– सुनीता कुलकर्णी

नेटफ्लिक्सवरच्या ‘सुटेबल बॉय’ या वेबसीरिजमध्ये दाखवलेल्या चुंबनदृश्यावरून आपल्याकडे वातावरण पेटलेलं असताना चिनी नेटफ्लिक्सवर काहीतरी वेगळंच चाललं आहे. नाही… नाही… चीनमध्ये नेटफ्लिक्स नाहीये… पण त्यांच्याकडे असलेला iQiyi हा ओटीटी प्लॅटफार्म नेटफ्लिक्सला समांतर मानला जातो.  तर या चिनी नेटफ्लिक्सवर सध्या ‘डायमेन्शन नोव्हा’ नावाचा एक गाण्यांच्या स्पर्धांचा कार्यक्रम धुमाकूळ घालतो आहे. चिनी प्रेक्षकांना या कार्यक्रमाने मंत्रमुग्ध करून टाकलं आहे. ऑक्टोबर महिन्यात सुरू झालेल्या कार्यक्रमाने चीनमधल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. युट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघायला मिळत असून हे सगळं एडिटिंग या कार्यक्रमाच्या सादरकर्त्यांनी कसं केलं असेल हा प्रश्न युट्यूबवर हा शो पाहणाऱ्यांना पडतो आहे.

या रिअॅलिटी शोचं वेगळेपण म्हणजे त्याचे २२ स्पर्धक खरे नाहीत तर त्या व्हर्च्युअल व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांच्यामध्ये गाण्यांची स्पर्धा घेतली जात आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक मात्र खरीखुरी माणसं आहेत. एंजेलाबेबी ही अभिनेत्री तसंच टीव्ही कार्यक्रमांची सादरकर्ती, ‘नाईन परसेंट’ या बॅण्डचा एकेकाळचा सदस्य वँग लिंकाई आणि ‘द नाईन’ या चिनी बॅण्डचा गायक इस्थर यू हे तिघे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. टेंगर हा मंगोलियन गायक या कार्यक्रमाचा सादरकर्ता आहे.  व्हर्च्युअल व्यक्तिरेखांची गाण्यांची स्पर्धा हा कार्यक्रम काय असू शकतो या उत्सुकतेतून लोकांनी सुरूवातीचे एकदोन भाग पाहिले. त्यात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यावर टीकाही केली पण आता या कार्यक्रमाने चांगलीच पकड घेतली आहे.

या स्पर्धेत कोण जिंकणार, त्याचं पुढे काय होणार ते आज कुणालाच माहीत नाही, पण ‘डायमेन्शन नोव्हा’चा पुढचा सीझन येणार हे आत्ताच निश्चित झालं आहे. आजवर जगभरात वेगवेगळ्या टीव्ही वाहिन्यांवरून अनेक प्रकारचे रिअॅलिटी शो सादर झाले आहेत. त्यातल्या अनेकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. रिअलिटी शोच्या नवनव्या कल्पना, त्यांचं सादरीकरण यातून कल्पकतेचे अनेक अविष्कार बघायला मिळाले आहेत. पण व्हर्च्युअल व्यक्तिरेखांमध्ये स्पर्धा लावून देऊन चिनी कंपन्यांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवं दालनच उघडून दिलं आहे.