17 January 2021

News Flash

जीव गुदमरतोय गडांचा

गडांवर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण?

जीव गुदमरतोय गडांचा

नितेश जाधव

मी २०१० मध्ये हरिश्चंद्रगड ट्रेक केला होता तेव्हा गडावर राहण्यासाठी सोय फक्त गुहेत होती. त्यानंतर मागील महिन्यात कोकणकडा आरोहणामुळे पुन्हा गडावर जाण्याचा योग आला. तेथे गेल्यानंतर पाहतो तर काय मागील नऊ वर्षांमध्ये चित्र खूपच बदलेल्याची जाणीव झाली. मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा खूपच स्टॉल उभे राहिलेले दिसले. तेव्हा तिथे फक्त झुणका भाकर मिळायचं आणि आता हवं ते मिळतं. आनंद खूप झाला जेव्हा स्वतःच्या आणि मुलाबाळांच्या पोटापाण्यासाठी धंदा करणाऱ्या स्टॉल मालक आपल्या पोऱ्या इतकीच गडाची आणि त्यावरील वास्तुची काळजी घेताना दिसले.

मग इतका बदल का झाला? हा प्रश्न येतोच. माझ्या मते त्याचं मुख्य कारण म्हणजे ‘सोशल मिडिया’

गेल्या पाच सहा वर्षात सोशल मिडियामुळे ट्रेकिंगला येणाऱ्याची संख्या खूप वाढली आहे. कारण सोशल मिडिया हे असं माध्यम आहे त्यामुळे अखंड गड आणि त्यावरील वास्तू हे फोटो, व्हिडीओच्या रुपात जगासमोर गेलं. साहजिकच ते डोळ्यांच्या कॅमेरात टिपण्यासाठी खूप काही प्रमाणात ट्रेकर्स येऊ लागलेत आणि त्यात अजून भर पडली या पावसाळी पर्यटकांची. फक्त आपले स्टेटस, प्रोफाइल फोटो अपडेट करण्यासाठी अशा पावसाळी पर्यटकांची जत्रा भरलेली दिसते.

पर्यटकांच्या गर्दीमुळे नाहक त्रास होतो तो खऱ्या खुऱ्या ट्रेकर्सना. यावर काही तोडगा निघतो का म्हणून काही दिवसांपूर्वी पुण्यात मग मुंबई मध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये ट्रेकिंग करणाऱ्या अनेक ग्रुप्सचे लीडर एकत्र आले होते. त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की होणारी गर्दी म्हणजेच ‘गडावरील ट्रॅफिक जॅम’ सर्व प्रथम आपल्या ट्रेकमधून कमी करूयात. म्हणजे प्रत्येक ट्रेकमध्ये घेऊन जाणाऱ्या लोकांची संख्या कमी करूयात. पण हे असं ठरलं आणि दुसऱ्याच दिवशी हरिहरला ही अशी फोटोत दिसतेय अशी जत्रा भरली. जत्रा एवढी होती की गडाखालील निरगुंडे गावातून ती स्पष्टपणे दिसत होती.

किल्ल्या खालून दिसणारी गर्दी

ट्रेकच्या नावाखाली पैसे कमवणारी लोकं काही आताच आलीयत असं नाही. ती लोकं खूप आधीपासून आहेत. बरं त्यातही ट्रेकचे आयोजन करणारे ग्रुप्स कशाप्रकारच्या सेवा देतात हेही महत्वाचे ठरते. (उदा: प्रवास, जेवण, ट्रेकिंगसंदर्भातील सुरक्षा उपकरणे, प्रथमोपचार आणि औषधे)

जवळपास मुंबईत अंदाजे १०० ते १२५ ट्रेकिंग ग्रुप असतील पण फक्त पावसाळ्यामध्ये ट्रेक करणारे ग्रुप ( मी त्यांना पावसाळी बेडूक म्हणतो) पकडले तर हा आकडा ३०० च्या आसपास जातो. त्यात ऑफिस, कॉलेज, क्लासेस, सोसायटी ग्रुप्सचाही समावेश होतो. प्रत्येक ग्रुपने एका गडावर ट्रेक आयोजित केला आणि समजा एका ग्रुपमधून फक्त १० माणसे ट्रेकला यायला तयार झाली तर ३ हजार ट्रेकर्स इकडेच झाले. तरी पुणे, नाशिक पट्ट्यातील ट्रेकर्सचा आपण विचारच केला नाहीय.

 

गर्दीच गर्दी

बरं जे ट्रेकर्स वर्षभर ट्रेक करत असतात त्यांनाही माहीत आहे की पावसात लोकांना कुठले गड-किल्ले जास्त आवडतात. मग तेच तेच दरवर्षी गिरवले जाते. ( कारण शेवटी ट्रेकिंग हा ही एक उद्योग आहे.) जे नवखे आहेत ते गुगलवर कडयावरील फोटो पाहून किंवा कुठल्यातरी पेजच्या जाहिरातीला बळी पडून ट्रेकला जायला तयार होतात.

