सुनीता कुलकर्णी

आपल्यासारखी सामान्य माणसं जे काही हवं नको ते पटकन बोलून टाकतात. पण अतिमहत्त्वाच्या, गर्दीत वावरणाऱ्या व्यक्तींचं तसं नसतं. त्यांना जसं आपल्यासारखा रस्त्यावर उभं राहून एखाद्या गाडीवरचा वडापाव किंवा पाणीपुरी खाता येत नाही, किंवा कटिंग चहा मारता येत नाही तसंच सगळ्यांसमोर भस्सकन हवं ते म्हणता येत नाही. ते अनेकदा काही खुणांचा आधार घेत, सांकेतिक भाषेत त्यांना हवं ते म्हणतात आणि समजणाऱ्याला ते समजून जातं.

ब्रिटनच्या राणीचंही असंच आहे. शंभरीच्या घरातली राणी एलिझाबेथ दुसरी ही जगप्रसिद्ध व्यक्ती आहे. ती कशी वावरते, कसे कपडे घालते, कोणत्या फॅशन करते याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं. तिचे वेगवेगळ्या रंगाचे सुंदर कपडे, अतिशय सुंदर हॅण्डबॅग आणि पर्सेस यांची जगभर चर्चा होत असते.

राणी इतरही अनेक गोष्टींमधून आपल्या राणीपणाचा आब राखून असते. तिला म्हणायचं असतं ते ती प्रत्यक्ष म्हणतेच असं नाही. पण तिच्या काही विशिष्ट हालचाली असतात आणि त्यातून ती तिचं त्यावेळचं म्हणणं सुचवत असते. त्यामधून इतरांनी ते समजून घ्यायचं असतं. राणीच्या वेगवेगळ्या हालचालींचा नेमका अर्थ काय असतो याबद्दलचा एक लेख नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

राणीशी एखादी व्यक्ती बोलत असेल आणि त्या वेळी राणीने तिच्या बोटामधली अंगठी फिरवायला सुरूवात केली तर त्याचा अर्थ राणी अस्वस्थ आहे असा नसतो तर आता आपण हे संभाषण थांबवूया असं ती सुचवत असते.

एखाद्या ठिकाणी गेल्यावर जेवणाच्या टेबलवर बसताना स्त्रिया आपल्या हातामधली हॅण्डबॅग मांडीवर, खुर्चीच्या बाजूला ठेवतात. क्वचित ती टेबलवरही ठेवतात. राणी अशा पद्धतीने सार्वजनिक समारंभात असेल, जेवायला गेली असेल आणि तिने तिची हॅण्डबॅग उचलून समोरच्या टेबलवर ठेवली तर त्याचा अर्थ असा असतो की ती त्या ठिकाणी पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ थांबू इच्छित नाही आणि ती लगेचच तिथून निघून जाणार आहे. राणीने तिची पर्स जमिनीवर ठेवली तर त्याचा अर्थ असा की तिला त्या वेळी बरोबर असलेल्या माणसांचा सहवास अजिबात आवडलेला नाही आणि तिथे आसपास असलेल्या तिच्या माणसांनी काहीतरी निमित्त काढून तिला तिथून बाहेर काढणं तिला अपेक्षित आहे.

राणी सार्जनिक पातळीवर वावरताना तिची हॅण्डबॅग सहसा डाव्या हातात ठेवते. पण डाव्या हातातून तिने हॅण्डबॅग उजव्या हातात घेतली की त्याचा अर्थ ती सुरू असलेल्या संभाषणाला कंटाळली आहे. तिला ते थांबवून बाहेर पडायचं आहे. तिच्या कर्मचाऱ्यांपैकी कुणीतरी येऊन ते संभाषण थांबवायला मदत करणं आणि राणीला तिथून दुसरीकडे नेणं यासाठीचा तो संकेत आहे.

या शाही घराण्यातील लोकांसाठी काही नियम आहेत. त्यानुसार ते सार्वजनिक जीवनात वावरताना राजकीय मतं मांडू शकत नाहीत. पण सांकेतिक पद्धतीने राणी आपली राजकीय मतं मांडत असते. २०१७ मध्ये म्हणजे ब्रेक्झिटसाठीच्या मतदानानंतर ब्रिटिश संसदेच्या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होताना राणीने पिवळ्या रंगाची फुलं असलेली निळी हॅट घातली होती. रंगांचं हे कॉम्बिनेशन युरोपियन युनियनच्या झेंड्याशी मिळतंजुळतं होतं. यातून राणीने तिचं मत मांडलं होतं.
बकिंगहॅम पॅलेसमध्ये म्हणजे राणी राहते त्या राजवाड्यात राणीचं कार्यालय आहे. तिथे राणीची एखादी मीटिंग सुरू असेल आणि तिला ती थांबवायची असेल, बोलणं पुढे सुरू ठेवायचं नसेल तर राणी एक बटण दाबते. समोर बसलेल्या माणसाला तिने काय केलं आहे ते समजत नाही. पण बाहेर असलेल्या तिच्या कर्मचाऱ्यांना तो बझर एेकू येतो. ते येऊन दुसरं काहीतरी तातडीचं काम आल्याचं सांगून समोरच्या माणसाला उठवतात आणि नकोशा माणसांपासून, नकोशा कामापासून राणीची सुटका करतात.

समाप्त