दिलीप ठाकूर

संजय दत्तने ‘बाबा’ नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली ही सध्याची चर्चेतील बातमी, पण धक्कादायक अथवा आश्चर्यचकीत करणारी वगैरे नाही. याचे कारण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सनी मराठी चित्रपटाची निर्मिती करणे आता जणू रुळलंय. महाराष्ट्राने आपल्याला बरेच काही दिले त्याची परतफेड म्हणून ते अशी एखाद्या मराठी चित्रपटाची निर्मिती करतात की सध्या मराठीत विविध विषयांवर चित्रपट निर्माण होताहेत तेव्हा आपणही एकादा कसदार विषय मराठीच्या पडद्यावर आणावा या सदहेतूने ते मराठी चित्रपटाची निर्मिती करतात असा खोचक प्रश्न नक्कीच पडू शकतो. हीच प्रश्न मालिका वाढवायची तर, हिंदीत पन्नास साठ कोटींचा चित्रपट निर्मितीचा धोका आणि तणाव घेण्यापेक्षा मराठी अथवा अन्य प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिणे चांगले असाही विचार होत असावा. आज मराठी चित्रपट जगभरातील अनेक चित्रपट महोत्सवात दाखल होतोय, एखाद्या मराठी चित्रपटाची ऑस्करसाठीची भारताची प्रवेशिका म्हणून निवड होतेय (श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, कोर्ट) तशीच ती आपल्याही चित्रपटाची होऊ शकते असाही एक आशावाद असावा. कोणत्याही भाषेतील चित्रपट निर्मितीची कारणे बरीच, त्या ‘रिअॅलिटी शो’ला हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार्सची मराठी चित्रपटाच्या निर्मितीची भावना आणि भूमिका अपवाद नाही.

महत्त्वाचं म्हणजे, हिंदी स्टारने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हे अगदी वैजयंतीमालाने ‘झेप’ (१९७१) या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हापासून सुरु आहे. तेव्हा मात्र तसे करणे आश्चर्यकारक होते. वैजयंतीमाला साठच्या दशकातील दीपिका पदुकोणच जणू. हिंदीतील त्या काळातील सर्वच टॉपच्या हीरोंची नायिका होती. ‘संगम’ निर्मितीच्या काळात तर राज कपूर आणि तिच्यातील नातेसंबंधात ‘बोल राधा बोल संगम होगा की नही..’ असा ट्विस्ट होता. तिने अचानक मराठी चित्रपटाची निर्मिती करावी? त्या काळात या ‘निर्मितीमागची गोष्ट’ जरा वेगळ्याच कारणास्तव होती. शिवसेनाला खूश करण्यासाठी वैजयंतीमालाने मराठी चित्रपट निर्मितीची ‘झेप’ घेतली असे तात्कालिक राजकीय विश्लेषक म्हणत. यामागचे कारण काय, तर शिवसेनेने तेव्हा मुंबईतील साऊथ इंडियनविरुध्द ‘हटाव लुंगी बजाव पुंगी’ असा नारा देत आंदोलन केले होते. मराठी चित्रपटाची निर्मिती म्हणजे दक्षिण भारतीय मुंबईतील संस्कृतीशी जोडले गेलेत असा निष्कर्ष होय असे म्हटले गेले.

त्यानंतर अधेमधे हिंदी स्टार मराठी चित्रपटाची निर्मिती करू लागला. विद्या सिन्हाने ‘बिजली’ (१९८४) या चित्रपटाची तर शैलेन्द्र सिंगने ‘भुताचा भाऊ’ (१९८९) या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. विद्या सिन्हा म्हणजे सत्तरच्या दशकातील ‘रजनीगंधा’, ‘छोटी सी बात’, ‘पती पत्नी और वो’ अशा स्वच्छ मनोरंजक चित्रपटानी नावारुपाला आलेली अभिनेत्री हे सहज आजच्या पिढीला सांगावेसे वाटते. तर शैलेंद्र सिंग म्हणजे ‘बॉबी’ (१९७३) साठी ऋषी कपूरसाठी गायलेला पार्श्वगायक आणि ‘दो जासूस ‘पासूनचा हीरो. त्या काळात हे मोठे स्टार म्हणून ओळखले गेले. शैलेन्द्र सिंग या चित्रपटाचा निर्माता असल्याने या चित्रपटाच्या पार्टीला अनिल कपूर आल्याचे आठवतयं. हिंदी स्टारच्या मराठी चित्रपटाच्या निर्मितीत असा बोनस गुण मिळतोय.

