सुट्टी दिली नाही तर नोकरीवर लाथ मारेन पण, गणपतीत गावी गेल्यावाचून कोकणी माणूस काही राहणार नाही…साधारण गणपती आले की असे मीम्स, मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतात. चाकरमान्यांची खिल्ली उडवण्याची तेवढीच संधी इतरांना मिळते. ‘काय तुम्ही कोकणी लोक गणपती आले की उठसूठ कोकणात सुटता? नाही गेलात तर काय फरक पडणार आहे? ‘ असं दरवर्षी मला ऐकायला मिळतं. नोकरी करणाऱ्या माझ्यासारख्या इतर कोकणी लोकांनाही असंच काहीतरी ऐकायला मिळत असणार याची मला खात्री आहे. पण, कोकणात गणपतीत जायला कोकणी माणूस जिवाचं रान का करतो हे प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय इतरांना कळणार नाही हे नक्की!

ढोल, ताशांचा गजरात आगमन सोहळा, भव्य मिरवणुका, आतषबाजी, असा कोणताही देखावा कोकणात नसतो. मुंबईतल्या बाजारीकरणाचा उत्सव बघत मी लहानाची मोठी झाले. हल्ली हल्लीपर्यंत कोकणातला गणपती मी पाहिला नव्हता. कदाचित तिथेही थोड्याफार फरकानं असाच गणेशोत्सव साजरा होत असेल असं मला वाटलं होतं पण सुदैवानं अजूनही तिथल्या उत्सवाला केवळ ‘दिखाव्या’चं गालबोट अजूनही लागायचं आहे. तिथे राहणाऱ्या लोकांनी या उत्सवाचं, संस्कृतीचं पावित्र्य अजूनही जपलं आहे.

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
chhattisgarh, bangaram devi, tribal tradition
आदिवासींमध्ये टाकून दिलं जातं नापास झालेल्या देवांना… आपण सत्ताधाऱ्यांची निदान उलटतपासणी तरी करायला काय हरकत आहे?

कोकणातला गणपती किती साधेपणानं साजरा करतात याची प्रचिती मला पहिल्यांदा दादरमध्ये फिरताना आली. साधारण दादरमध्ये गणपतीच्या निमित्तानं खरेदी करण्यासाठी हजारो लोक येतात. सजावटीचं विविध प्रकारचं सामान, कृत्रीम फुलं. मखर असं बरंच काही येथे पाहायला मिळतं. याच दादर मार्केटमध्ये माझी नजर पहिल्यांदा पडद्यांवर गेली. पिवळ्या, लाल, हिरव्या, निळ्या रंगाचे देखावे असलेले भडक पडदे मला दिसले. असे पडदे पाहिल्यावर माझ्या पिढीतल्या मुलीची जी प्रतिक्रिया असेल तितकी वाईट प्रतिक्रिया मी ते पडदे पाहिल्यावर दिली. पण तरीही एक ठराविक वर्ग ते पडदे खरेदी करत होता. हा वर्ग होता चाकरमान्यांचा. गावी जेव्हा अनेकांच्या घरात मी गेले तेव्हा बहुतेक ९०% घरात गणपतीच्या तिन्ही बाजूनं मला असेच पडदे लावलेले दिसले. वर्षांनुवर्षे अशा प्रकारचे पडदे लावण्याची पद्धत इथे आजही कायम आहे. थर्माकॉलचे मखर, प्लॅस्टिकची फुलं असं सजावटीचं वेड अजूनही कोकणातल्या अनेक घरात शिरायचं आहे.

हरणाची फुलं

 

हिरव्यागार भाताच्या शेतामधल्या चिंचोळ्या वाटेवरून जेव्हा डोक्यावरून लाडक्या गणरायाला कोकणातला माणूस घेऊन येतो तेव्हा ते सुंदर दृश्य पाहाण्यासारखं नेत्रसुख दुसरं कोणतंच नसेल हे मी खात्रीपूर्वक सांगते. कोकणातल्या प्रत्येक घरात बाप्पांची मूर्ती विराजमान होण्याआधी माटी बांधली जाते. ही माटी म्हणजेच लाकडाची मोठी चौकट होय. गणराय जिथे विराजमान होतात तिथे मूर्तीवर ही लाकडाची माटी बांधली जाते .माटीला या मोसमात फुलणारी रानफुलं, फळं, रानातली काही फळं बांधली जातात. यात प्रामुख्यानं दिसतात ती ‘हरणाची फुलं’. साधारण गणपतीच्या आधी पिवळ्या रंगाची लहानशी नाजूक फुलं फुलतात. फुलांच्या रंगावरून इथल्या स्थानिक लोकांनी त्यांना हरणाची फुलं म्हणून नाव दिलं असावं. या फुलांना गणपतीत फार महत्त्व असतं. अनेकांच्या घरात गौरीपूजनाला देखील याच नाजूक फुलांचा वापर केला जातो. हिरव्या सालीची काकडी, नारळ, कागलं, केळी, चिकू, लहानसा चिबूड, आंब्याचा डहाळी अशी फळं लाकडाच्या माटीला बांधली जातात. गणपती विसर्जनाला ही फळं कापून त्याचा प्रसाद गावात वाटला जातो.

