News Flash

Thackrey Controversy : अभिजीत, मित्रा, तू चुकलास!

त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ होता-आहे. तुझ्यासारख्या हूशार दिग्दर्शकाला हे कळू नये, ही एक शोकांतिकाच

प्रिय अभिजीत,

“माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदासह शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेतल्या चाणक्यांनी तुला भाविसेचा अध्यक्ष बनवलं. पुढे आदित्य ठाकरे यांची युवा सेना अध्यक्षपदी निवड झाल्याच्या मागे-पुढे हळूहळू भाविसे ही संघटनाच निष्प्रभावी करून गायब केली गेली आणि तुला शिवसेनेच्या चित्रपट सेनेचं अध्यक्षपदही भूषवण्याचा मान मिळाला. पण, तुझं खरं कर्तृत्व दिसलं ते ‘रेगे’ सिनेमाच्या दिग्दर्शनात. खरोखरच, ‘रेगे’ हा एक अप्रतिम सिनेमा होता आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून तुझं नाव मराठी सिनेसृष्टीत अत्यंत आदराने घेतलं जाऊ लागलं.

शिवसेना नेते, खासदार, दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या ‘ठाकरे’ सिनेमाचं दिग्दर्शन करण्याची जबाबदारी तू स्वीकारलीस, तेव्हाच खरंतर माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात पाल चुकचुकली होती. तू शिवसेनेतून बाहेर पडलास तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुला जवळ केलं आणि तुला तोच मानसन्मान दिला, जो काही काळ का होईना पण, तुला शिवसेनेत असताना मिळत होता. इतकंच कशाला, तुला मनसेचं नेतेपदही दिलं गेलं, जे आजवर भल्याभल्यांच्याही वाट्याला आलेलं नाही. असो. सांगायचा मुद्दा हाच की, मनसेचा एक नेता शिवसेनेच्या एका नेत्याची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन करतो, याचं आम्हा सर्वांना कौतुकच होतं.
दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीही तुझ्या या निर्णयाला कधी आडकाठी केली नाही. याची दोन प्रमुख कारणं असावीत.

एक, राज ठाकरे हे स्वत: एक कलावंत आहेत, आणि सिनेमावरचं त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. त्याबाबत तुलाच काय, कुणालाच काही नव्याने सांगायची आवश्यकता नाही.

पण दुसरं कारण अधिक महत्वाचं आहे. तू जो सिनेमा दिग्दर्शित करत होतास, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जीवन-कार्यावरचा सिनेमा होता, आणि बाळासाहेब म्हणजे राजसाहेबांचे दैवत, जणू प्राणच.

या दोन कारणांमुळेच एक दिग्दर्शक म्हणून तुझ्या कामात मनसेकडून कोणताही हस्तक्षेप केला गेला नाही, तुझ्या या नव्या जबाबदारीला विरोध केला गेला नाही, उलट, तू बाळासाहेबांचा सिनेमा दिग्दर्शित करतोयस, याचा सर्वच मराठी माणसांप्रमाणे मनसेतल्या प्रत्येकालाही अभिमानच वाटत होता.

असं असतानाही गेल्या काही दिवसांत माझ्यासारख्या अनेकांना काही गोष्टी खटकत होत्या. पण उगाच चांगल्या कामात अडथळा नको, म्हणून त्या गोष्टी आम्ही कधी चव्हाट्यावर मांडल्या नाहीत. ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन करताना, मग ती टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘बॉम्बे टाइम्स’ पुरवणीतील पेड पब्लिसिटी असो किंवा मराठी-हिंदी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांमधील ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन असो, तू कुठेच आम्हाला दिसला नाहीस. एकाही वृत्तवाहिनीत, वर्तमानपत्रात एक दिग्दर्शक म्हणून तुझी मुलाखत दिसली नाही. बघावं तिथे, सिनेमाचे निर्माते-संजय राऊत! विषय सिनेमातील ‘ठाकरें’साठी वापरण्यात आलेल्या आवाजाचा असो किंवा म्यूझिक लांच पार्टीचा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला निर्माता हजर!!
असं कधी कुठे असतं का?
तो बिचारा नवाजुद्दीन सिद्दीकीसुद्धा प्रत्येक मुलाखतीत एखाद्या पढवलेल्या पोपटाप्रमाणे प्रत्येक उत्तरात ‘राऊतसाब’, ‘राऊतसर’ अशा घोषणा देताना दिसला.