कालांतराने म्हणजे, गेल्या दशकात हिंदी स्टारच्या मराठी चित्रपट निर्मितीचे प्रमाण वाढलेय. अमिताभ बच्चनच्या एबीसीएल या कंपनीच्या वतीने उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘विहीर’ (२००९) या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाच्या प्रीमियरला जया बच्चन खास हजर होत्या हे विशेष. अक्षयकुमारने राजीव पाटील दिग्दर्शित ‘७१ मैल एक प्रवास’ असा अगदी वेगळा चित्रपट निर्माण केला. अक्षयकुमार चांगले मराठी बोलतो, त्यामुळे त्याने मराठी चित्रपटाच्या निर्मितीचा आनंद घेतला. प्रियांका चोप्राने मराठी चित्रपटाच्या निर्मितीत पाऊल टाकलं ती ब्रेकिंग न्यूज ठरणं स्वाभाविक होते. तिला एकदम मराठी चित्रपटाच्या प्रेमाचे भरते कसे बरे आले हा प्रश्न पडला. आपण उत्तर प्रदेशातील बरेली या छोट्याशा गावातून कॉलेज शिक्षण घेऊन आलो आणि आपली मराठी मुंबईत करिअर झाली म्हणून आपण मराठी चित्रपट निर्माण करावा असे तिला वाटले की काय असा प्रश्न होताच. रोहन म्हापुस्करकडे दिग्दर्शन सोपवत तिने ‘व्हेन्टीलेटर’ या चित्रपटाची निर्मिती करताना आशुतोष गोवारीकरने खूप वर्षांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारली. खुद्द प्रियांकाचीही छोटीशी भूमिका होती. हा चित्रपट खुसखुशीत खुमासदार मनोरंजन करणारा होता. प्रियांका चोप्रा असेच चित्रपट मराठीत निर्माण करणार असेल तर हवेच होते. पण नंतरचा तिने निर्मिलेला ‘काय रे रास्कला’ फारसा मनोरंजक नव्हता. तर त्यानंतर तिने अरुणा राजे दिग्दर्शित ‘फायरब्रॅन्ड’ या चित्रपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे हा चित्रपट डिजिटल मिडियात रिलीज केला. चित्रपट रिलीजसाठी तिने नवीन माध्यमाला पसंती दिली हे विशेष कौतुकाचे आहे. तिने नुसतीच हौस म्हणून मराठी चित्रपटाची निर्मिती केली नाही. आणखीन एक विशेष म्हणजे ‘व्हेन्टीलेटर’ची निर्माती म्हणून तिने मराठी मिडियाला मनसोक्त मुलाखती दिल्या. फार पूर्वी हिंदीचे स्टार काही अपवाद वगळता मराठी मिडियाशी संवाद साधत नसत. (अथवा मराठी मिडियाही हिंदी स्टारचे नखरे कोण सहन करेल म्हणून लांबच राही.) मला प्रियांका चोप्राच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीचा योग आला असता तिचा एक मुद्दा विशेष वाटला. तिने मराठीप्रमाणेच आणखीन काही प्रादेशिक चित्रपट (भोजपुरी वगैरे) निर्मितीचे पाऊल टाकले आणि निर्माती म्हणून उभे राहायचे ठरवले.

माधुरी दीक्षितने ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटातून मराठी पडद्यावर अभिनेत्री म्हणून पाऊल टाकले, पण खरंतर मराठी चित्रपटात भूमिका स्वीकारण्यास तिने बराच उशीर झाला होता. ऐंशी नव्वदच्या दशकात तिची धक धक गर्लची लोकप्रियता भारी असताना ती मराठीत यायला हवी होती. (कदाचित तेव्हा तिचे जाऊ दे, तिच्या हेअर ड्रेसर, मेकअपमन, ड्रायव्हर, बॉय यांचे मानधन मराठी निर्मात्याला परवडले नसते.) याच चित्रपटाच्या निमित्ताने तिच्या भेटीचा योग आला असता तिने म्हटलं की, आता मराठीत खूप वेगळ्या प्रकारचे चित्रपट बनताहेत, चांगले विषय येताहेत, त्यामुळे मराठीत यायला हीच वेळ योग्य आहे. खुद्द माधुरी दीक्षितच हे सांगतेय म्हटल्यावर मी काय बोलणार? माधुरी दीक्षित नेने हिने ‘१५ ऑगस्ट’ या नावाचा मराठी चित्रपट निर्माण करताना स्वतः त्यात भूमिका साकारली नाही. कदाचित निर्माती माधुरीला स्टार माधुरीचे मानधन परवडले नसेल. हा चित्रपट तिने डिजिटल मिडियात रिलीज केला तरी त्याचा ग्लॅमरस प्रीमियर साजरा केला. अगदी हिंदी स्टाईल केला. बकेट लिस्टच्या वेळेस इंग्रजी मिडियात इतक्या मुलाखती दिल्या की अमहाराष्ट्रीय प्रेक्षकांना मराठी चित्रपटाचे आकर्षण आहे हे बहुदा तिला पटले असावे. पण या चित्रपटात तिच्यासोबत भूमिका करणारे (आणि १५ ऑगस्टमध्ये भूमिका साकारलेले) मराठीतील लहान मोठे स्टार इतके आणि असे खुश झाले की पुछो मत. अनेकांना हे सगळे स्वप्नवत वाटले, तर काहींना स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला. हिंदी स्टारच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करताना असंख्य ज्ञात अज्ञात गोष्टी घडतात. बकेट लिस्टसाठी माधुरी माझे गाव चौल, रेवदंडा ( अलिबाग) येथे शूटिंगसाठी आली म्हणून मलाही आनंद झाला आणि रिव्ह्यूत अर्धा स्टार जास्त दिला.

उर्मिला मातोंडकरने ‘माधुरी’ नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली त्यात सोनाली कुलकर्णीला मनाजोगी भूमिका साकारायला मिळाली. उर्मिला मातोंडकरने अगदी ‘नरसिंह’ ( १९९१) पासूनच मराठी मिडियाला सहकार्य केल्याने तिला वेगळे काही करावे लागले नाही. ती मराठी माध्यमात शिकल्याने आणि मराठी वृत्तपत्र व साहित्याचे तिचे वाचन दांडगे असल्याने तिचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहेच.

इतरही काही हिंदी स्टार्सनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि आता त्यात संजय दत्तची भर पडली. त्याचे पिता सुनील दत्त यांनी फार पूर्वी अजंठा आर्टस अशी चित्रपट निर्मिती संस्था स्थापून मुझे जीने दो, मन का मीत, रेश्मा और शेरा, नहले पे देहला इत्यादी चित्रपटांची निर्मिती केलीय. संजय दत्तने मात्र मराठीला प्राधान्य दिले.

हिंदी स्टारची मराठी चित्रपटाची निर्मिती अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा परिपाक असतो हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच, ते म्हणजे केवळ एका मराठी चित्रपटाची संख्या वाढली असे नसते हे तर मान्य कराल ना?