विश्वचषक स्पर्धा म्हटली की प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या मनाच्या कोपऱ्यात आठवणी तयार झालेल्या असतात. २०१९ सालचा विश्वचषक या नियमाला मात्र आतापर्यंत अपवाद ठरला आहे. ४ सामने पावसामुळे वाया गेल्यानंतर आयसीसी क्रिकेट रसिकांच्या टिकेची धनी बनली. काही ठराविक सामने सोडले तर प्रत्येक सामना हा एकतर्फीच झाला, त्यामुळे अखेरच्या चेंडूपर्यंत निर्माण होणारी रंगत या स्पर्धेत कुठेही दिसलीच नाही. बांगलादेश आणि श्रीलंकेचा अपवाद वगळता एकही संघ या स्पर्धेत झुंजार लढत देऊ शकला नाही. श्रीलंकेने यजमान इंग्लंडवर २० धावांनी मात करत विश्वचषक स्पर्धेतला मोठा उलटफेर घडवून आणला. या विजयामुळे आगामी सामन्यांमध्ये इंग्लंडच्या विजयाचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात बांगलादेशने ३३० धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल आफ्रिकेच्या संघाला ३०९ धावांवर बाद करत २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यातही बांगलादेशी फलंदाजांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत चांगली झुंज दिली. ३८२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला बांगलादेशचा संघ ३३३ धावांपर्यंत मजल मारु शकला. या सामन्यात बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही त्यांच्या झुंजार खेळाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. आगामी काळात बांगलादेश हा कच्चा प्रतिस्पर्धी राहिलेला नाही ही बाब या स्पर्धेतील निकालांनी स्पष्ट केली आहे. बांगलादेशच्या संघाच्या कामगिरीत झालेला बदल दाखवण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे.

कितीही खडतर प्रसंग आला तरीही धीर सोडू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे, लिड्सच्या मैदानावर शुक्रवारी रंगलेला श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामना. लंकेला २३२ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडचा संघ हा सामना सहज जिंकेल असं म्हटलं जात होतं. सोशल मीडियावरुनही जवळपास ९६ टक्के चाहत्यांनी इंग्लंडला आपला कौल दिला. मात्र अचूक दिशा, योग्य टप्पे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या जोरावर लंकेने सामन्यात बाजी मारली. २१२ धावांमध्ये इंग्लंडला बाद करुन श्रीलंकेने विजय मिळवला. अनुभवी लसिथ मलिंगाने ४ बळी घेतले. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र लंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचं विजयाचं गणित बिघडलेलं आहे.

सध्या गुणतालिकेत इंग्लंडचा संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता सर्वोत्तम ४ संघांमध्ये आपलं स्थान कायम राखण्यासाठी इंग्लंडला आता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड या मातब्बर संघांविरोधात इंग्लंडला दोन हात करायचे आहेत. त्यामुळे या तिन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला मोठ्या विजयाची गरज लागणार आहे. श्रीलंकेचं या स्पर्धेतलं आव्हान अद्याप संपलेलं नाही, सर्वोत्तम ४ संघामध्ये जागा मिळवण्यासाठी लंकेलाही मोठ्या प्रयत्नांची गरज लागणार आहे. मात्र आगामी काळात लंकेने आपली कामगिरी अशीच ठेवली तर इतर संघासाठी हे धोकादायक ठरु शकेल.

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यांना प्रत्येकवेळा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र आयसीसीच्या स्पर्धांमधली भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा इतिहास पाहिला तर या सामन्यांना प्रसारमाध्यमांकडून मिळणारी हाईप योग्य आहे का असा प्रश्न पडतो.

क्रिकेटचा सामना कसा रंगला, कोणता संघ कसा खेळला याबद्दल क्रिकेट पंडीतांची अनेक मत-मतांतर असू शकतात. मात्र सामान्य प्रेक्षकांच्या भूमिकेतून विचार करायचा झाला, तर दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना लोकल ट्रेनमध्ये ज्या सामन्याची आणि खेळाडूची चर्चा होते तो सामना प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतो. श्रीलंकेने इंग्लंडवर मात करुन पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना चर्चेचा विषय दिला आहे. ही स्पर्धा अजुन संपलेली नाही, काही सामने रटाळ झाले असले तरीही यापुढचे सामने हे रंगतदार होतील ही आशा या सामन्याने जागवली आहे. ज्या देशात क्रिकेटचा धर्माचं रुप दिलं जातं, तिकडच्या भाबड्या क्रिकेटप्रेमींची यापेक्षा दुसरी अपेक्षा काय बरं असु शकते??