उदय गंगाधर सप्रे

आज ५ जून २०१९, आजपासून बरोबर ७७ वर्षांपूर्वी या भारतभूमीवरचं एक आठवं आश्चर्य आपलं अवतारकार्य समाप्त करत हे नश्वर जग सोडून गेलं. आज त्या आठव्या आश्चर्याचा ७७ वा स्मृतीदिन. ज्याचं नाव आहे मास्टर मदन अमर सिंग ऊर्फ मास्टर मदन.

यानिमित्ताने आज त्याची आठवण झाली आणि त्याच्याबद्दल वाचलेली माहिती आठवून मन सैरभैर झालं. आता ती माहिती व तो सल तुम्हा रसिकांपुढे उघडा केल्याशिवाय चित्ताला स्वस्थता लाभणार नाही आणि सगळं सांगून झाल्यावरही ती लाभेल असं नाहीच. पण निदान माझ्या या संगीतवारीत तुम्हा वारकर्‍यांना सामील करून घेत दिंडी चालल्याचं समाधान तरी नक्कीच लाभेल. ऐका तर ही मनाची तगमग…

पंजाबमधल्या जालंधर (आजचा शहीद भगतसिंग नगर जिल्हा) जिल्ह्यातील अकबर बादशहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असलेल्या कवी अब्दुल रहीम खान—ई—खाना यांच्या नावे वसलेलं गाव खानखाना. दिल्लीला शिक्षण, आरोग्य व भूमी मंत्रालयात कामाला असणार्‍या अमरसिंग यांची पत्नी पूरनदेवी हिला मोहन व शांती या दोन अपत्यांच्या पाठीवर एक मुलगा झाला — ज्याचं नाव ठेवण्यात आलं मदन.

अमरसिंग संगीतशौकीन व प्रो. होमी यांच्याकडून हार्मोनिअम व गाणं शिकत होते. तसंच ते तबलाही छान वाजवायचे. पूरनदेवी शांत व धार्मिक स्वभावाच्या. आईकडून मदनने धार्मिक संस्कार उचलले व वडिलांकडून आपल्या मोठ्या भाऊ मोहन व बहिण शांतीदेवींसारखंच संगीताची आवड उचलली. दिसामासानी मोठा होणारा देखणा मदन आता दोन वर्षांचा झाला. त्याचा संगीताकडील ओढा पाहून शांतीदेवींनी त्याचं संगीताचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं. सूर व ताल यांची ओळख झाली व मदन आता राग शिकू लागला. असं हे प्राथमिक शिक्षण झाल्यावर मदन पंडित अमरनाथ व गोसाई भगवत किशोर यांच्याकडून संगीत शिकू लागला. अत्यंत अवघड रागही तात्काळ आत्मसात करण्याची तल्लख बुद्धी व एकपाठी स्मरणशक्ती मदनला लाभली होती. तो जलतरंग पण छान वाजवी. असे हे अमरसिंगांचे दोन बछडे मदन — मोहन गाण्यात हळूहळू वाकबगार होत होते आणि अचानक मदनचे गुण जगासमोर येण्याचं एक निमित्त घडलं.

आताच्या हिमाचल प्रदेशमधील धरमपूर सॅनिटोरियम येथे विराट संगीत सभा भरली होती आणि गुरुआज्ञेला अनुसरून शांतीदेवी व मदन यांनी संगीतसभेत गाणं म्हटलं. साडेतीन वर्षांचं गोंडस पोरगं मिश्र काफी रागात वंदन हे शारदा नमन करून गायलं आणि अनेक दिग्गज गायक व संगीतज्ञ त्याच्या गायकीनं भारावून व नादावून गेले. त्यांनी मदनला आणखी गाण्याचा आग्रह केला. आणखी २ राग मदननं ऐकवले. आपल्या पहिल्याच कार्यक्रमात मदन अनेक सुवर्णपदकं तर शांतीदेवी एक भारी साडी व सोन्याची अंगठी घरी घेऊन आले. अमरसिंगचा ऊर अभिमानाने आणि डोळे वात्सल्याने भरून आले.

मोहन पण सुरुवातीला मदनसोबत गायचा, पण तर त्याला व्हायोलीन वादनाची आवड निर्माण झाली व तो त्यात प्रवीण झाला. मदन—मोहनची ही कीर्ती भारतभर पसरली व हळूहळू त्यांना भारतातील जवळ जवळ सर्व संस्थानांमधून, राजे—महाराजांकडून, विशेषत: मास्टर मदनला गाण्याची आमंत्रणं येऊ लागली व ती सगळी स्वीकारून मदनने त्या मैफली गाजवल्या. स्थानिक कार्यक्रमांचे रुपये ८० व बाहेरील कार्यक्रमांचे रुपये २५० मदनला मिळत. महिन्याकाठी २०—२५ कार्यक्रम तरी ठरलेलेच. पण मदनला पैशाचा नाही तर गाण्याचा भारी सोस होता.