हल्ली बहुतेक ट्रेक लीडर आपला ट्रेक आणि किती लोकांना नेणार आहोत ते एका ‘ट्रेक लीड’ ग्रुपवर अपडेट करतात. जेणेकरून एका गडावर किती जण आहेत याचा अंदाज येतो. यामुळे गडावर ट्राफिक जॅमसारखी समस्या होणार नाही याची काळजी काही ग्रुप्स घेतात. पण जे ऑफिस, कॉलेज, क्लासेसमधील पर्यटक स्वतंत्र जातात त्यामुळे अशा जत्रा भरतात. कारण अशा अचानक येणाऱ्या पर्यटकांच्या आकड्याचा काहीच अंदाज बांधता येत नाही किंवा कळत नाही.

यावर उपाय सध्या तरी काहीच दिसत नाही तरी माझ्या मते खालीलप्रमाणे प्रयत्न केला तर काही प्रमाणात फरक पडलेला दिसून येईल.

१. जर सगळ्या ट्रेकर्स – गिर्यारोहकांनी एकत्र येऊन आपण या गर्दी भाग होयाचा नाही असं ठरवायचं. तेच तेच ट्रेक करण्याऐवजी जे अपरिचित गड-किल्ले आहेत तिकडे यावेळी ट्रेक्स करायचे. म्हणजे ३००० चा आकडा एका गडावर असतो त्यात कमीतकमी १००० चा तरी फरक जाणवेल. बाकीच्या उरलेल्या २००० लोकांना (पुन्हा पावसाळी बेडूकच म्हणेल त्यांना) आपण समजवू शकत नाही कारण अशा गर्दीवर आपण नियंत्रण ठेऊ शकत नाही.

२. गडावर जाणाऱ्या रस्त्यावर वनविभाग किंवा गावातील सरपंच, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून एक चेक पोस्ट लावावी. यामुळे गडावर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या समजू शकेल. एकदा आकडा निश्चित करायचा आणि तितके मर्यादित पर्यटक त्या चेक पोस्टवरुन गडावर गेले की त्याहून अधिक पर्यटकांना गडावर प्रवेश द्यायचा नाही. यासाठी हवं तर ऑनलाईन बुकिंग चालू करावे, अगदी कास पठारावर बुकिंग होतं तसंच म्हणा हवं तर. असं केल्यास काही प्रमाणात का असेना या अशाप्रकारच्या गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल.

गडावरील गर्दी

अशा गर्दीमुळे गडाचं गडपण नक्कीच हरवत आहे का?… तर याचे उत्तर ‘हो’  असे आहे.

> पाऊलवाट ही एकच असल्याने ‘पहिला मैं पहिला मै’ करण्यासाठी अनेक वाटा बनवतात. त्यात नव्याने उगवणाऱ्या झाडांचा, वनस्पतीचा ट्रेकर्सच्या झुंबडी येऊन येऊन त्यांच्या पायाखाली चिरडून जीव जातो.

> मानवी विष्ठा ही दुसरी समस्या. गडाच्या आजूबाजूला साहजिक लोकं नैसर्गिक विधीला जातात. एकाच वेळी एवढे लोकं उघड्यावर बसले तर त्याचो विघटन व्हायला १० दिवस जात असतील. पण ते दहा दिवस जाण्याआदीच पुढचा रविवारी येतो मग पुन्हा तेच तेच. मग गडाला पण हा दुर्गंध आवडत असेल का?

> कुठल्याही वस्तूची एक क्षमता (कॅरिंग कॅपॅसिटी) असते. या क्षमतेच्या त्यापलीकडे अजून जोर त्या वस्तूवर दिला तर ती वस्तू तुटू शकते. गडावरील वास्तू पण अशाच आहेत.

> प्रत्येक येणार ट्रेकर कमीत कमी एक प्लॅस्टिकची वस्तू तरी आणतो. त्यानंतर त्यापैकी अनेक किंवा काही प्लॅस्टिकचा कचरा गडावर टाकला जातो. मग प्लॅस्टिकच्या अशा अनेक गोष्टी गडावर आणि त्याच्या आजूबाजूला टाकलेल्या दिसतात. (अर्थात काही ठराविक ट्रेकींग ग्रुप्स प्लॅस्टिकचा किंवा इतरही कचरा गडावर न टाकण्याचा नियम कडेकोटपणे पाळतात)

> देव ना करो पण अशा गर्दीत एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनसारखी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण?

> वेळीच सावध व्हा आणि दुसऱ्यांना पण करा. ट्रेकर्सनी असे ट्रेक करताना नेहमी ‘प्लॅन बी’ (आजूबाजूचा दुसरा गड) तयार करून ठेवावा. त्यामुळे नियोजित गडावर गर्दी वाटल्यास ‘प्लॅन बी’नुसार ट्रेक करता येईल.

> गड किल्ले डोंगर कुठे जात नाही. या आपल्या हव्यासापोटी निसर्ग आणि गड-किल्ल्यांना गुदमरू देऊ नका.

नितेश जाधव
(रिकाम ‘ट्रेक’डा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 5:36 pm

Web Title: crowded forts during monsoon season is big concern scsg 91
Next Stories
1 BLOG : चौथ्या क्रमांकावर धोनी नको; हार्दिक पांड्या हवा
2 BLOG : बांगलादेशी वाघ टीम इंडियाची शिकार करणार?
3 BLOG : विश्वचषक स्पर्धेला अशा रंगतदार सामन्यांची गरज
Just Now!
X