धवल कुलकर्णी

यशाचे पिते अनेक असतात तर पराभव मात्र बेवारस असतो. सरकार स्थापनेत आलेल्या अपयशानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबाबत असलेली नाराजी उफाळून येताना दिसते.

‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाला मिळालेल्या अपयशाच्या कारणांमध्ये बहुजन समाजामध्ये असलेला रोष, तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा व पक्ष नेतृत्वाचा ओव्हर कॉन्फिडन्स व वर्षानुवर्ष पक्षवाढीसाठी कष्ट घेणाऱ्या नेत्यांना डावलल्यामुळे एकूणच समाजात असलेला तीव्र संताप, ही प्रमुख कारणं असल्याचे सांगितले.

आपली मुलगी रोहिनी खडसे खेवळकर हिच्या आपल्या जळगाव जिल्ह्यातील परंपरागत मुक्ताईनगर मतदारसंघात झालेल्या पराभवा मागे पक्षातीलच मंडळी असून आपण ह्या बाबतची माहिती पक्षाच्या हायकमांडला दिलेली आहे. पक्षानेच असे केल्यावर दाद कुणाकडे मागायची? असा उद्विग्न प्रश्न त्यांनी विचारला.

२००९-२०१४ या कालखंडामध्ये विरोधी पक्षनेते असलेले एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानलं जायचं. परंतु ऐनवेळी पक्षाने तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली.

नाथाभाऊ हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, अल्पसंख्यांक कल्याण, अशा अनेक खात्यांचा कार्यभार स्वीकारून मंत्री झाले खरे, पण आपला रोष ते खासगीत बोलून दाखवत. २०१६ मध्ये खडसे यांच्याविरोधात अचानक आरोपांची राळ उडाली. त्यात त्यांचं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या पत्नीची झालेले फोनवरचे कथित संभाषण, पुण्याजवळील भोसरी येथे केलेला जमीन खरेदी व्यवहार अशा अनेक गोष्टी होत्या. शेवटी खडसे यांनी राजीनामा दिला. आपले नेते लवकरच मंत्रिमंडळात पुनरागमन करतील असा दावा त्यांच्या समर्थक वारंवार करायचे, पण शेवटी त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत.

या विधानसभा निवडणुकीत खडसेंना त्यांच्या परंपरागत मुक्ताईनगर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी नाकारली. त्यांच्या बदल्यात तिकीट मिळालेल्या त्यांच्या कन्या रोहिणी यांचा अवघ्या अठराशे मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला तो सुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व बंडखोर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात.

“पक्षाच्या बैठकीत याचे चिंतन होईल. पण प्रथमदर्शनी तर असे वाटतंय की, ओव्हर कॉन्फिडन्स अतिआत्मविश्वास नडला. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष असतील किंवा जे कोण ठरवणारे असतील, असं वाटत होतं की परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे २२० जागा तरी महायुतीच्या येतील. प्रत्यक्षात निवडणुकीच्या टिकीट वाटपाच्या प्रक्रियेत ज्यांनी पक्षासाठी ३०-४० वर्ष काम केले त्यांना डावलण्यात आले. ज्या व्यक्तींनी हा पक्ष उभा करण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे सिरीयस केसेस नाहीयेत (अशांना बाजूला काढण्यात आलं,” असा थेट आरोप खडसे यांनी केला.

“माझ्याविरोधात आरोप झाले. त्या आरोपांची चौकशी झाली. त्यात तथ्य नाही, हे सगळ्यांनाच माहित होतं. पण असेच आरोप असलेल्या इतर काही मंडळींना पक्षात घेण्यात आले,” असे म्हणत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपवासी झालेल्या अनेक नेत्यांची नाव घेतली. अशा लोकांना तर मंत्रीपदं मिळाली. मी, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे बाजूला झालो. त्यामुळे समाजात एक वेगळा संदेश गेला. बहुजन समाज दुखावला गेला. “त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम काही ठिकाणी दिसला,” असे खडसे यांनी आग्रहाने नमूद केले.

आपल्यावर झालेल्या आरोपांची लगेचच नोंद सरकारने घेतली. सरकार किती संवेदनशील होतं. हा संवेदनशीलपणा यांच्या ज्यांच्यावर आरोप झाले त्या इतरांबाबत  का दाखवण्यात आला नाही? “समाज हे कुठेतरी पाहत होता. त्याची नोंद घेत होता. पण, बोलत नव्हता… तिकीट वाटपात मोठ्याप्रमाणावर काही लोकांना डावलण्यात आलं त्याचाही परिणाम झाला. जेव्हा आमच्याकडे सत्ता नव्हती, पैसा नव्हता, त्या कालखंडामध्ये आमच्या १२३ जागा आल्या. आमच्या १२२ व महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एक. युतीसुद्धा नव्हती. आता तर युतीचंच बळ होतं.

मुलीचा पराभव हा पक्षांतर्गत कारणामुळे आहे जाणीवपूर्वक तिला हरवण्यात आले आहे. त्यात आमचेच लोक सक्रिय होते. त्याचे पुरावे मी आमच्या अध्यक्षांना दाखवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना व दिल्लीतील पक्षातल्या वरिष्ठांना हे पुरावे दाखवले आहेत. पक्षातील लोकांनीच जर असं केलं तर दाद मागायची कुणाकडे?” अशी विचारणा खडसे यांनी केली.