15 October 2019

News Flash

प्रदर्शन प्रभाकर बरवेंचं, गाजावाजा अमोल पालेकरांचा; एक वस्तुस्थिती!

...त्यामुळे बिचारे बरवे आणि त्यांचे मृत्यूनंतर तब्बल चोवीस वर्षांनी होणारे प्रदर्शन बाजूला पडले

पुण्यात पत्रकार परिषेदमध्ये अमोल पालेकर

– सुहास बहुळकर

प्रभाकर बरवे यांच्या 1995 मधील मृत्यूनंतर तब्बल 24 वर्षांनी होणाऱ्या ‘इन साईड द एमटी बॉक्स ‘या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जे काही घडले ते निश्चितच खेदजनक होते. स्वतः बरवे यांचे प्रदर्शन, त्यांची विचार करण्याची पद्धत आणि बरवे यांची चित्रनिर्मिती हे सर्वच विषय या घटनेमुळे बरवें सकट बाजूला पडले. वस्तुतः बरवे यांच्या निधनाला एवढी वर्षे उलटल्यानंतर होणारे हे प्रदर्शन, त्याचे उद्घाटन आणि याप्रसंगी होणारी भाषणे केवळ बरवे व त्यांची चित्रनिर्मिती या विषयावरच केंद्रित असावयास हवी होती असे माझे स्पष्ट मत आहे.

कारण बरवे यांचे व्यक्तिमत्व ! बरवे कायमच कला आणि कलेची शुद्धता याविषयी आयुष्यभर आग्रही होते. कला क्षेत्रातील नव्याने सुरू होणाऱ्या आणि पूर्वापार सुरू असलेल्या मतभेद, इर्षा, निंदानालस्ती, बाजारीकरण आणि राजकारण अशा सर्वच गोष्टींचा त्यांना तिटकारा होता. केवळ कला , कलानिर्मिती मागच्या प्रेरणाआणि कला निर्मितीची प्रक्रिया याबाबत चर्चा करावी यासाठी बरवे कायमच आग्रही असत. बरवे यांचे असे व्यक्तिमत्त्व खरोखरीच त्यांच्या समकालीन, त्यांच्या पूर्वीच्या आणि सध्याच्या कलावंतांचापेक्षा फार वेगळे होते.

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात अमोल पालेकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले व NGMA (नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट) संदर्भात जी वस्तुस्थिती सांगून टीका केली ती योग्यच होती. NGMA मुंबईच्या सल्लागार समितीने स्पष्ट मत यापूर्वीच संबंधितांना तोंडी व लेखी कळविले आहे. याशिवाय सचिव, डायरेक्टर जनरल आणि डायरेक्टर NGMA मुंबई यांना तुम्ही घेत असलेले निर्णय पूर्णतः चुकीचे आहेत हे मी स्वतः देखील स्पष्ट शब्दात प्रत्यक्ष भेटीत सुनावले आहे.

वस्तुतः अमोल पालेकर आम्ही जे बोललो होतो तेच सांगत होते. परंतु ते सांगण्यासाठी, कलावंतांच्या मनातला NGMA बाबतच्या निर्णयाबद्दल असंतोष व्यक्त करण्यासाठी जो प्रसंग आणि जो प्लॅटफॉर्म निवडला तो योग्य नव्हता असे माझे प्रामाणिक मत आहे. अमोल पालेकर यांनी जे केले त्यामुळे बरवे व त्यांचे प्रदर्शन केंद्रस्थानी न राहता वेगळाच विषय महत्त्वाचा ठरला.

आमच्या समितीने ज्या कलावंतांना 2019 डिसेंबर पर्यंत त्यांचे प्रदर्शन करण्यासाठी पूर्ण गॅलरी दिली होती व शासनाच्या निर्णयामुळे रहित झाली, त्यांना मी स्वतः याबाबत एकत्र येऊन काहीतरी करावे असे आग्रहपूर्वक सांगितले होते. अमोल पालेकर यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यासाठी असे व्यासपीठ योग्य ठरले असते. केवळ याच भावनेतून व बरवे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी या प्रदर्शनापेक्षा इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होऊ नये याचं भावनेतून मी जे योग्य वाटले ते केले..

याबाबत मी हे खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की माझी यासंदर्भातील भूमिका अत्यंत प्रामाणिक होती व त्यामुळे मी अमोल पालेकर यांना बरवे यांच्या संदर्भातच बोलावे अशी विनंती केली. NGMA संदर्भात दिल्लीहून घेतले गेलेले निर्णय योग्य नाहीत असे माझेही मत आहे व ते मी अमोल पालेकरांनी सांगण्यापूर्वी स्पष्टपणे अनेकांना सांगितले होते. अमोल पालेकरांनी बरवे यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जे भाषण केले , जे मुद्दे उपस्थित केले त्यामुळे व दिनांक 10 फेब्रुवारी 2019 रोजी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जे काही केले त्यामुळे बिचारे बरवे आणि त्यांचे मृत्यूनंतर तब्बल चोवीस वर्षांनी होणारे प्रदर्शन बाजूला पडले.

सध्या वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनल मधून सुरू असलेल्या बरवे यांच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने सुरु असलेल्या प्रकाराबद्दल दिलीप रानडे आणि माझ्यात wats up वर झालेला संवाद देत आहे. तो पुढील प्रमाणे….
See the irony…Barwe’s exhibition is organised and Amol Palekar is everywhere in news papers and also on TV Channels.Barwe where ever he is…must be thinking
” ये क्या हुआ ”
suhas Bahulkar
यावर रानडे म्हणतात…
” Yes.Unfortunet Barwe ”
( दिलीप रानडे हे बरवे यांचे सगळ्यात जवळचे मित्र…)

जे सुरू आहे ते अत्यंत दुर्देवी आहे !

First Published on February 11, 2019 12:29 pm

Web Title: exibition was of prabhakar barwe but amol palekar became focus