-सुनीता कुलकर्णी
गाबाच्या मैदानावर भारतीय संघाने इतिहास रचला आणि त्या संघाबरोबरच सोशल मीडियामध्ये चर्चेत आले ते तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर. त्यांच्या इतर अनेक गोष्टींबरोबरच ते नेहमी चर्चेत असतात ते त्यांच्या इंग्रजी भाषेवरच्या अप्रतिम प्रभुत्वामुळे. असं प्रभुत्त्व असलेले अनेकजण असतील, पण काहीतरी घडल्यावर प्रतिक्रिया देताना थरूर त्यांच्या सोशल मीडियावरून असे काही शब्द वापरतात की इंग्रजी भाषेची चाहती मंडळी डिक्शनऱ्या, थिसॉरस धुंडाळायला लागतात. अर्थात थरुर यांच्या इंग्रजी प्रभुत्वाला एकाच वेळी प्रचंड कौतुक आणि टीका या दोन्ही गोष्टींना सामोरं जावं लागतं. आताही तेच झालं.
गाबाच्या मैदानावरच्या कसोटीतील भारतीय संघाच्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना थरूर यांनी #wordoftheday हा हॅशटॅग देऊन लिहिलं की ‘epicaricacy. मी काही सूडबुद्धी बाळगणारा माणूस नाही. पण आपली टीम जिंकल्यानंतर अशा कॉमेंट वाचताना आज जास्तच मजा येते आहे.’ या ट्वीटच्या शेजारी मायकेल क्लर्क, रिकी पाँटिंग, मार्क वॉ आदी मंडळींच्या ‘कोहली नसल्यामुळे भारताची टीम कशी तकलादू आहे आणि भारत कसा हरणार आहे’ याबद्दलच्या प्रतिक्रिया आहेत.
या ट्वीटमधून थरूर यांच्या भावना कळतात, ते ठीक आहे पण epicaricacy म्हणजे काय? हा काही नेहमीच्या वापरातला शब्द नव्हे. त्यामुळे नेटिझन्स लागले लगेच कामाला आणि त्यांनी epicaricacy चा अर्थ शोधून काढला. तो होता ‘इतरांच्या दुर्देवामुळे पुन्हा पुन्हा आनंद होणे.’
‘विराट कोहली नसताना भारताने या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला तर ते पुढचं आख्खं वर्ष तो आनंद साजरा करतील’ या ऑस्ट्रेलियाचा माजी कप्तान मार्क वॉच्या विधानावर चिमटे काढत थरूर लिहितात ‘मायकल क्लर्कचं बरोबरच आहे. आता पुढचं सगळं वर्ष हा विजयोत्सव साजरा केलाच पाहिजे. पुढच्या वर्षापासून इंगजीमधून दणके द्यायला (hammering) मी सुरूवात करतोच आहे.’ हे सगळं लिहिताना अजिंक्य रहाणेचं कौतुक करायलाही ते विसरले नाहीत. पण त्यांच्या या दोनतीन ट्वीटपेक्षाही जास्त चर्चा रंगली ती epicaricacy या त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे. कुणी त्याहून अवघड शब्द वापरून आपलं मत व्यक्त केलं तर कुणी लिहिलं की आता या शब्दाचा अर्थ शोधायला शब्दकोश घेऊन बसायला हवं.
एकाने लिहिलं की तुमचा प्रत्येक नवीन शब्द मी माझ्या वैयक्तिक शब्दकोशात समाविष्ट करतो. हे असंच बरीच वर्ष सुरू राहिलं तर माझ्या वैयक्तिक शब्दकोशाचा एनसायक्लोपीडिया होऊन जाईल.
‘तुमचं इंग्रजी इतकं चांगलं कसं?’ असा प्रश्न एका कार्यक्रमात त्यांना विद्यार्थ्यांनी विचारला तर त्यावर त्यांचं उत्तर होतं, ‘मी प्रचंड वाचतो, पण मी कधीही शब्दकोश वापरत नाही. मी भारतात राहतो, पण मी टीव्ही, कॉम्प्युटर, प्लेस्टेशन, मोबाइल यातलं काहीही वापरत नाही. मी फक्त पुस्तकं वाचतो.’
शशी थरूर आपल्या ट्वीटमध्ये नेहमी calumny (निंदा), fatuous (व्यर्थ), rodomontade (बढाईखोर), puerile (मूर्ख आणि अपरिपक्व), farrago (गोंधळाची परिस्थिती), Puritanical patriarchy (कडक नैतिक वृत्तीचे प्रदर्शन), arcana (गुपितं), frisson (भीती किंवा आनंदाची अचानक झालेली जाणीव), असे लोकांच्या फारसे वापरात नसलेले, त्यांना फारसे माहीत नसलेले शब्द वापरून त्यांच्या फॉलोअर्सना शब्दकोश धुंडाळायला भाग पाडतात. त्यामुळे जिज्ञासूंना नवीन शब्द समजल्याचा आनंद होतो तर अशी कसली जिज्ञासा नसणाऱ्यांची असे शब्द समजत नसल्यामुळे चिडचिड होते. या दोन्ही गोष्टींमधून थरूर यांना मात्र आनंद मिळत असावा. कारण ते आणखी उत्साहाने पुढच्या अवघड शब्दाचं ट्वीट करायला घेतात.
समाप्त
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 21, 2021 12:15 pm