-श्रुति गणपत्ये

मार्च ६, २०२१ रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन विधेयकांच्या विरोधात हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. सरकारबरोबर केलेल्या चर्चाही फार यशस्वी ठरल्या नाहीत. ही तिनही विधयकं सरकारने पूर्ण रद्द करावीत म्हणून त्यांनी मागणी लावून धरली आहे. आधी मुख्य माध्यमांवर या आंदोलनाविषयी फार बातम्या आल्या नाहीत. पण सोशल मीडियाने मात्र या आंदोलनाची दखल घेतली. इतकंच काय तर शेतकऱ्यांनी स्वतःचं वर्तमानपत्र आणि यु ट्यूब चॅनेलही तिथे सुरू केलं. भारतामध्ये शेतकऱ्यांचे मोर्चे, आंदोलनं ही गेल्या काही वर्षांमध्ये प्रकर्षानं वाढली आहेत. पण भारतातलेच नव्हे तर जगभरात शेतकऱ्यांची आंदोलनं होत असतात आणि त्याला त्यावेळची राजकीय, सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरते. या सगळ्या घटनांची दखल परदेशी दृकश्राव्य माध्यमांवरही मोठ्या प्रमाणात घेतली जाते.

नेटफ्लिक्सवर अमेरिकतल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी ‘डॅम्नेशन’ नावाची एक मालिका २०१७ मध्ये प्रदर्शित झाली होती. महामंदीच्या काळामध्ये म्हणजे पहिलं महायुद्ध होऊन गेल्यावर साधारण १९३०-३२मध्ये आयोवा प्रांतात ही कथा घडते. फार्मर्स हॉलिडे असोसिएशन ही सघंटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संप जाहीर करते. हा संप भांडवलदार आणि स्थानिक पातळीवर होणारा भ्रष्टाचार या विरोधात असतो. याचं संघटन एक पाद्री करतो आणि संप मोडून काढयला ‘ब्लॅक लिजिओन’ नावाची ‘क्लू क्लक्स क्लॅन’ पासून फुटून निघालेली एक वंशद्वेषी संघटना पुढे येते. यामध्ये मग संप फोडण्यासाठी हिंसाचार, शेतकऱ्यांची हत्या, स्थानिक राजकारण, वृत्तपत्रांची दुटप्पी भूमिका, शेतजमिनीचा लिलाव, शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न अशी अनेक उपकथानकं येत राहतात. केवळ १० भागांची ही मालिका शेवटपर्यंत उत्कंठा खिळवून ठेवते. अमेरिकेमध्ये तेव्हा घडलेलं शेतकऱ्यांचं राजकारण आणि सध्या भारतात सुरू असलेला शेतकऱ्यांचा उठाव यात अनेक समांतर गोष्टी पाहता येतात. मूळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाला किती वाईट वळण मिळू शकतं हे या मालिकेतून दिसतं.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणारी आणखी नावाजलेली शोध डॉक्युमेंटरी म्हणजे ‘रोटन’. बाजारात लोकप्रिय असणारे, महागडे किंवा रोजची मागणी असलेले अन्नपदार्थ, त्यामागचं राजकारणं, कंपन्यांचं नफ्याचं गणित, पर्यावरणाची हानी आणि त्यासाठी ग्राहक व शेतकऱ्यांचं होणारं शोषण यावर उत्तम भाष्य करते. या अन्नपदार्थांमध्ये मध, चॉकलेट, शेंगदाणे, चिकन, लसूण, अवोकाडो, वाईन असे विविध पदार्थ निवडले आहेत. दोन सिझन आणि १२ भागांमध्ये ही मालिका संपते. चॉकलेटसाठी लागणाऱ्या कोकोचं उत्पादन घेण्यासाठी आफ्रिकेतल्या शेतकऱ्यांना कसं कमी पैशांमध्ये राबवून घेतलं जातं, याचं उत्तम वर्णन आहे. पण ते चॉकलेट मोठे ब्रँड हजारो रुपयांना विकतात. अवोकाडो आरोग्यदायी फळ म्हणून सध्या चांगलीच चलती आहे. अनेक डाएटिशयन, सेलिब्रिटी अवोकाडोला पसंती देतात. त्यामुळे त्याची मागणी अर्थातच खूप जास्त आहे. मेक्सिकोमध्ये उत्पादन असणारं हे फळ नफा देणारं झाल्यानं त्यावर मक्तेदारी सांगायला ड्रग्ज व्यापारीही त्यात उतरले आहेत आणि स्थानिक राजकारणात शेतकरी भरडला जातो आहे. फ्रान्सच्या वाईनला टक्कर देण्यासाठी चीनने कमी किंमतीची वाईन बाजारात आणली आहे. त्यामुळे हवालदिल झालेले फ्रेंच वाईन उत्पादक कमी किंमतीची स्पेनमधील वाईन फ्रेंच वाईन म्हणून विकू लागले आहेत. कंपन्या आणि विक्रेत्यांना फायदा मिळावा म्हणून अनेके अनैतिक क्लृप्त्या योजल्या जातात. त्यातून ग्राहकांच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो.

हिंदी किंवा मराठीमध्येही शेतकऱ्यांचे विषय हाताळले जातात. पण ते खूप भावनिकतेत अडकतात. शेतकरी आत्महत्यांवर भाष्य करणारा एक ओम पुरी यांचा हिंदी चित्रपट ‘प्रोजक्ट मराठवाडा’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. सीमा विश्वास, दलिप ताहिल आणि ओम पुरी स्वतः असे चांगले कलाकार असूनही कथा अगदीच बाळबोध लिहिली आहे. त्यामुळे भारतातल्या शेतकऱ्यांवरती चांगली मालिका किंवा चित्रपट यायला आपल्याला कदाचित परदेशी निर्मात्यांची वाट बघावी लागेल.

shruti.sg@gmail.com

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)