– जय पाटील

निवडणुका आल्या की दावे प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोपांच्या आगीत तेल ओतायची संधी सर्वच उमेदवार शोधत असतात. अमेरिका त्याला अपवाद असणं शक्य नाही. तिथल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांचे भांडणसदृश वाद एव्हाना सर्वांनाच परिचयाचे झाले आहे. रोज काहीतरी कारणाने उडणाऱ्या खटक्यांत शुक्रवारी खरेखुरेच ‘पेट्रोल’ ओतले गेले. निमित्त होते जो बायडन यांच्या एका वक्तव्याचे.

‘खनिजतेलावर आधारित उत्पादनांमुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रदूषण होते. त्यामुळे या उत्पादनांचा वापर कमी होत जावा यासाठी मी प्रयत्न करेन. पेट्रोल आणि अन्य उत्पादनांसाठी कालांतराने अपारंपरिक ऊर्जेचे पर्याय शोधलेच पाहिजेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. २०५० पर्यंत हरितगृह वायूचे उत्सर्जन शून्यावर आणणे, हे जो बायडेन यांच्या जाहिरनाम्यातील एक महत्त्वाचे उद्दीष्ट आहे. तेल आणि वायू उद्योगाला देण्यात येणाऱ्या सवलती रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.  बायडेन यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेण्याची संधी डोनाल्ड ट्रम्प सोडते, तर नवलच! ‘हे फार मोठे वक्तव्य आहे. जो बायडेन हे खनिजतेल उद्योग नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. बायडन, तुम्हाला टेक्सास, पेनिनसिल्व्हानिया, ओहियो लक्षात आहेत ना?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

ही तीनही राज्य दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. जो बायडन यांनी खनिजतेलावर आधारित उत्पादनांचा वापर थांबवण्यासाठी २०५० पर्यंतचे लक्ष्य ठेवल्याचे स्पष्ट केले आहे. साहजिकच तेल उत्पादनांवर रातोरात बंदी घालण्यात येणार नसून ३० वर्षांच्या काळात टप्प्याटप्प्याने त्यांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे स्पष्टच आहे. या कालावधीत सौर, पवन आणि जलविद्युत निर्मिती आणि वापर वाढवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना प्रतिस्पर्ध्याच्या वक्तव्याचा विपर्यास करणे, पराचा कावळा करणे आणि मतदारांच्या मनावर आपणच सर्वोत्तम उमेदवार असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न करणे, हे काही नवे नाही. सरतेशेवट मतदार काय अर्थ लावणार हेच सर्वाधिक महत्त्वाचे आहे.