आदरणीय राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांस,

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, तुम्ही डोंबिवलीत सालाबादप्रमाणे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले… गोविंदांच्या सुरक्षेलाही तुम्ही प्राधान्य दिले यासाठी सर्वप्रथम तुमचे आभार. यंदाच्या दहीहंडी उत्सवातून तुम्ही ‘बचत’ असा संदेश दिला आहे. पण मंत्रीमहोदय, तुम्ही हा संदेश देताना तुमच्या याच दंहीहंडी महोत्सवामुळे शहराच्या मुख्यरस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन लोकांचा वेळ आणि इंधन दोन्ही ‘वाया’ जाते, त्यासाठी हा पत्रप्रपंच.

रविंद्र चव्हाणजी, गेल्या आठवड्यात फडके रस्त्यावर तुमचा डॅशिंग अवतार बघितला. आम्हा डोंबिवलीकरांना फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि खड्डे यातून मार्ग काढत पुढे जाण्याची सवय झाली. वर्षानुवर्ष आम्ही या समस्येचा सामना करतो. आमचं रक्तही रोज खवळतं. नागरिक मनातल्या मनात शिव्या घालून आणि पत्रकार या समस्यांवर लेखणी झिजवून थकले. पण तसूभरही परिस्थिती बदलत नाही. चव्हाणजी, फडके रोडवर व्यापारी आणि फेरीवाल्यांमधील वादानंतर तुम्ही फेरीवाल्यांविरोधात जो डॅशिंग पवित्रा घेतला. ते पाहून डोळे धन्य झाले आणि कानावर हात ठेवण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय उरला नव्हता. तुमच्या डोळ्यादेखीत अरेरावी करणाऱ्या फेरीवाल्यांना तुम्ही शिव्यांची लाखोली वाहिली. तुमचा तोल सुटला आणि सुसंस्कृत नागरिकांनाही ते दृश्य बघवत नव्हते. इथे फेरीवाल्यांचे समर्थन करणे हा उद्देश नाही. नेत्याने डॅशिंग असावे पण सार्वजनिक ठिकाणी आपण कसे वागतो, याचे भान नक्कीच ठेवावे.

Action ला तुम्ही दिलेली ती Reaction होती हे मान्य . तुम्ही सूज्ञ आहात, राज्यमंत्री आहात आणि राष्ट्रप्रेम रक्तात भिनलेल्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करता, त्यामुळे मी यावर तुम्हाला सांगणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास. यापुढेही फक्त फेरीवाल्यांमध्येच नव्हे तर रिक्षाचालकांमध्येही कायद्याचा धाक (तेही कायद्याच्या चौकटीत राहून) कसा निर्माण करता येईल, यावर भर द्यावा म्हणजे आम्हा डोंबिवलीकरांची या जाचातून कायमची सुटका होईल.

असो. आता मुद्द्याकडे येतो. तुम्ही बाजीप्रभू चौकात दहीहंडीचे आयोजन करता. ‘कायद्याच्या चौकटी’त राहून तुम्ही हा उत्सव पार पाडता आणि तुमचे हे कौशल्य बघून आम्ही नेहमी थक्क होतो. बाजीप्रभू चौक म्हणजे शहरातील स्टेशनजवळचा परिसर. शहराच्या अनेक भागांमध्ये याच ठिकाणाहून बस किंवा रिक्षा जातात. अशा या वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही दहीहंडीचे आयोजन करुन काय साध्य करता?. यंदा तुमच्या उत्सवात बचत असा संदेश देण्यात आला आहे. ‘बचत आपल्या भविष्यासाठी’ असे पत्रक तुम्ही घरोघरी वाटले. पण चव्हाणजी भविष्यातील बचतीचा संदेश देताना आमच्या वर्तमानकाळातील वेळ आणि इंधन वाया जाते त्याचे काय?

रस्त्यांवर अवाढव्य मंडप उभारून पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करु नये, असा नियम आहे. पण तुमच्या दहीहंडीत सर्रास हा नियम पायदळी तुडवला जातो. अर्थात तुम्ही रितसर परवानगी घेऊनच उत्सव करता यात शंका नाही. तुमच्या दहीहंडी उत्सवावर आक्षेप नाही. आक्षेप आहे तो त्या जागेवर. शहरात मैदाने किंवा मोकळ्या जागा आहेत.  तिथे तुम्हाला सहज परवानगी मिळेल यात शंका नाही आणि सर्वसामान्यांनाही यामुळे अडचणीचा सामना करावा लागणार नाही. पुढील वर्षी तुम्ही आम्हा डोंबिवलीकरांच्या ‘मन की बात’ ओळखून मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करुन नवीन पायंडा पाडाल, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना.

एक डोंबिवलीकर,

विश्वास पुरोहित