-श्रुति गणपत्ये

भारतामध्ये कोविडची दुसरी लाट आली असून आरोग्य सेवा ढासळली आहे आणि संसर्गही पहिल्यापेक्षा वेगाने होत आहे. वृत्तपत्र, टिव्ही वाहिन्या, सोशल मिडिया सगळीकडेच कोविड रुग्णांचे हाल आणि भीतीचं वातावरण या बातम्यांनी भरलं आहे. अशावेळी किमान ज्यांना घरी राहणं शक्य आहे त्या नागरिकांनी तरी बाहेर न पडता सरकारने घातलेले नियम काटेकोरपणे पाळण्याची अपेक्षा आहे. घरी बसून काय करणार हा प्रश्न आपल्याला पडू नये म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मनी बऱ्याच नवीन मालिका, चित्रपट या टाळेबंदीच्या काळामध्ये दाखवण्याची घोषणा केली आहे. गेल्यावेळी टाळेबंदीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मला मिळालेली लोकप्रियता पाहता यावेळी सर्वच प्लॅटफॉर्मनी काहीना काही नवीन मालिका, चित्रपट आणण्याच्या घोषणा केल्या आहेत.

त्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या आयुष्यावर असणारा “सायना” हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर बघायला मिळेल. एका मध्यमवर्गीय घरातून येऊन वर्ल्ड चॅम्पियन होण्याची स्वप्नं बघणाऱ्या सायनाची ही गोष्ट आहे. एका खेळाडूचा संघर्ष, मेहनत, शारिरीक दुखापत, चढ-उतार असा सगळा मसाला या चित्रपटामध्ये आहे. सायना आणि तिचा कोच पुलेला गोपीचंद यांच्यामध्ये झालेला वाद याववर मात्र चित्रपटामध्ये सावधपणे भाष्य केलं आहे. गोपीचंद याचं खरं नाव घेणंही चित्रपटात टाळलं आहे. परिणिती चोप्राचं काम खूप चांगलं झालं आहे आणि बऱ्याच दिवसांनी ती स्क्रीनवर आल्याने तिच्याबद्दल उत्सुकता कायम आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित हा चित्रपट म्हणजे फॅमिली वॉच म्हणता येईल.

त्याशिवाय आज नसरुद्दीन शाह, विनय पाठक यांचा बहुचर्चित चित्रपट “रामप्रसाद की तेरहवी” नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत असून वीकेंड वॉचसाठी वेळ काढायला हरकत नाही. घरातल्या एकाचा मृत्यू झाल्यावर तेराव्यासाठी नातेवाईक जमतात त्यातून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.

दक्षिणेतला सुपरस्टार नागर्जून याचा “वाईल्ड डॉग” हा तेलुगू चित्रपट या आठवड्यामध्ये नेटफ्सिक्सवर प्रदर्शित झाला. अ‍ॅक्शन थ्रिलर असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित मराठी चित्रपट “द डिसिपल” हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर या महिन्यात प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. एका गायकाच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल फिल्म फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स अवॉर्डने गौरवण्यात आलं होतं.

तसंच या महिन्यात प्रदर्शित झालेल्या “अजिब दास्तान” या चार कथानकाच्या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. केवळ स्त्री-पुरुष प्रेम अशा हिंदी चित्रपटाच्या ठराविक साच्याच्या पलीकडे जाऊन मानवी नात्यांचं चित्रण यामध्ये केलं आहे. ठोकळेबद्ध हिंदी चित्रपटांप्रमाणे नसल्याने एकदा बघायला काहीच हरकत नाही.

सोनी लिव्ह वर “काठमांडू कनेक्शन” ही एक क्राइम थ्रीलर मालिका याच आठवड्यात प्रदर्शित झाली. त्यातील एक प्रमुख व्यक्तिरेखा जी पत्रकार आहे तिचं नाव शिवानी भटनागर असल्याने १९९० च्यावेळी पत्रकार शिवानी भटनागर आणि तिचा संशयास्पद मृत्यू याची आठवण होईल. पण मालिकेचं कथानक मात्र पहिल्या सीझनमध्ये तरी पूर्ण वेगळं आहे. १९९२ साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांची पार्श्वभूमी घेऊन हे मालिकेचं कथानक रचलं आहे.

चित्रपटगृह बंद असल्याने अनेक मोठ्या कलाकारांनीही आपले चित्रपट ओटीटीवर दाखवणं पसंत केलं. पण कंगना रानौतने तिचा बहुचर्चित “थलैवी” मात्र ओटीटीवर प्रदर्शित न करण्याचं अलीकडेच जाहीर करून प्रेक्षकांची निराशा केली. दक्षिणेतील लोकप्रिय राजकीय व्यक्तीमत्व आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जे. जयललिता यांच्या जीवनावर हा चित्रपट आहे. कंगनाच्या अट्टहासामुळे चित्रपटगृह सुरू होईपर्यंत प्रेक्षकांना थांबावं लागणार आहे. दोन वर्षांपूर्वी एमएक्स प्लेअरवर जयललिता यांच्याच आयुष्यावर बेतलेली “क्वीन” ही मालिका आली होती. त्याला प्रतिसाद चांगला होता आणि काही वाद झाला नाही. कारण जयललिता यांच्याबद्दल आजही तामिळनाडूचे लोक खूप संवेदनशील आहेत.

आता हे सगळं खूप जड जड आणि गंभीर वाटत असेल तर “रिअल हाऊस वाईव्ह्ज ऑफ बेवर्ली हिल्स” सीझन-३ नेटफ्लिक्सवर आलाय. लॉस एंजलिसच्या अत्यंत उच्चभ्रू भागामध्ये राहणाऱ्या, मोठमोठे व्यवसाय असलेल्या हॉलिवूडशी कनेक्शन असलेल्या पाच बायकांची ही कथा आहे. प्रचंड श्रीमंतीत राहणाऱ्या या बायका दिवसभर काय करतात, आपला वेळ कसा घालवतात, कोणाला भेटतात, काम काय करतात, त्यांचे नवरे काय करतात, त्यांचे कपडे, शॉपिंग, त्यांच्या पार्ट्या, डोळे दिपवणारे बंगले, गाड्या हे सगळं पहायचं असेल तर कोणताही एक सिझन लावून सिरियल सुरू करा. कोणाची बेस बॉल टीम आहे तर कोणाचा कॅसिनो, कोणाची महागड्या हॉटेलची चेन तर कोणी हॉलिवडूमधील बालकलाकार. याच मालिकेवरून प्रेरणा घेऊन “फॅब्यूलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ह्ज” ही मालिका हिंदीमध्ये आणली होती. पण अर्थातच श्रींमती सगळ्या गोष्टी देत नाही. केवळ हेवेदावे, टाइमपास, गॉसिप, समाजाशी संपर्क नसणं, आपल्याच मस्तीमध्ये राहणं याचाच प्रत्यय वारंवार येतो.

shruti.sg@gmail.com