एका नवख्या पोराच्या हाती संघाची कमान दिली आणि त्याने संघाला विश्वचषक जिंकून दिलाय अशी उदाहरण क्रिकेटच्या इतिहासात फार क्वचित सापडतील. मात्र भारतात महेंद्रसिंह धोनी नावाच्या अवलियाने हा करिष्मा करुन दाखवला. २००७ साली पाकिस्तानवर अंतिम सामन्यात मात करुन भारताला पहिला टी-२० विश्वचषक मिळवून दिल्यानंतर धोनी हे नाव कोट्यवधी भारतीयांच्या मनात आणि ओठावर यायला सुरुवात झाली. या स्पर्धेनंतर धोनीने कधी मागे वळून पाहिलचं नाही, आणि हळूहळू धोनीचा माही आणि कॅप्टन कूल कधी झाला हे कदाचीत त्यालाही समजलं नसेल. एखाद्या संघाचा कर्णधार कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेंद्रसिंह धोनी उर्फ माही. आज धोनीने ३५ शी ओलांडलेली आहे, मात्र मैदानात वावरत असताना त्याचा उत्साह हा पंचवीशीतल्या तरुणाला लाजवेल असा असतो. विश्वचषक जिंकल्यानंतर तरुण खेळाडूंच्या हाती चषक सोपावून ग्रूप फोटोमध्ये एका कोपऱ्यात उभं राहणं असो किंवा चांगली खेळी करणाऱ्या खेळाडूला विजयी फटका खेळण्यासाठी दिलेली संधी असो…प्रत्येक पातळीवर धोनीने स्वतःची वेगळी ओळख क्रिकेटच्या मैदानात करुन दिलेली आहे.

अवश्य वाचा – Happy Birtday MS Dhoni: महेंद्रसिंह धोनीबद्दल ‘या’ ८ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

यानंतर धोनीने प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा उचलत संघातलं आपलं महत्व अधोरेखित केलं आहे. क्रिकेटचे प्रत्येक नियम कोळून प्यायल्याप्रमाणे धोनी आपल्या संघाची रणनिती आखत गेला आणि दिवसागणिक भारतीय संघाची कामगिरी सुधारत राहिली. आता उदाहरणच द्यायचं झालं तर डीआरएसचं घ्या ना…डीआरएसचं नाव डिसीजन रिव्ह्यू सिस्टिम बदलून धोनी रिव्ह्यू सिस्टिम असं करावं इतक्या पर्फेक्शनने धोनीने या प्रणालीचा वापर केला. कित्येकदा पंचांनी नाकारलेल्या अपीलाला धोनीने तितक्याच आत्मविश्वासाने आव्हान दिलं आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या पंचांच्या पाहणीत धोनीचा निर्णय योग्य ठरायचा. विजेच्या चपळाईने केलेलं स्टम्पिंग असो किंवा दोन पायांच्या मधून चेंडू हलकेच सोडून देत केलेरं रनआऊट…प्रत्येक सामन्यात तुम्हाला धोनीचा विशेष टच हा दिसलाच पाहिजे. बरं हे सगळं झालं कर्णधार म्हणून, फलंदाज म्हणूनही धोनीने मधल्या फळीत भारतीय संघाच्या फलंदाजाचीच्या सर्व व्याख्या बदलून टाकल्या. हेलिकॉप्टर शॉ़टने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई असो किंवा अशक्य वाटणारा विजय आपल्या फटकेबाजीने शक्य करुन दाखवणारी खेळी असो, धोनी भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनला होता इतकं मात्र नक्की!! धाव घेताना बांगलादेशी गोलंदाजाला दिलेली धडक, पत्रकार परिषदेत प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देताना दाखवलेला हजरजबाबीपणा धोनीने वारंवार दाखवून दिला आहे.

खेळ कोणताही असो कुठे थांबाव हे प्रत्येक खेळाडूला कळलं पाहिजे असं म्हणतात. मध्यंतरीच्या काळात कसोटी सामन्यात पराभव स्विकारावा लागल्यानंतर धोनीने, आता हीच ती थांबायची वेळ असं म्हणत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. काही चाहत्यांच्या मते क्रिकेटच्या देवालाही कुठे थांबावं हे कळलं नाही, मात्र माही या बाबतीत वेगळा ठरतो. कसोटीतून विश्रांती घेत वन-डे आणि टी-२० सामने खेळत राहणं हे धोनीच्या प्रगल्भ विचारांचं उदाहरण आहे. सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली असला तरीही यष्टींमागून धोनीच बऱ्याच अंशी संघाचं कर्णधारपद सांभाळत असतो. फिल्ड सेटींग असो, चहल-कुलदीप यांच्यासारख्या गोलंदाजांना यष्टींमागून आपल्या अतरंगी स्टाईलने सुचना देणं असो धोनीने संघातल्या सिनीअर ते ज्युनिअर खेळाडूंसोबत आपल्या संवादाचा धागा जोडून ठेवला आहे. याच अधिकारवाणीने धोनी मैदानात धाव घेण्यासाठी विलंब करणाऱ्या मनिष पांडेलाही शिव्याही घातल्या आहेत.

धोनी मुळचा रांचीचा असला तरीही आयपीएलच्या माध्यमातून त्याने चेन्नईला आपलं दुसरं घर बनवलं आहे. विमान उशीरा येणार असल्याचं कळताच एअरपोर्टवरच बॅग उशाशी घेऊन जमिनीवर झोपणारा धोनी, आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देत पुण्याच्या संघाला अंतिम फेरीत पोहचवणारा धोनी अशी या थलायवाची अनेक रुपं आज क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करुन आहेत. धोनीला संघातून वजा केलं तर भारतीय संघाची कल्पनाही करवता येणार नाही मला…मैदानात न रागवता, आक्रस्ताळेपणा न करता डोक्यावर बर्फ ठेऊन शांत डोक्याने खेळत राहणं हा त्याचा गुणधर्मच आहे, आणि आगामी २०१९ विश्वचषकापर्यंत तो आपल्याला कसाही करुन संघात हवा आहे. आतापर्यंत धोनीने क्रिकेटप्रेमींना जे काही अनमोल आनंदाचे क्षण दिले आहेत, त्यासाठी आपण त्याचे फक्त आभारच मानू शकतो. सध्या त्याच्या निवृत्तीची चर्चाही रंगते अधुनमधून…पण त्याचे चाहते म्हणून हा दिवस जेवढ्या उशीरा येऊ शकेल तेवढा येवो अशी देवाकडे प्रार्थना आपण करुच शकतो. Happy Birthday Mahi & All the Best!!