– मनोज भोयर

उगाच टेस्ट रिपोर्ट किती वाजता येईल याची वाट कशाला पाहत राहायची म्हणून ६ मे रोजी मुद्दाम उशिरा उठलो, शेवटी माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आज तुम्ही घरी जाऊ शकता असा निरोप आला. रोजच तब्बेतीची विचारपूस आणि औषधी पुरवणाऱ्या त्या डॉक्टरांचे खूप आभार मानले. कॅमेरामन मित्राचा धीर वाढवला कारण त्याची टेस्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यामुळे तो भयंकर अस्वस्थ होता.

तुमची जाण्याची काही व्यवस्था असेल तर त्याने अथवा आम्ही ऍम्ब्युलन्सने तुम्हाला घरी सोडून देऊ असा निरोप मला पोहोचता केला गेला. मी विचार करून सांगितलं की माझी कोणतीही व्यवस्था नाही मी तुमच्या सोयीने कधीही घरी जायला तयार आहे. घरी कार होती मात्र पत्नी नेहा माझ्यामुळे होम क्वारनटाईन झाली होती, तिला घराबाहेर पडणं काही शक्य नव्हतं आधीच तिनं मोठ्या हिमतीनं मला सेंट जॉर्ज रुग्णालयात सोडलं होतं.

पुन्हा इंटरकॉमवर फोन आला, असा फोन आला की मी जरा दचकून जायचो. तुम्हाला ऍम्ब्युलन्सने सोडता येणार नाही याच.. कारण ऍम्ब्युलन्समध्ये सातत्याने पॉझिटिव्ह रुग्णांचीने आण होत असते.. तुम्ही त्यात जाऊ नका. कारण मला पटलं होत, पण आता जाण्याची व्यवस्था करायची कशी आणि माझी मदत तरी या अवस्थेत करणार कोण आणि उगाच लॉकडाऊनमध्ये का इतरांना आणखी ताण द्यायचा? म्हणून मी अर्धातास काहीही विचार न करता बेडवर निपचित पडून राहिलो.

घराच्या दिशेने सुरु झाला प्रवास
घरी जाण्याची ओढ लागली होती. आशिष शेलार या माझ्या राजकारणी मित्राला फोन केला, पाऊणतासात व्यवस्था झाली. घरी जाण्याचा प्रश्न मिटला. काही राजकारण आणि त्यांच्या पक्षाच्या पलिकडे जाऊन मैत्री जपणारे होते, त्यांची मदत घेणं अशावेळी मला गैर वाटलं नाही. रिसेप्शनला निरोप दिला. डिस्चार्ज पेपर्स तयार झाले होतेच, दरम्यान घरी आणि सोसायटीला कुळवून टाकले. दारात कार आली. पेपर्स नीट चेक करून घेतले. हात जोडून सर्वाना नमस्कार केला. आभार मानले, तुम्ही सुद्धा नीट काळजी घ्या म्हणून सर्वांचा निरोप घेतला. आठवण म्हणून काही फोटो काढून घेतले. हॅन्ड ग्लोव्हस घालून कारमध्ये बसलो आणि माझा घराच्या दिशेने प्रवास सुरु झाला. मुंबई पुन्हा भरल्या डोळ्याने पाहत होतो. एकटाच होतो डोळे निवांतपणे अश्रुनी भरू दिले..

या कोरोनाने कोरोनाच्या पलिकडे जाऊन जगाला कधीही भरून न निघणाऱ्या दुःखात लोटून दिले होते, मी तर तसा सुखी प्राणी होतो. असंख्य मजूर जिवंतपणी मरण यातना भोगत होते.. विचारांची आवर्तनं सतत डोक्यात सुरु होती ती काही थांबत नव्हती.

धारावीपर्यंत कार आली, मुंबईतला सर्वात मोठा कोरोनाचा हॉटस्पॉट, घराबाहेर गर्दी जमली होती, काही रस्त्यावर होती, स्वतःला छोट्या खोलीत तासनतास कोंडून घेण्यापेक्षा बाहेर पडण्याची त्यांची मजबुरीसुद्धा असू शकेल, मात्र हे दाटीवाटीने एकत्र येणारे घोळके त्यांच्या जीवाशी खेळ करणारे होते.

गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक ५७ च्या नगरसेविका श्रीकला पिल्लई यांच्या कारचा चालक मॅक जॉर्ज भलताच गोड छोकरा होता, ८ दिवसानंतर थेट प्रथमच कुणाशी गप्पा होत होत्या. जार्जसुद्धा कोरोना मदत केंद्रावर काम करत होता, कम्प्युटरवर लोकांची माहिती नोंदवून घेत होता. बोलण्याच्या ओघात बरीच माहिती मिळत गेली. नगरसेविका मॅडमसोबत प्रथमच बोलणं होत होतं त्यांचाही स्वभाव खूप काळजी घेणारा वाटला.

मॅकची कार अखेर माझ्या प्रतीक्षानगरच्या पारिजात हौसिंग सोसायटीला लागली, रस्त्यावरच उतरलो. मॅकला प्रेमळ निरोप दिला. त्यानेही मला जोरदार थम्स अप केलं .

सोसायटीने केले दिलदार स्वागत
सोसायटी माझ्या स्वागताला उभी होती, बाहेरही काहीजण उभे होते, आजूबाजूच्या सोसायटीतले लोक खिडकीतून हात उंचावत होते. उत्साहाने मित्रांनी स्पिकरवर घंटानाद सुरु केला. पत्नी नेहा आणि काही मित्र व्हिडिओत दृश्य टिपत होते. पुष्पगुछ दिले गेले. माझ्यावर फुलांची उधळण झाली. हा स्वागत सोहळा माझाच नव्हता तर तो तमाम कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा आणि अतिशय संकटात निकराने काम करणाऱ्या सर्वासाठीच होता. मी भारावून गेलो. उपकृत झालो… नतमस्तक झालो.. जास्त वेळ न थांबता लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेलो. अत्यंत धीराने घराचा सांभाळ करणारी नेहा आणि आशयची १४ दिवसानंतर भेट झाली. घरातून जाताना आशय झोपलेला होता आणि मी बरा होऊनदेखील १४ दिवस एकाच खोलीत स्वतःला क्वारनटाईन करण्याच्या सख्त सूचना असल्यामुळे आनंदून गेलेल्या आशयला मला जवळदेखील घेता आले नाही. डोळ्यात कायम साठवून ठेवावा असा हा क्षण होता.

करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर बसलेला धक्का आणि त्यानंतर टेस्ट निगेटिव्ह आल्यावर जगण्यातला पॉझिटिव्हनेस दुप्पट झाला होता…  उमेदीच्या किरणांनी भावविश्व व्यापलं गेलं होतं.

(समाप्त)

(लेखक जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सहसंपादक आहेत.)

भाग १ –  BLOG : …आणि मला ताप आला!

भाग २ – BLOG: …संशयितांच्या रांगेतलं कुटुंब, अन् रिपोर्टची धाकधुक

भाग ३ – Blog : करोना पॉझिटिव्ह वॉर्डात जगलो…

भाग ४ – BLOG: पुन्हा टेस्ट पॉझिटिव्ह आणि घबराट