इंग्लंड हा देशच मोठा गमतीशीर आहे. तो भलेही लोकशाही देश असला तरी तिथल्या राजेशाहीचं, राणीचं, राजघराण्यामधल्या लोकांचं तिथल्या सामान्य जनतेला कोण अप्रूप असतं. जगभरातही या राजघराण्यातले लोक काय करतात, कसे जगतात याबद्दल अनेकांना कुतुहल असतं. लोकांना असलेल्या या कुतुहलाची किंमत लेडी डायनाला आपणा जीव गमावून चुकवावी लागली. त्यानंतर पापाराझींचा ससेमिरा काहीसा कमी झाला, पण तरीही अजूनही कधीकधी या कुतुहलापोटी या राजघराण्याने अधिकृत माहिती देण्याआधीच ती फुटते आणि गदारोळ होतो.

यावेळी असं घडलं ते ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज म्हणजेच प्रिन्स विल्यम्स आणि केट मिडलटनच्या बाबतीत. ते दरवर्षी डिसेंबर महिन्यात ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर आपलं सहकुटुंब छायाचित्र प्रसिद्ध करतात. असं छायाचित्र प्रसिद्ध करणं याच त्यांच्या जनतेला ख्रिसमसच्या शुभेच्छा असतात म्हणे. थोडक्यात त्यांच्याकडून हे ख्रिसमसचं शुभेच्छा कार्ड असतं. या वर्षी अजून ख्रिसमसला वेळ आहे. पण त्यांचं असं सहकुटुंब छायाचित्र इंटरनेटवर आधीच लीक झालं आहे.

द इण्डिपेण्डंट या वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या शाही घराण्याच्या एका चाहत्याने प्रिन्स विल्यम्स आणि केट मिटलटनचं त्यांच्या मुलांसहितचं छायाचित्र राजघराण्याने प्रसिद्धीला देण्याआधीच इंटरनेटवर प्रसिद्ध करून टाकलं आहे. या छायाचित्रात हे शाही दाम्पत्य त्यांच्या तीन मुलांबरोबर एका लाकडाच्या बुंध्यावर बसले आहेत. त्यांच्याजवळ फांद्याही दिसत आहेत. आणि त्यांनी अंगात गरम कपडे घातलेले दिसत आहेत. सात वर्षाचा प्रिन्स जॉर्ज, पाच वर्षांची प्रिन्सेस शार्लेट दोन वर्षाचा प्रिन्स लुईस आपल्या आईवडिलांबरोबर एकदम मजेत दिसत आहेत. हे छायाचित्र कुणी, कुठे, कसं घेतलं ते कळत नाही, पण ते शाही घराण्याने प्रसिद्धीला दिलेलं नाही हे संबंधित वृत्तपत्राने नमूद केलं आहे.

करोना महासाथीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात प्रिन्स विल्यम्स आणि त्याचं हे सगळं कुटुंब नॉरफोक इथं वास्तव्याला होते. हे छायाचित्र कदाचित तिथलंच असण्याची शक्यता आहे. पण तरीही इंग्लंडमधल्या लोकांना हे छायाचित्र कुठं घेतलं गेलं, राजघराण्याच्या ख्रिसमस कार्डावरही हेच छायाचित्र असणार का, असे प्रश्न पडले आहेत आणि त्याची उत्तरं मिळण्याची ते वाट बघत आहेत.