– केके कौस्तुभ

कॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिक पंड्याने केलेल्या वक्तव्यांवरून उठलेले वादळ थोडक्यात शमले आणि हार्दिकने भारतीय संघात धडाक्यात पुनरागमन केले. चांगलेच झाले. क्रिकेटपटूने खेळत राहिले पाहिजे आणि खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. न्यूझीलंडचा दौरा संपवून हार्दिक लवकरच परत येईल आणि आयपीएलच्या गदारोळात क्रिकेटप्रेमी विसरूनही जातील की तो कॉफी पिताना काय बोलला होता.

मुद्दा असा आहे की हार्दिकची नक्की चूक काय होती? आणि ती घोडचूक असली तरी तिचा क्रिकेट खेळण्याशी काय संबंध होता?

स्वतःच्या खासगी आयुष्याबाबत किती लोक खरे बोलतात? त्यातही प्रेम प्रकरणे, शारीरिक संबंध, फ्लिंग इत्यादींबाबत कितीजण प्रामाणिक आहेत आणि असल्यास त्याची कितपत कबुली देतात? आपल्या समाजाची एकूण मानसिकता बघता अशा गोष्टी लपविणे, त्या अमान्य करणे किंवा त्याबाबत खोटे बोलणे, असाच बहुतांश लोकांचा प्रयत्न असतो. आणि त्यात ते सेलिब्रिटी असतील तर सोयीस्कर सत्य बोलणे किंवा खोटे बोलणे, हे आपोआपच आले.

हार्दिकची चूक काय तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खरे बोलला. सर्वसामान्य तरुण पुरुष पार्ट्याना जाऊन किंवा पब्ज / डिस्कोमध्ये जे करतात तेच साधारणपणे हार्दिक करतो आणि त्याने त्याची कबुली दिली. म्हणजे करतात सगळेच, पण मान्य करणारा एखादाच हार्दिक. तीच त्याची चूक!

भारतातील कुठल्या कुठल्या क्रिकेटपटूंनी किती अफेअर्स केली याचा इतिहास लिहायची वेळ आली तर लांबलचक यादी तयार होईल. आयपीएलच्या पार्ट्यांमध्ये काय काय होते, कोण कोणाशी फ्लर्ट करते, तिथे तरुणींना कसे वागविले जाते, ह्याची ज्याला कोणाला माहिती असेल तो मान्य करेल की बरेच जण हार्दिकचे भाऊबंद आहेत – कमी अधिक प्रमाणात.

आपला पुरुषप्रधान समाज महिलांकडे कशा नजरेने पाहतो, ह्याची ओळख फक्त हार्दिकच्या बोलण्यातून बाहेर आली. काही वर्षांपूर्वी कर्णधार विराट कोहली सुद्धा म्हणाला होता की मुलगी कुरूप असल्याने तो “डेट” सोडून निघून गेला होता. स्त्रीकडे वस्तू म्हणून किंवा उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते हे दुर्दैवाने सत्य आहे आणि हेच सत्य फेअर अँड लव्हली किंवा इतर उत्पादनाच्या जाहिरातींतून किंवा चित्रपटांतून वारंवार दाखविले जाते. असे असताना हार्दिकने काहीतरी अक्षम्य गुन्हा केलाय आणि म्हणून त्याच्यावर आजन्म बंदी घालावी, अशा मागण्या करणे अतिशय गैर आहे.

हार्दिकची मानसिकता चुकीची आहे आणि त्याने स्वतः त्याबद्दल विचार करायला हवा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केवळ दिलगिरी व्यक्त करून काही होणार नाही. हा तात्पुरता इलाज झाला.

सुदैवाने, बीसीसीआयने हार्दिक आणि के एल राहुलला किरकोळ शिक्षा देऊन सोडून दिले. आणि त्यांचे निलंबन “विनापरवानगी (करणला) मुलाखत दिली” ह्या मुख्य कारणावरून केले. हार्दिक, राहुल किंवा अजून कोणीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करावे, प्रेम करावे, तीन-चार अफेअर्स करावीत किंवा ब्लाईंड डेट वर जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात बीसीसीआयने पडू नये. काही महिन्यांपूर्वी गोलंदाज मोहम्मद शमी विरुद्ध त्याच्या पत्नीने अनेक धक्कादायक आरोप केले होते, पण शमी आज भारताचा प्रमुख खेळाडू आहे. त्याच नियमाने, जो पर्यंत एखादी महिला हार्दिकने तिला त्रास दिला, छेड काढली किंवा छळ केल्याची तक्रार घेऊन येत नाही तो पर्यंत बीसीसीआयने ह्या प्रकरणात पडू नये.

२०१९ चा क्रिकेट विश्वचषक काही महिन्यांवर आलाय. इंग्लंडमध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धेत भारताला हार्दिकच्या अष्टपैलू कामगिरीची नक्कीच गरज भासेल. अशा परिस्थितीत हार्दिक निलंबनातून परतलाय आणि चांगला खेळतोय, ही संघासाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. ”कॉफी विथ करण” मध्ये तो काय बोलला ही गोष्ट दुय्यम आहे.

तसेही, करण जोहरच्या कार्यक्रमात षटकार कसा मारायचा किंवा रिव्हर्स स्विंग कसा करायचा इत्यादी चर्चा होणे अपेक्षितच नव्हते. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातले खमंग किस्से आणि चावट विनोद ऐकण्यासाठीच प्रेक्षक हा कार्यक्रम बघतात आणि सांगणारे अशा गोष्टी थोडा मसाला लावून सांगतात. हार्दिकने पण तेच केले आणि त्याला प्रचंड रोषाला आणि ट्रोलींगला सामोरे जावे लागले.

हार्दिक, जे झाले ते विसर, लोकसुद्धा लवकरच विसरतील आणि खेळाकडे लक्ष दे.

पण करणच्या कार्यक्रमात परत जाणार असशील तर बीसीसीआयची परवानगी घे आणि हो, थोडं खोटं बोलायला (ज्याला पॉलिटिकली करेक्ट असं म्हणतात) शिक – त्यासाठी अनेक माध्यम सल्लागार उपलब्ध आहेत.

 

टीप: लेखक हार्दिक पंड्याच्या विचारसरणीचे किंवा विधानांचे समर्थन करत नाही. हार्दिकचे विचार पुरुषी मनोवृत्तीचे प्रातिनिधिक स्वरूप आहेत आणि त्यांचा धिक्कारच केला पाहिजे.