25 May 2020

News Flash

BLOG : महेंद्रसिंह धोनी – टीम इंडियाचं अवघड जागेचं दुखणं !

धोनीची संथ खेळी ठरतेय चर्चेचा विषय

संपूर्ण देशभरासह जगभरात आपला चाहतावर्ग निर्माण करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. भारतामध्ये आजही अनेक लोकं त्याला क्रिकेटचा देव मानतात, आता सचिन खरंच क्रिकेटचा देव आहे की नाही या गोष्टीवर चर्चा करता येऊ शकते. काहींच्या मते सचिन हा खरंच ग्रेट खेळाडू होता तर काहींच्या मते सचिन फक्त स्वतःच्या विक्रमांसाठी खेळायचा. मात्र या देशात बहुतांश तरुण पिढीला क्रिकेटवर प्रेम करायला लावण्याचं सामर्थ्य सचिनमध्ये होतं ही गोष्ट तर मान्य करायलाच लागेल. सचिन मैदानावर आला की तुमचं कोणतही काम असो ते बाजूला ठेऊन तुम्ही टीव्हीसमोर बसायचात !! सचिनच्या काळात राहुल, सौरव, लक्ष्मण , सेहवाग असे अनेक दिग्गज खेळाडू होते, मात्र सचिनची गोष्ट ही वेगळीच होती. सचिनच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देशभरात आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण करण्यात एकमेव खेळाडू यशस्वी ठरला तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी.

कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि यष्टींमागे विजेलाही लाजवेल इतका चपळपणा, या त्रिसुत्रीच्या आधारावर धोनी टीम इंडियाला सतत अग्रस्थानी ठेवत आला आहे. २००७ चा टी-२० विश्वचषक, २०११ चा वन-डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद हे धोनीच्या शिरपेचातले मानाचे तुरे आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्र बदललं आहे. विशेषकरुन २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागल्यानंतर धोनीच्या फलंदाजीला ग्रहण लागलं आहे. नाही म्हणायला धोनी अध्येमध्ये त्याच्या जुन्या फॉर्मात परत येतोही…..पण त्याच्या फलंदाजीतलं सातत्य आणि आक्रमकता ही कमी होत चालली आहे हे कुठेतरी मान्य करावं लागेल. तुम्ही-मी कितीही धोनीचे निस्सीम चाहते असलो तरीही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयोमानाप्रमाणे या गोष्टी होणं साहजिक आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियावरचा ट्रेंड पाहता धोनीच्या चाहत्यांना ही गोष्ट मान्य नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे खेळाडू कोणताही असो त्याला आज न उद्या टीकेचा धनी हे व्हावचं लागतं. खुद्द सचिन यामधून सुटला नाही, तर धोनीची काय कथा?? मात्र आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं की ही टीका त्या खेळाडूवर वैय्यक्तिक स्वरुपात नसून, संघाच्या जय/पराजयात त्याच्या असलेल्या सहभागाबद्दल असते. धोनीवर कितीही टीका झाली तरी एक गोष्ट सर्वांनाच मान्य करावी लागेल ती म्हणजे, धोनी हा टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आहे. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक हा संघाचा अर्धा कर्णधार असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे सर्वात पहिले धोनीच्या चांगल्या बाजूंबद्दल बोलूया….

वयाची पस्तीशी ओलांडली असली तरीही तितक्याच चपळाईने होणारं यष्टीरक्षण, ही महेंद्रसिंह धोनीसाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. सामन्यामध्ये विजयाचं पारडं नेमकं कोणाच्या दिशेने झुकतंय आणि त्यानुसार रणनितीमध्ये कसे बदल करायचे, क्षेत्ररक्षण कसं लावायचं, गोलंदाजांना नेमका काय सल्ला द्यायचा हे धोनी अचून जाणतो. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या फिरकी जोडगोळीच्या यशस्वी होण्यामध्ये धोनीचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. टप्पा कुठे ठेवायचा, लाईन अँड लेंथ कुठली असली पाहिजे या सर्व गोष्टी धोनी यष्टींमागून हेरत असतो. जणूकाही प्रतिस्पर्धी फलंदाजांचं मन ओळखण्याची जादू त्याच्याकडे आहे. “बाहर आकर मारेगा, ज्यादा फ्लाईट देगा तो भी चलेगा.” “कुछ अलग मत कर, हॅटट्रीक होने का चान्स है तेरा.” असे टिपीकल धोनी पठडीतले संवाद आपण सोशल मीडियावर ऐकत असतो. सामन्याची नाडी अचूक हेरता येणं याचं हे उत्तम उदाहरण आहे.

आता केवळ या गोष्टींमुळे धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरतो का??तर नाही….आपण प्रत्येकाने धोनीची यष्टीरक्षणाच शैली पाहिली आहे. स्टम्पिंग करताना चेंडू जितका स्टम्पजवळ पकडला जाईल तितक्या लवकर फलंदाज स्टम्पिंग होण्याची शक्यता असते. अनेक सामन्यांमध्ये समोरच्या फलंदाजाला कळण्याआधी धोनीने बेल्स उडवलेल्या असतात. याचसोबत धावबाद करताना, खेळाडूने थ्रो केलेल्या चेंडूचा अंदाज घेणं. चेंडू हातात घेऊन बाद करणं शक्य नसल्यास तो चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळावा यासाठी त्याला हलकासा टच देणं या सर्व गोष्टी धोनी मोठ्या खुबीने करतो. या गोष्टी कोणताही प्रशिक्षक तुम्हाला शिकवत नाही, अनुभव आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला या गोष्टी शिकाव्या लागतात. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेपर्यंतचा विचार करता, एक चांगला यष्टीरक्षक म्हणून धोनी संघात नक्कीच हवा.

