सुनिता कुलकर्णी

फिरण्याची आवड असणारे, सतत कामानिमित्त फिरावं लागतं असे, इकडेतिकडे कुठेतरी गेले आणि अडकून पडले सगळे लोक टाळेबंदीमुळे अनुभवावाव्या लागलेल्या एक प्रकारच्या स्थानबद्धतेला भयंकर कंटाळलेत. त्यातही देशांतर्गत वाहतूक तर सुरू झाली, पण देशाबाहेरच्या प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत. ‘हे विश्वचि माझे घर’ असं म्हणत केल्या जाणाऱ्या मुक्त संचाराला अजूनही परवानगी नाही. काही देशांनी आपले दरवाजे इतरांसाठी उघडले आहेत, तर काही देश अजूनही त्यासाठी तयार नाहीत.

काही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना यायला जायला परवानगी दिली आहे. या व्यवस्थेला सध्याच्या भाषेत म्हणतात ‘एअर बबल’. आपला असा १८ देशांबरोबर ‘एअर बबल’ करार आहे. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, मालदीव, कॅनडा, जपान, बहारीन, अफगाणिस्तान, नायजेरिया, कतार, इराक, ओमान, भुतान, केनिया, बांगलादेश आणि युक्रेन. याशिवाय इटली, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इस्त्रायल, फिलिपीन्स, रशिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि थायलंड या देशांबरोबरही ‘एअर बबल’ करारासाठीची बोलणी सुरू आहेत.

त्याआधी म्हणजे कोविद १९ च्या महासाथीमुळे टाळेबंदी सुरू झाल्याबरोबर लगेचच इतर देशात प्रवासासाठी गेलेल्या आणि तिथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारला काम करावं लागलं. या मिशनला नाव दिलं गेलं, ‘वंदे भारत मिशन’. या मिशनअंतर्गत मे महिन्यापासून इतर देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष आंतरराष्ट्रीय विमान व्यवस्था करण्यात आली. या मिशनअंतर्गत एअर इंडियाने म्हणजेच भारत सरकारने ऑक्टोबर १६ पर्यंत ६,९८७ फ्लाईट्समधून ९.१० लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांची ने आण केली आहे.

त्यानंतर मग जुलै महिन्यापासून वेगवेगळ्या देशांच्या भारतात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी आणि तिथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष ‘एअर बबल करार’ करण्यात आले. ‘एअर बबल’ ही कोणत्याही दोन देशांमधली आपापल्या नागरिकांना परत आणण्यासाठी विमानसेवेचे दर आकारून केलेली व्यवस्था आहे. ज्यांच्याबरोबर ‘एअर बबल’चा करार नाही, अशा काही देशांमधल्या नागरिकांना परत यायचं असेल तर तिथल्या दुतावासाकडे आपल्या नावाची नोंदणी करून आपला नंबर येण्याची वाट बघावी लागते. ‘एअर बबल करार’ झाला आहे, अशा देशांमधल्या नागरिकांना कोविद १९ संदर्भातले सगळे नियम पाळून, विमानसेवा विकत घेऊन आपापल्या पातळीवर परत येता येतं. त्यांना दुतावासाची मदत घ्यावी लागत नाही.

अमेरिकेबरोबर असलेल्या आपल्या ‘एअर बबल’नुसार भारत आणि नेवार्कदरम्यान आठवड्यातून तीन वेळा एअर इंडियाची विमानसेवा रुजू करण्यात आली आहे. एअर इंडियाने लंडन -मुंबई, दिल्ली, बंगलुरू, कोलकाता, अहमदाबाद अशी विमानसेवाही सुरू केली आहे.

काही प्रवासी कोविद पॉझिटिव्ह आढळल्याने हाँगकाँगने १७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान भारत आणि हाँगकाँगदरम्यानच्या एअर इंडिया आणि विस्ताराच्या विमानसेवेवर निर्बंध घातले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही हाँगकाँगने एअर इंडियाच्या हाँगकाँग विमानसेवेवर अशीच बंदी घातली होती. जर्मनीनेही २० ऑक्टोबरपर्यंत भारत – फ्रँकफ्रंट

विमानसेवेवर निर्बंध घातले होते. आता ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दुबईनेही दोन वेगवेगळ्या प्रसंगी भारतातून आलेले प्रवासी कोविद पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारत दुबई विमानसेवेवर निर्बंध घातलेच शिवाय जयपूरची सूर्यम लॅब, दिल्लीच्या डॉ. भसीन पॅथॅलॅब, नोबल डायग्नोस्टिक सेंटर या दोन लॅब आणि केरळची मायक्रोहेल्थ लॅब या चार लॅबोरेटरीकडून येणारे निगेटिव्ह अहवाल नाकारण्याची एअर इंडियाला विनंती केली आहे. सौदी अरेबियानेही आधी काही फ्लाइट्स नाकारल्या पण नंतर पुन्हा सुरू केल्या.

थोडक्यात काय तर आपापल्या घरांचे बबल करून लोक त्यात रहात होते. आता हे बबल थोडे विस्तारले आहेत. काही मोजक्या देशांमध्ये जाणं येणं सुरू झालं आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ म्हणत आपण सगळ्या जगाचं ‘ग्लोबल व्हिलेज’ करायला निघालो होतो. करोनाने आपल्याला ‘आपलं घर हेच आपलं जग’ कसं होऊ शकतं हे काही काळासाठी दाखवून दिलं. आता पुन्हा जग विस्तारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.