30 May 2020

News Flash

BLOG : हॉकी इंडियाच्या नियोजनशून्य कारभाराचा पंचविसावा बळी

हरेंद्रसिंहांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी

पोटाचा विकार झाला असेल तर डोक्याचा उपचार करण्याची उरफाटी पद्धत हॉकी इंडिया काही केल्या सोडायला तयार होत नाहीये. २०१८ च्या अखेरीस भुवनेश्वरमध्ये झालेल्या हॉकी विश्वचषकात भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला. याआधी काही महिने जोर्द मरीन यांना बाजूला सारुन हॉकी इंडियाने हरेंद्र सिंह यांच्याकडे भारतीय संघाची प्रशिक्षकपदाची सुत्र दिली. मात्र आशियाई खेळांमधलं पानिपत, विश्वचषकातला पराभव या सर्व गोष्टींमुळे हरेंद्रसिंहांना आपलं स्थान गमवावं लागलं. २०२० साली होणारं टोकियो ऑलिम्पिक आता तोंडावर आलेलं आहे. अशा परिस्थितीत प्रशिक्षक बदलाचा खेळ करुन हॉकी इंडियाने आपल्या पायावर पुन्हा एकदा कुऱ्हाड मारुन घेतली आहे.

हॉकी विश्वचषकात हरेंद्रसिंहांनी पंचांच्या खराब कामगिरीवर बोट ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचं अध्यक्षपद नरेंद्र बत्रा यांच्या रुपाने सध्या भारताकडेच आहेत. समारोपाच्या सोहळ्याला बत्रा यांनी हरेंद्रसिंहांच्या वक्तव्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती, त्याचवेळी हरेंद्रसिंह यांची उचलबांगडी होणार हे जवळपास निश्चीत झालं होतं. नरेंद्र बत्रा हे सध्या हॉकी इंडिया संघटनेच्या कोणत्याही पदावर नसले, तरीही संघटनेवर असणारं त्यांचं प्राबल्य हे काही लपून राहिलेलं नाही. मात्र कोणत्याही संघटनेवर एखाद्या माणसाचा असणारा एकछत्री अंमल हा नेहमी घातक असतो. जनार्दनसिंह गेहलोत यांच्या रुपाने कबड्डीचं उदाहरण आपल्यासमोर आहेत. हॉकी इंडियाची वाटचालही आता त्याच दिशेने सुरु झालीये.

स्थैर्य हे कोणत्याही संघासाठी महत्वाचं असतं. एखाद्या प्रशिक्षकाला संघातील खेळाडूंसोबत मिसळण्यासाठी काही महिने लागतात. पण पी हळद आणि हो गोरी सारखं तात्काळ निकाल हवे असलेल्या हॉकी इंडियाला हे समजावणार तरी कोण??? खराब कामगिरीचं कारण देत सर्वात पहिले रोलांट ओल्टमन्स यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, खरतंर भारतीय हॉकीचं जागतिक क्रमवारीतलं स्थान वधारण्यामध्ये ओल्टमन्स यांचा मोलाचा वाटा होता. यानंतर त्यांच्या जागी आलेल्या जोर्द मरीन यांनाही अशाच प्रकारे वागणूक मिळाली, आणि यानंतर पदावर आलेल्या हरेंद्रसिंहांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. रुग्णाला औषध दिल्यानंतर काही वेळ बरं होण्यासाठी द्यावा लागतो. पण इतका वेळ थांबणही हॉकी इंडियाला जमणार नसेल तर, मग ऑलिम्पिकची स्वप्न भारताने पाहूच नयेत.

