25 February 2021

News Flash

ट्रम्पतात्यांना आणखी एक घरचा आहेर

आता 'घर फिरलं की घराबरोबर घराचे वासेही फिरतात' या म्हणीची ट्रम्पतात्यांना आठवण करून देणारी एक मज्जा फ्लोरिडामध्ये घडली आहे.

फाइल फोटो (रॉयटर्स)

सुनीता कुलकर्णी

चार वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका हे नाव डोक्यावर घेणाऱ्यांनी आता तेच नुसतं जमिनीवर आपटायलाच नाही तर धोपटायलादेखील सुरूवात केली आहे. अमेरिकेत या ‘राग-राग ट्रम्पतात्या’च्या वेगवेगळ्या आवृत्त्या सध्या बघायला मिळत आहेत.

अलीकडेच एक व्यंगिचित्र समाजमाध्यमांमधून फिरत होतं. त्यात असं दाखवलं होतं की जो बायडेन यांनी पदभार स्वीकारताच ट्रम्पतात्यांची आठवण पुसली जावी यासाठी सगळ्यात पहिला बदल कुठला केला तर ‘मॅकडोनाल्ड’च्या लोगोमधला ‘डोनाल्ड’ हा शब्द काढूनच टाकला. आणि त्याजागी ‘मॅकजो’ असा शब्द लिहिला.

यातला विनोद जाऊ द्या. आता ‘घर फिरलं की घराबरोबर घराचे वासेही फिरतात’ या म्हणीची ट्रम्पतात्यांना आठवण करून देणारी एक मज्जा फ्लोरिडामध्ये घडली आहे. तिथे ट्रम्प यांच्या रिसॉर्टजवळ एक बॅनर झळकलं. त्यावर लिहिलं होतं, ‘वर्स्ट प्रेसिडेंट एव्हर’ (आजवरचे सगळ्यात बेक्कार राष्ट्राध्यक्ष). या बॅनरचा व्हिडिओ डॅनियल उलफेडर यांनी समाजमाध्यमांवर टाकला आणि त्याच्यावर नेहमीप्रमाणे प्रतिक्रियांच्या फैरी झडल्या.

यातली खरी मजा काय होती माहितीये?

ट्रम्पतात्यांना घरचा आहेर देणारा हा बॅनर कुठल्या भिंतीवर, खांबावर किंवा झाडावर झळकला नव्हता तर तो चक्क आकाशात झळकला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिसॉर्टवरून आपलं विमान नेताना संबंधित वैमानिकाने तो झळकवला होता. या बॅनरपाठोपाठच तात्यांना उद्देशून दुसरा बॅनर झळकला ‘पथेटिक लूजर’.

‘मी व्हाईट हाऊस सोडणारच नाही’ असा हट्ट धरून बसलेल्या ट्रम्प यांनी जो बायडेन यांनी ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदाची शपथ घेण्याच्या काही तास आधी व्हाईट हाऊस सोडलं आणि ते फ्लोरिडामध्ये पाम बीच इथल्या त्यांच्या रिसॉर्टवर गेले. पुढचा काही काळ ते या रिसॉर्टवरच राहणार आहेत, असं सांगितलं जात आहे. तर घरी गेल्या गेल्या ट्रम्प यांचं स्वागत आकाशात असं बँनर झळकवून करण्यात आलं.

ट्रम्पतात्यांना ‘वर्स्ट प्रेसिडेंट एव्हर’ असं जगजाहीरपणे म्हणणाऱया वैमानिकाला नेटिझन्सनी लगेचच ‘बेस्ट पायलट मूव्ह एव्हर’ असं प्रशस्तिपत्रक देऊन टाकलं आहे.

लोक कुणालाही फार काळ डोक्यावर घेऊन नाचत नाहीत असा धडा यातून भल्याभल्यांनी घेण्याची गरज आहे. नाही का?
समाप्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 11:54 am

Web Title: former american president donald trump dmp 82
Next Stories
1 शाळा सुटली… पाटी फुटली…
2 भारतीय जवानांना कडकडीत सॅल्यूट…
3 व्हाइट हाउसमध्ये ‘मेजर’ स्वागत
Just Now!
X