 

गौरी पुजनाचं साहित्य

साधारण मुंबईत गणपती विसर्जनात प्रत्येक चौपाटी बाहेर निर्माल्य कलश आणि एक कचऱ्याची गाडी उभीच असते. बाप्पाच्या सजावटीसाठी शहरी लोक जे साहित्य वापरतात ते नंतर कचऱ्यात जातं. पण इथे फळा फुलांची माटी आणि पडद्याव्यतिरिक्त इतर कोणतीही सजावट केली जातं नाही. त्यामुळे विसर्जनानंतर होणारं प्रदूषण कैक पटीनं कमी कोकणात पाहायला मिळतं. फिक्कट गुलाबी आणि हलकेच केशरी रंगाची झलक असलेल्या मूर्ती या कोकणातल्या गणेश मूर्तींचं वैशिष्ट्य. एका पारंगत मुर्तीकाराच्या दृष्टीनं पाहिलं तर मूर्तीत अजूनही सुबकता यायची आहे. पण कोकणी लोकांच्या दृष्टीनं या सर्व गोष्टी गौण मानल्या जातात. बाप्पा कोणत्याही रुपात आपल्या घरी येतो असं इथले लोक मानतात. मग ती मूर्ती सुबकच असायला हवी असा आग्रह कोणाचाही नसतो.

आमच्या घरात गौरी गणपती. पहिल्यांदा मी गावी गेले होते तेव्हा आपल्याही घरी गौरी येणार याचा कोण आनंद मला झाला होता. टीव्हीत दाखवतात तशी आपली गौरी विविध दागिन्यांनी, नटवली जाणार आपणही भरजरी साडी गौरीला नेसवणार अशा कितीतरी कल्पना माझ्या डोक्यात तेव्हा होत्या. पण यापूर्वी कधीही आणि कोठेही न पाहिलेली गौरी मी माझ्या घरात पहिल्यांदा पाहिली. ही गौरी होती पाना फुलांची. दरवर्षी तिथीप्रमाणे पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या दिवशी आमच्या घरी गौरीचं आगमन होतं. संपूर्ण गावात फक्त आमच्याकडेच गौरी येते. सकाळी गौरी आणून तिचं संध्याकाळी विसर्जन केलं जातं.

बांबूच्या परडीला जिला आम्ही ‘पडली’ म्हणूनही ओळखतो तिला हिरवाकंच खण नेसवला जातो. त्यात पाच पानांच्या आंब्याच्या डहाळ्यात बांधलेलं श्रीफळ कलशात सात दगड आणि थोडं पाणी ठेवलं जातं. हा कलश परडीत ठेवला जातो. हरणाची फुलं, हळदीचं रोप एकत्र बांधून त्यावर देवीचं चित्र असलेला कागद बांधला जातो. हे सारं वस्त्रे नेसवलेल्या परडीत ठेवलं जातं. या परडीची विहिरीवर नेऊन पूजा केली जाते.