ऑलिम्पिक स्पर्धा या कोणत्याही क्रीडा प्रकाराचं सार आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. २०१८ सालात भारतीय हॉकी संघाला २०२० साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपलं स्थान पक्क करण्याची संधी आली होती. मात्र खंडीभर प्रशिक्षकांची फौज उभ्या केलेल्या भारतीय हॉकी संघाला अशी कामगिरी करणं जमलं नाही. मलेशियाकडून पराभूत झालेल्या भारतीय हॉकीने ऑलिम्पिक प्रवेशाची मोठी संधी हुकवली. आता इथे भारतीय हॉकी संघाच्या खेळाबद्दल मी मुद्दाम काही लिहीत नाहीये. कारण तो मुद्दा वेगळा आहे. ऑलिम्पिक प्रवेशासाठी आंतरराष्ट्रीय हॉकी संघाने, हॉकी प्रो-लीग स्पर्धेची घोषणा केली. मात्र लक्ष्मी जेव्हा तुमच्या कपाळावर टिळा लावण्यासाठी येते, तेव्हा आपण तोंड धुवायला जायचं नसतं असं म्हणतात. हॉकी इंडियाने काही वर्षांपूर्वी या स्पर्धेतून माघार घेतली, आणि आपल्या हाताने ऑलिम्पिकचं दार बंद करुन घेतलं.

आता या स्पर्धेतून माघार घेण्याचं नेमकं कारण काय हे हॉकी इंडियाने आतापर्यंत स्पष्ट केलेलं नाहीये. मात्र काही वर्षांनी आपली चूक लक्षात आल्यानंतर हॉकी इंडियाने आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेकडे पुन्हा एकदा हॉकी प्रो-लीगमध्ये भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हॉकी इंडियाच्या या नियोजनशून्य कारभाराचा परिणाम आता भारतीय संघावर होणार आहे. जून पर्यंत हॉकीतले सर्वोत्तम संघ हे प्रो-लीग स्पर्धेत व्यस्त असल्यामुळे भारताला फारसे सामने खेळण्याची संधी मिळणार नाही. मार्च महिन्यात भारत सुलतान अझलन शहा स्पर्धेत सहभागी होईल. मात्र या स्पर्धेचं वेळापत्रक हॉकी प्रो-लीग स्पर्धा सुरु असल्यामुळे मलेशियाचा अपवाद वगळता भारताला या स्पर्धेत फारसं आव्हान मिळण्याची शक्यता कमीच आहे. यानंतर भारतामध्ये FIH Series Finals स्पर्धा खेळवली जाईल. मात्र इथेली अमेरिका, रशिया, मेक्सिको यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले देश असल्यामुळे भारतीय हॉकी संघाचा कस लागणारच नाही.

वर्षाअखेरीस भारतीय हॉकी संघाकडे ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी एक शेवटची संधी असेल. मात्र, वर्षभर एकही आव्हानात्मक स्पर्धा न खेळणं ही बाब संघाला धोकादायक ठरु शकते. लढाईत अखेरच्या क्षणात हत्याचं टाकून देण्याची भारतीय हॉकी संघाची गेल्या काही वर्षांमधली परंपरा आहे. त्यामुळे हरेंद्रसिंहांची हकालपट्टीकडून हॉकी इंडियाने नेमकं साधलंय काय हा मोठा प्रश्नच आहे. यानंतर नवीन प्रशिक्षकांसाठी हॉकी इंडियाने अर्ज मागवले आहेत, कोणत्यातरी नवीन प्रशिक्षकाकडे पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाची कमान सोपवली जाईल, त्याच्याकडून तात्काळ निकालाची अपेक्षा केली जाईल आणि हे चक्र पुन्हा एकदा असचं सुरु राहिल. मात्र हा इतका आटापिटा करुन ऑलिम्पिकमध्ये भारत पात्र होईल?? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नसावं….

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2019 12:21 pm

Web Title: hockey india sacked head coach harendra singh for failure in debacle at world cup special blog on hockey india mismanagement
टॅग Fih,Hockey India
Next Stories
1 IND vs AUS : हवं ते बोला, मला फरक पडत नाही – रवी शास्त्री
2 Video : या छोट्या जसप्रीत बुमराहची गोलंदाजी पाहिलीत?
3 खेळाडूंना दरवर्षी ५ लाख रुपये देणार
Just Now!
X