मदन आईसारखाच भाविक व श्रद्धाळू होता. पांघरुणात गुरूनानकांचं चित्र व जपमाळ घेऊन झोपे. रात्री मधेच जाग आली की स्वारी पद्मासन घालून जप सुरु करी. ताईनं टोकलं की तिच्या समाधानासाठी लगेच अंथरूणावर पडून दाखवी व ताई झोपल्याची खात्री झाली की परत उठून महाराजांचा जप चालू. काही वर्ष गेली आणि वयाच्या आठव्या वर्षी म्हणजे १९३५ साली मदनच्या आवाजात सागर नानिझामीच्या २ गझला रेकॉर्ड करण्यात आल्या. ‘यूँ न रह रहकर हमें तरसाइए, आइए, आ जाइए’ आणि ‘हैरत से तक रहा है जहाने वफा मुझे, तुमने बना दिया है, मुहब्बतमें क्या मुझे’, यानंतर मदनच्या आवाजात आणखी ४ हिंदी गाणी रेकॉर्ड झाली. ‘गोरी गोरी बैया, मोरी बिनती मानो, मन की मन ही माही रहे आणि चेतना है तो चेत ले’ याखेरीज २ पंजाबी गाणीही मदनच्या आवाजात रेकॉर्ड झाली.

देखण्या मदनला एका फिल्म कंपनीवाल्यांनी संत कबीराची भूमिका ऑफर केली. ज्यात गीत व भजनंही गायला मिळणार होती. पण लहान वयात सिनेमात जाऊन त्यानं बिघडू नये या विचारापाई पूरनदेवी व अमरसिंग यांनी याला विरोध केला. मदनची संत नंदसिंगजी महाराजांवर आत्यंतिक भक्ती होती. सन १९४१, महाराज सामल्यातील कुफरी येथे आले होते (जिथे मदनचं सनातन धर्म स्कूलमधे शिक्षण झालं. कारण अमरसिंगचं ऑफिस उन्हाळ्यात सिमल्याला असे. तसं मदनचं शिक्षण दिल्लीच्या रामजस स्कूल व नंतर हिंदू कॉलेजातही झालं.) महाराजांच्या आग्रहाखातर मदन जौनपुरी गायला. त्याच्या तन्मयशील गायकीमुळे अचानक एक आकृती प्रकट झाली. मग महाराजांनी मदनकडून भैरवी गाऊन घेतली तेव्हा ती आकृती अंतर्धान पावली. (ही घटना नंतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली.)

दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधे नुकताच प्रवेश घेतलेला मदन आता जेमतेम सव्वाचौदा वर्षाचा झालेला. त्याला त्या वर्षी कलकत्त्याच्या सार्वजनिक कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. मदननं तिथं बागेश्वरीमधे बिनती सुनो मेरी अवधपुरी के बसिया गायलं. लोक ते ऐकून खुळावले. नऊ श्रोत्यांनी नऊ सुवर्णपदकं जाहीर केली. एकाने ५०० रुपये भेट म्हणून त्याच्या पायावर ठेवले. लोक वाहवा करत त्याच्या निवासस्थानापर्यंत गेले.

मदन कलकत्त्याहून दिल्लीला सीताराम बाजारातील घरी आला. बहिण शांतीदेवी व तिचा नवरा सरदार इंदरसिंग तिथे राहत. इंदरसिंग मदनला आपला मुलगाच मानत व त्याला सायकलवर बसवून अलीपूर रोडवरच्या रेडिओ स्टेशनवर न्यायचे व रेकॉर्डिंग झाल्यावर घरी परत घेऊन यायचे.

एके दिवशी मदनला एकाएकी ताप आला व तो हटेचना. त्या अवस्थेत मदनने रेडिओ स्टेशनवर जाऊन रेकॉर्डिंगच्या वेळा पाळल्या महाराजा. What a dedication & commitment indeed. ३—४ महिने ताप चालूच राहिला. उन्हाळ्यात तो सिमल्याला आला तरी ताप उतरलेला नव्हता. हळूहळू त्याचं कपाळ व हाडाचे सांधे चमकायला लागले. ही चमक हळूहळू वाढत गेल्यावर डॉक्टरांना निदान झालं की मदनला कच्चा पारा दिला गेला आहे व मग लक्षात आलं की दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर कँटिनमधे मदन दूध पीत असे तेव्हा मदनवर जळफळणार्‍या मत्सरी गायकाने त्याच्या दुधातून त्याला कच्चा पारा मिसळून दिला असावा असा अंदाज बांधण्यात आला. मदनच्या शरीरभर ते विष पसरलं आणि अखेर ५ जून १९४२ रोजी वयाच्या जेमतेम साडेचौदाव्या वर्षी हा गानहिरा मास्टर मदन हे जग सोडून गेला.
ही दु:खद वार्ता कळताच सिमल्यातील सारे बाजार आपणहून बंद झाले. मदन त्याच्या शेरवानी, चुडीदार पायजमा या वेषात मिळालेल्या सर्व पदकांनी सुशोभित होऊन अंतिम यात्रेला निघाला होता. मोहनच्या व्हायोलीनची मिंड, शांतीदेवींच्या गायनातील भैरवी आज प्रथमच बेसूर झाली होती.

वाह मदन , निव्वळ ६ हिंदी व २ पंजाबी रेकॉर्डस् व त्यातही सागर निजिमीच्या २ गझला इतक्या लहान वयात गाऊन तू अमर केल्यास. पण असा जिवाला चटका लाऊन का गेलास रे सोन्या? आजही मन आक्रंदून उठतं आणि उसासत म्हणतं…
यूँ न रह रहकर हमें तरसाइये, आइए, आ जाइए.. आइए.. कुछ गाइए…..

घशातील आवंढा आणि डोळ्यांतील अश्रूंच्या पडद्याने जग धूसर झालंय रे सोन्या.. थांबतोय, लिहीवत नाही रे..