपये गोळा करून सहाय्य केले. बजाज उद्योग समुहाने पाह हजार परिवारांना पंधरा दिवस पूरेल एवढे धान्य दिले.

सेवा कार्यात जिल्हा पातळीवरच नव्हे तर तालूका व गावपातळीवर सेवेचा झरा वाहला. मदतीत गैरप्रकार झाल्याची किंचीतही ओरड झाली नाही. परतीच्या प्रवासाला निघालेल्या मजूर महिलांना साडीचोळीसह निरोप देण्याची बाब तर शिक्षक संघटनांची उंचीच वाढवून गेली. असंख्य संस्था, असंख्य व्यक्ती या दोन महिन्यात सेवाकार्यात राबल्या. हे आमचे कर्तव्यच, प्रसिध्दी कशाला, असेच सूर या सर्वाचे राहिले. त्याचीच दखल घेत जिल्हा प्रशासनाने अशा निवडक ३६ व्यक्ती व संस्थांचा एका औपचारिक कार्यक्रमात सत्कार केला. प्रशस्तीपत्रही दिले.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार म्हणतात की, पूर्व विदर्भात सर्वाधिक म्हणजे साडे आठ हजारावर स्थलांतरीत मजूर वर्धेत अडकले होते. या सर्वांची सोय करण्याची मोठी जबाबदारी होती. अन्य विविध समस्या सोडवितांनाच या मजूरांच्या निवाऱ्याचा व अन्य सोय लावण्याची बाब महत्त्वाची होती. या कामी स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी केलेल्या सहकार्याची सदैव आठवण राहील.