कोकणातली पारंपारिक गौरी

मग टाळ, तबल्याच्या तालावर गौरीचं आगमन होतं. खरं सांगायचं तर गौरी गणपतीचं जे चित्र माझ्या डोक्यात होतं त्याला पूर्णपणे छेद देणारी आमची गौरी होती. सुरुवातीला गौरी पाहून माझा काहीसा हिरमोड झाला होता, पण नंतर अशाप्रकारे गौरी पूजण्याची दुसरी बाजू कळली तेव्हा मनाला एक वेगळंच समाधान लाभलं. आज अनेक घरात आर्थिक सुबत्ता असली तरी पूर्वी अनेक घरांची परिस्थिती वेगळी होती. म्हणूनच निर्सगात जे उगवतं, पिकतं, धरणीमातेकडून जे मिळतं त्याप्रती आदर दाखवत आमच्याकडे पूर्वजांपासून अशीच गौरी पूजण्याची प्रथा सुरू झाली. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘इको फ्रेंडली’ गौरी असं म्हटलं तर हरकत नाही. गौरींचं विर्सजन नेहमीच विहिरीपाशी आम्ही करतो. एखाद्या झाडाच्या मुळापाशी जिथे मातीही असेल तिथे आम्ही देवीचं चित्र बांधलेलं हळदीचं रोप ठेवतं. त्यावर कलशातलं पाणी ओतलं जातं. हळदीच्या रोपाला मूळ असल्यानं ते पुन्हा तिथं रुजलं जातं. शिवाय पूजेसाठी वापरली जाणारी इतर फुलं असल्यानं खतंही तयार होतं.
संध्याकाळी गौरीविर्सजनानंतर पाच पालेभाज्या एकत्र करून साधीही भाजी केली जाते नाचणीच्या भाकरीसोबत ही भाजी घरी आलेल्या पाहुण्यांना नैवेद्य म्हणून दिली जाते. सकाळीही खोबऱ्याचं वाटणं घातलेली तांदळाची खीर प्रसादासाठी केली. त्यावेळी गावतली अनेक गरिब कुटुंब गौरीच्या निमित्तानं आमच्याघरी जेवायला यायचे, अर्धपोटी आपल्या शेतात राबणाऱ्या अनेक कुटुंबाना भाजी भाकरीच्या निमित्तानं पौष्टीक आहार मिळायचा असं आजी सांगते.

गणपती विसर्जनाच्या दिवशी अनेकजण आवर्जून घरी जेवायला येतात. आजही कोकणातल्या अनेक घरात यादिवशी गावातल्या गरीब लोकांना जेवू घालण्याची परंपरा आहे. शेवटच्या दिवशी बाप्पा त्यांच्या रुपानं घरात जेवायला येतो असं आम्ही मानतो, म्हणूनच माणसात असलेल्या त्या देवापुढे नतमस्तक होऊन त्याचं मन तृप्त होईपर्यंत जेवू घालण्याची परंपरा इथे आहे. ‘तू कोण?’, ‘तुला आमच्या घरी जेवायला कोणी बोलावलं?’ असं बोलण्याची पद्धत इथे नाही. एकवेळ घरचे उपाशी राहतील पण यादिवशी दारात आलेला प्रत्येक जण तृप्त होऊनच घरातून बाहेर पडतो. असं दृश्य कोकणाव्यतिरिक्त क्वचितच एखाद्या घरघुती गणपतीत पाहायला मिळतं असेल.
कोकणात बहुदा अनेक गणपतींचं विसर्जन हे पाचव्या किंवा सातव्या दिवशी होतं. वर्षभर घरी न आलेला आपल्या आई- बाबांना, आजी -आजोबांना न पाहिलेला मुलगा- मुलगी, नातवंड या सणानिमित्त कोकणात येतात. एरव्ही ओसाड पडलेलं घर आनंदानं भरून जातं. सात दिवस रात्रभर भजनाचा, फुगड्यांचा, बाल्या नृत्याचा कार्यक्रम रंगतो. काळ्या वटाण्याची उसळ, खडखडे लाडू, करंज्या असा भजनाचा बेत ठरलेला असतो. आपल्या शहरी लोकांसाठी हा बेत म्हणजे नाक मुरडण्यासारखा असला तरी अनेकजण गोड मानून ते खातात.

कोकणातील घरगुती गणपतीची सजावट

कोकणी माणूस असा एकमेकांशी किती भांडत असला आणि कितीही शेजाऱ्या- पाजाऱ्यांशी वैर असलं तरी गणपतीत मात्र हे वैर बाजूला सरतं. इथे आजही एकट्या गणपतीचं विसर्जन करण्याची पद्धत नाही. विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण गावातील गणपती नदीवर आणले जातात. जोपर्यंत सगळ्या घरातील गणपती विर्सजनासाठी येत नाही तोपर्यंत वाट बघण्याची पद्धत आहे. साऱे घरगुती गणपती नदीकाठी आले की सगळं गाव बाप्पांची शेवटची आरती करतो त्यानंतर बाप्पांपुढे सर्वांच्या सुख समृद्धीसाठी गाऱ्हाणं घातलं जातं आणि मगच बाप्पांचं विसर्जन केलं जातं.

शहरातल्या कानठळ्या बसवणाऱ्या मिरवणुकांचा अट्टहास, बेफाम होऊन अश्लील गाण्यांवर बाप्पाच्या पुढ्यातच नाचणारी तरुणाई, किड्या-मुंग्यासारखी गर्दी, यापासून कोकणातला गणेशोत्सव कैक पावलं दूर आहे. म्हणूनच कोकणी माणूस दरवर्षी गणपतीत गावी का पळतो हे पाहण्यासाठी गणपतीत कोकणात एकदा तरी जावूकच व्हया !

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com