– सुनीता कुलकर्णी

‘क्वीन’ सिनेमात हनिमूनला एकटीच गेलेली राणी असो की ‘जब वी मेट’मधली मैं तो अपनी बहुत फेवरेट हूँ असं म्हणणारी गीत असो… वास्तवात देखील असं काहीतरी हटके करणारी, नार्सिसिस्टच नाही तर मेलोमॅग्नेटिक देखील म्हणता येईल अशी माणसं काही कमी नसतात. ब्राझिलमधल्या डॉ. दिएगो रबेला या ३३ वर्षांच्या डॉक्टरचं नावदेखील अशा लोकांच्या यादीतच असायला हवं.

या पठ्ठयाने काय केलं म्हणता ?

त्याच्या लग्नाची सगळी तयारी झाली होती. त्यासाठी ब्राझिलियन चलनात जवळजवळ साडेतीन लाख रियल्स (म्हणजे आपले ५० लाख रुपये) खर्चून झाले होते. पण आयत्या वेळी त्याच्या वाग्दत्त मित्राने, होय मित्रानेच लग्नाला नकार दिला. मग डॉ. दिएगोने लग्नाच्या दिवशी आमंत्रित वऱ्हाड्यांच्या गदारोळात आरशासमोर उभं राहून चक्क स्वत:लाच आय डू म्हटलं. म्हणजे आपल्याकडच्या भाषेत बोलायचं तर स्वत:लाच ‘नातिचरामि… नातिचरामि… नातिचरामि…’ असं वचन दिलं.

त्याबद्दल लिहिलेल्या ब्लॉगमध्ये डॉ. दिएगो म्हणतो, स्वत:शीच लग्न करण्यामधली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला लग्नामधले कोणतेही नियम पाळावे लागत नाहीत. हवं ते करण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य असतं.

असं सगळं असलं तरी लग्न मोडणाऱ्या जोडीदाराबद्दल त्याच्या मनात अजिबात राग नाही. त्याने लग्नाच्या दिवशी त्या जोडीदाराला अतिशय भावूक पत्रदेखील लिहिलं आहे. त्यात तो म्हणतो, ‘आपण दोघांनी या लग्नाच्या दिवसाचं स्वप्न बघितलं होतं. हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता. पण तू या वाटेवरच माझा हात सोडून दिलास. असू दे, मी आज माझ्या स्वप्नविश्वात एकटाच निघालो आहे. तुला जे करायचं आहे, जसं जगायचं आहे, तसं जगायला मिळो या माझ्या शुभेच्छा तुझ्यासोबत असतीलच कारण माझं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि राहील.’

डॉ. दिएगो सांगतो, ‘त्याने लग्नाला नकार दिल्यानंतर मी खूप विचार केला आणि ठरवलं की आपण स्वत:साठी सगळ्या गोष्टी करायच्या कारण आपलं आपल्यावर प्रेम असतंच. एवढी सगळी तयारी केली आहे तर मग लग्नसमारंभ करायचा असं मी ठरवलं. मी आमंत्रित केलेले पाहुणेदेखील प्रेमाने या समारंभाला आले. मला यातून लोकांना सांगायचं होतं की सुखी होण्यासाठी कुणाशी तरी लग्न करण्याची गरज असते असं नाही. बघा तुम्हाला त्याचं हे म्हणणं पटतं का?