सुनीता कुलकर्णी

कोणे एके काळी दहावी- बारावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध व्हायची. या यादीमधल्या पहिल्या पन्नासांचं कोण कौतुक व्हायचं. ही मुलं आपल्याच क्लासमध्ये शिकून गुणवत्ता यादीत आली आहेत हे सांगायला क्लासवाल्यांचीही अहमहमिका लागायची. त्यासाठी आर्थिक व्यवहारही व्हायचे म्हणे. दहावीच्या गुणवत्ता यादीत आलेली ती मुलं म्हणजे जणू काही बुद्धिमत्तेचा, गुणवत्तेचा अर्कच. साहजिकच कमी गुण मिळवलेल्यांच्या वाट्याला आपोआपच हेटाळणी यायची. नंतर अशी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणं जाणीवपूर्वक बंद करण्यात आलं आणि कितीतरी गोष्टी बदलल्या. पण अनेकांच्या मनात हा प्रश्न असतोच की तेव्हा टॉपर्स असलेली ती मुलं आता काय करतात?

इंडियन एक्स्प्रेसच्या रितिका चोप्रा यांनी १९९५ ते २०१५ या २० वर्षांच्या काळात दहावी- बारावीच्या गुणवत्ता यादीत आलेल्या सीबीएससी आणि सीआयएससी बोर्डाच्या ८६ मुलामुलींचा माग घेऊन आता ते काय करतात ते शोधलं आहे.

त्यांच्यापैकी एक जण कॅन्सर फिजिशियन असून तो न्यूयॉर्कमध्ये राहतो. एक हॉवर्डमध्ये प्राध्यापक आहे. एकजण एमआयटीमध्ये पीएच. डी फेलो आहे. एकजण सिंगापूरमध्ये फंड मॅनेजर आहे. तर तब्बल ११ जण गुगलमध्ये नोकरी करतात. १९९१ मध्ये देशाची अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर वयात आलेल्या पिढीच्या आकांक्षा, स्वप्नं यांचा प्रवास या शोधामधून प्रतिबिंबित होताना दिसतो.
या ८६ जणांपैकी निम्म्याहून अधिकजण कायमस्वरुपी किंवा काही काळासाठी परदेशात त्यातही प्रामुख्याने अमेरिकेत निघून गेले आहेत. अमेरिकेपाठोपाठ या मुलांची इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, चीन, कॅनडा या देशांना पसंती आहे. त्यातल्या अनेकांनी आयआयटीमध्ये विज्ञान तंत्रज्ञान या क्षेत्रात आपला पुढचा अभ्यास केला. त्याखालोखात औषध आणि वित्त या क्षेत्रांना या मुलांनी पसंती दिली आहे. त्यांच्यापैकी एकचजण अल्पसंख्य समाजातून आलेला होता, तर एकही दलित किंवा अनुसूचित जातीजमातीमधून आलेला नव्हता.
आपला देश सोडून परदेशात जाण्यामागे त्यांच्यापैकी ७० टक्के मुलांचा उच्च शिक्षण घेणं हा मुख्य हेतू होता. तर ८६ पैकी फक्त १२ जण नोकरीसाठी परदेशात गेले. उदाहरणार्थ आता चाळिशीत असलेल्या कोलकात्याच्या इथेच एमबीबीएस आणि एमडी केलेल्या सोमनाथ बोस यांनी २००८ मध्ये अतिदक्षता सेवेसंदर्भातील अधिक शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठ गाठलं. आता ते तिथेच सहअध्यापक आहेत. ८६ जणांपैकी अशी अनेकांची उदाहरणं इंडियन एक्स्प्रेसच्या या स्टोरीत वाचायला मिळतात.
यापैकी तीन चतुर्थांश मुलं दहावी बारावीत होती तेव्हा त्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या आसपास होतं. त्यांच्यापैकी अर्ध्याहून अधिक मुलं डेहराडून, धनबाद, जमशेदपूर, त्रिवेंद्रम, लकनौ, मीरत अशा टायर टू, टायर थ्री वर्गांमध्ये गणल्या जाणाऱ्या शहरांमध्ये रहात होती. ही बहुतांश महत्त्वाकांक्षी मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली आहेत. विरोधाभासाची गोष्ट म्हणजे आताच्या करोनाच्या महासाथीच्या काळात याच शहरांमध्ये बेकारांचे तांडे निर्माण झाले आहेत आणि याच शहरांमध्ये शाळागळतीचं प्रमाण सर्वाधिक आहे.

आपापल्या गुणवत्तेच्या आधारावर हवं ते मिळवणाऱ्या या मुलांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. पण ते करताना हेही लक्षात घेतलं पाहिजे की ही मुलं कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करताना दिसत नाहीत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठीचं ‘पाणी’ वेगळंच असतं, हेच खरं.
समाप्त