मात्र हीच गोष्ट जेव्हा फलंदाजीपर्यंत येऊन पोहचते तेव्हा सगळी चक्र उलटी फिरायला लागतात. धोनीच्या बॅटमधून धावांचा ओघ कमी होण्यास कारणीभूत ठरली ती २०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेली चॅम्पियन्स ट्रॉफी. या स्पर्धेत भारताला अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. धोनी आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करु शकला नाही. यानंतर काही दिवसांतच टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात बीसीसीआयने धोनीला पर्याय म्हणून युवा ऋषभ पंतला संघात स्थान दिलं होतं. वास्तविक पाहता याचदरम्यान कठोर निर्णय घेऊन ऋषभ पंतला किमान २ सामन्यांमध्ये संधी द्यायला हवी होती. मात्र ऋषभला बसवून ठेवणं भारतीय व्यवस्थापनाने योग्य समजलं. याच दौऱ्यात धोनीची संथ फलंदाजी ही अधिक उघड झाली. एका सामन्यात धोनीने मधल्या षटकांमध्ये बरेचसे चेंडू खाल्ल्यामुळे भारत अपेक्षित धावगतीने धावा जमवू शकला नाही. परिणामी भारत ११ धावांनी सामना हरला.

या सामन्यानंतर धोनी ड्रेसिंग रुममध्ये रडवेल्या चेहऱ्याने बसल्याचे फोटो व्हायरल झाले. वास्तविक पाहता याचवेळी कठोर निर्णय घेऊन धोनीला पर्याय म्हणून ऋषभ पंतला अधिकाधीक संधी देणं गरजेचं होतं. मात्र धोनीसारख्या महान खेळाडूला बसवायचं कसं, हा प्रश्न सतत समोर आल्यामुळे बीसीसीआय आणि विराट कोहलीने तो निर्णय घेणं टाळलं. यानंतर मधल्या वर्षभराच्या काळात, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात धोनीने चांगली कामगिरी केली. मात्र त्याच्या खेळीतलं सातत्य हा नेहमी चर्चेचा विषय ठरला.

२०१९ विश्वचषक स्पर्धेत धोनीची खेळी अजुनही संथ मार्गावरच आहे. धोनीचे चाहते आजही त्याला सर्वोत्तम फिनीशर मानत असतील. मात्र ३५ व्या षटकात फलंदाजीसाठी यायचं, खेळपट्टीवर स्थिरावायला २-३ षटकं घ्यायची. नंतर फटकेबाजी करण्याच्या षटकांमध्ये एकेरी-दुहेरी धावा घ्यायच्या आणि शेवटच्या षटकात एक-दोन षटकार खेचत सर्वोत्तम फिनीशर चा किताब मिरवायचा…..हा असा धोनी आम्हाला कधीच आवडणार नाही. एका विशिष्ट कालावधीनंतर प्रतिस्पर्धी गोलंदाज तुमची फलंदाजीची शैली आत्मसात करतो. अशावेळी फटकेबाजी करायची म्हणून, समोरच्या फलंदाजाला स्ट्राईकच द्यायची नाही, आणि स्वतः स्ट्राईकवर राहत फटकेबाजी करण्याच्या नादात विकेट फेकायची ही धोनीची सवय आपल्याला महागात पडू शकते.

कोणताही खेळाडू आयुष्यभर धडाकेबाज आक्रमक फलंदाजी करु शकणार नाही, त्यालाही काही मर्यादा आहेत. कारण तो माणूस आहे, यंत्र नाही हा साधा-सोपा आणि सरळ नियम भारतीय चाहत्यांनी समजावून घ्यायला हवा. धोनीवर टीका झाली त्यामुळे तो वाईट ठरत नाही, पण समोर दिसत असलेलं ढळढळीत सत्य नाकारण्यामध्ये काय अर्थ आहे. बीसीसीआय आणि विराट कोहलीनेही धोनीला पाठीशी घालत राहणं थांबवायला हवं. धोनीच्या संथ खेळीचं समर्थन करत तुम्ही तुमच्या संघाची कमकुवत बाजू जगासमोर मांडताय हे बीसीसीआय आणि विराटला कळत नसेल का??? कदाचीत हा विश्वचषक धोनीचा अखेरचा विश्वचषक असेल, मात्र यानंतरही धोनीने खेळत राहणं पसतं केलं तर त्याचं स्वागतच आहे. मात्र भविष्याचा विचार करायला गेला तर धोनीच्या पर्यायाला आता अधिक संधी मिळणं गरजेचं आहे. नाहीतर ४ वर्षांनी आपण पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर काथ्याकुट करत बसलेले असू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2019 10:12 am

Web Title: cricket world cup 2019 a special blog on ms dhoni slow innings in world cup psd 91
टॅग Bcci,Ms Dhoni
Next Stories
1 भारताच्या विजयानंतर ‘त्या’ आजींना आनंद महिंद्रांनी दिली ही खास ऑफर
2 प्रतिकुल परिस्थितीचे बाळकडू
3 उपांत्य फेरीसाठी विजय हवाच!
Just Now!
X