आजवर आम्ही असंख्य सिनेमांच्या प्रमोशनचे इव्हेंट पाहिले, बातम्या केल्या, पण असा ‘चमको’ निर्माता कधी पहायला मिळाला नव्हता. खरंतर सिनेमाच्या दुनियेत दिग्दर्शक हाच सिनेमाचा कॅप्टन मानला जातो. एक कलावंत म्हणून दिग्दर्शक हाच त्याने बनवलेल्या सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. सिनेमा काय आहे, तो बनवताना काय आव्हानं होती, ती कशी पेलली, प्रत्येकाने काय योगदान दिलं, अशा सगळ्या बाबींवर दिग्दर्शकच अधिकारवाणीने बोलत असतो. कारण, आपण बनवलेल्या सिनेमाचा आवाका प्रत्यक्षात काय आहे, याची कल्पना फक्त दिग्दर्शकालाच असू शकते. पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस आम्ही बघतोय ते नेमकं याच्या उलट आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून तुझ्यासाठी काही जागाच ठेवण्यात आली नाही. ही बाब निश्चितच कुणासाठीही शोभनीय नाही.

अर्थात, मला याची पूर्ण कल्पना आहे की, ‘ठाकरे’ हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा काटेरी मुकुट तू घातलास तो फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या प्रेमापोटी. बाळासाहेब हे व्यक्तिमत्वच तसं होतं. पण दुर्दैवाने, सिनेमाच्या निर्मात्यांचा हेतू तुझ्या लक्षात आला नाही.
तुला एक चांगला चित्रपट बनवायचा होता, आणि त्यांना बनवायचा होता प्रचारपट!
त्यांचा अजेंडा फक्त आणि फक्त राजकीय होता.
त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ होता-आहे.
तुझ्यासारख्या हूशार दिग्दर्शकाला हे कळू नये, ही एक शोकांतिकाच म्हणायला हवी.
पण माणसं प्रेमात चूका करतात.
तशी तुझी ही चूक झाली असावी.

आता शेवटचा मुद्दा.

काल ठाकरे सिनेमाचा वरळीच्या एट्रिया मालमध्ये खास शो होता. या शोमध्ये तुला योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. एका बातमीत असं म्हटलंय की, तू उशीरा आलास म्हणून तुला जागा मिळाली नाही. या लोकांना कुणीतरी सांगायला हवं की, विशेष खेळांमध्ये प्रत्येकाच्या जागा आरक्षित असतात. तिथे कुणीही येऊन कुणाच्याही जागेवर बसत नाही. ती काही गल्लीतली प्रचारसभा नाही. असो.

थोडक्यात काय तर, दिग्दर्शकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही, अगदी निर्माताही नाही, कारण दिग्दर्शक हाच सिनेमामागचा मेंदू असतो.

पण, “खरी ताकद ही ५६ इंचाच्या छातीत नाही, तर माणसाच्या मेंदूत असते” असला टुकार प्रचारकी संवाद बाळासाहेबांच्या तोंडी घुसडणा-या निर्मात्याला हे सांगणार कोण?

मित्रा, हा सिनेमा स्वीकारून तू खरंच चुकलास, पण काल तुझा अपमान झाल्यानंतर सर्वजण फेसबुक-ट्विटरवर तुझ्या पाठिशी उभे राहिले.

काहीजणांनी तर हा सिनेमा आम्ही बघणारच नाही, असं जाहीरसुद्धा केलं. हे सगळं तुझ्यावरच्या प्रेमापोटीच. म्हणून तर #isupportabhijeetpanase या हॅशटॅगसह हजारो महाराष्ट्र सैनिक काल रात्रीपासून स्वत:च्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आता तूसुद्धा तुझ्या भावना व्यक्त कर.
आम्ही सर्वजण तुझ्यासोबत खंबीरपणे उभे आहोत.

तुझा चाहता,
कीर्तिकुमार शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 12:17 pm

Web Title: dear friend abhijeet you did a mistake
Next Stories
1 ब्लॉग: …तंत्रयुगातील टोपीवाला, माकडे आणि मतदार ! (उत्तरार्ध)
2 Blog: टोपीवाला,माकडे आणि भारतीय मतदार!
3 मतदारच नव्हे, उमेदवारही कुंपणावर!
Just Now!
X