– शरद बोदगे

देशात काहीवर्षांपुर्वी ‘ओटीटी प्लॅटफाॅर्म काय आहे?’ असे विचारले तर अनेकांचे माहित नाही असेच उत्तर येत असे. परंतु आता हेच ओटीटी प्लॅटफाॅर्म जेव्हापासून करोना व्हायरसमुळे कर्फ्यु लावला गेला तेव्हा घराघरात पोहचले आहेत. येत्या काही काळात टेलिव्हीजन सेट बंद करावे लागतील की काय एवढ्या वेगाने हे वापरकर्त्यांपर्यंत पोहचतं आहे. जगात सगळीकडे लाॅकडाऊनमुळे नुकसान होतं असताना याचा जबरदस्त फायदा ओटीटी प्लॅटफाॅर्म कंपन्यांना झाला आहे.

ओटीटी अर्थातच ओव्हर द टाॅप किंवा व्हिडीओ ऑन डिमांड सर्विसेस. अशी व्यवस्था जी दृकश्राव्य माध्यमामधील कंटेट थेट लोकांपर्यंत इंटरनेटच्या सहाय्याने पोहचवते, तेही हवं तेव्हा, हवं त्या ठिकाणी. आज भारतात नेटफ्लिक्स, हाॅटस्टार, सोनीलिव्ह, एमएक्स प्लेअर, प्राईम व्हिडीओ, एराॅस नाऊ, अल्ट बालाजी, वुट किंवा झी ५ असे ३० ओटीटी तर १० म्युझिक प्लॅटफाॅर्म आहेत. ओटीटी प्लॅटफाॅर्म्स लोकांपर्यंत अनेकानेक वेबसिरीज, चित्रपट आणत आहेत. त्यात नाविन्याबरोबरचं अतिशय कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहचण्याची ताकदही आहे. मुळात वापरकर्त्यांनाही तोच तोच व्हिडीओ कंटेंट गेली अनेक वर्ष पाहुन कंटाळाही आला असल्याकारणाने त्यांनी याकडे आपला मोर्चा वळवला आहे.

गेल्यावर्षीच अनेक कंपन्यांनी २०२० वर्षासाठी ओटीटी प्लॅटफाॅर्म्समध्ये कंटेंट जनरेशन अर्थात आशय निर्मितीसाठी मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्यात नेटफ्लिक्स(१८.५ बिलियन डॉलर) अमेझॉन ( ८.५ बिलियन डॉलर किंवा अ‍ॅप्पल टीव्ही ( ६ बिलियन डॉलर) अशी काही बोलकी उदाहरणं आहेत. या कंटेंटमध्ये वेगवेगळ्या वेबसिरीज, चित्रपट निर्मिती, डाॅक्युसिरीज, स्टॅंडअप काॅमेडी तसेच काही हटके मुलाखतींच्या सिरीज यांचा समावेश आहे. यात स्पोर्ट्स, मनोरंजन, राजकारण किंवा ट्रॅव्हेलिंग अशा वेगवेगळया क्षेत्रांतील कंटेंटचा समावेश आहे. पाॅडकास्टही यात मागे रहाणार नाही.

अशातच काही ओटीटी प्लॅटफाॅर्म हे वर्षाला ३०० रुपयांपासून ते ४००० हजारांपर्यंत वापरकर्त्यांकडून पैसे घेतात तर भारतातील काही प्लॅटफाॅर्म हे सध्या फ्री असून ते डिजीटल जाहिरातींमधून पैसे कमावतात. काही प्लॅटफाॅर्मवर स्पोर्ट्स किंवा अन्य घडामोडींचे थेट प्रक्षेपण केले जाते तर काहींवर आपल्याला थेट न्यूज चॅनेल्स लाईव्ह पहायला मिळतात. काही चित्रपट व वेबसिरीजवर भर देतात. प्रत्येक प्लॅटफाॅर्मची आपली एक खासियत आहे. त्यामुळे तो-तो वापरकर्ता आपल्या आवडीनिवडीनुसार तो-तो प्लॅटफाॅर्म वापरत असतो.

२०२०मध्ये एवढी मोठी गुंतवणूक करणार असल्याने कंटेंटही त्यापटीत दर्जेदार व मोठ्या प्रमाणावर तयार होणार होता. यावर्षी आयपीएल, ऑलिंपिक्स, एनबीए व टी२० विश्वचषक अशा महत्त्वाच्या स्पर्धा होणार होत्या. खेळांचे लाईव्ह प्रक्षेपण हे ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी आजपर्यंत वरदानच ठरले आहे. अनेक कंपन्यांनी हजारो करोड रुपयांची गुंतवणूक करुन खेळांचे डिजीटल हक्क विकत घेतले आहेत. अगदी स्टार स्पोर्टने बीसीसीआयकडून क्रिकेट सामन्यांच्या डिजीटल हक्कांसाठी करोडो रुपये मोजले आहेत. याचदृष्टीने सर्व ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी २०२० हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे.

आजपर्यंत हे प्लॅटफाॅर्म आपल्या डाऊनलोड्स वाढवून जास्तीत जास्त वापरकर्त्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे अर्थातच गुंतवणूकही मोठी होती. परंतु आता या गुंतवणूकीचे फळ मिळण्याचा काळ या प्लॅटफाॅर्मसाठी आला आहे. अशातच फेब्रुवारी व मार्च महिन्यात कोरोना व्हायरसने जगात थैमान घातला. त्यामुळे खेळांच्या अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. विशेष म्हणजे या स्पर्धा अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. यामुळे याचा फटका ओटीटी प्लॅटफाॅर्म्सला बसेल असेच वाटले, तसा तो बसणारही आहे.

परंतु लाॅकडाऊनची स्थिती उद्भवल्यानंतरचे आकडे हे मात्र ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी आनंद देणारे आहे. सध्या लोक घरातच अडकून पडले. भारतातही २१ दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा झाली. यासारखी परिस्थिती कधीही भारतीयांवर आली नव्हती. त्यातही इंटरनेट सुरु असताना आणि बहुतांश नागरिकांकडे मोबाईल फोन असताना घरात बसताना सोशल माध्यमांवर तरी किती वेळ घालवणार? याचमुळे बऱ्याच नागरिकांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफाॅर्मकडे वळवला. त्यातही १६ ते ३९ वयोगटातील व्यक्तींचा याकडे ओढा तसा जास्तच. याचकारणाने गेल्या १ महिन्यात तब्बल २० टक्क्यांनी या प्लॅटफाॅर्म्सची व्हिवरशीप वाढली आहे.

याच काळात मुंबई, दिल्ली, चेन्नई व पुणे शहरात ही वाढ सर्वाधिक होती. परंतु टिअर २ व टिअर ३ शहरांत आपले पाय रोवण्यासाठी हे वातावरण अनेक कंपन्यांना पोषक ठरले आहे. याचसाठी यातील तीन प्रमुख प्लॅटफाॅर्मने एकत्र येत त्यांची व्हिडीओ क्वाॅलीटी एसडी अर्थात स्टॅंडर्ड डेफिनेशनपर्यंत आणण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे कमी इंटरनेट स्पीड मिळणाऱ्या भागांतही ही माध्यमं लोकं पाहु शकतील. सध्या न्यूज चॅनेल ओटीटी प्लॅटफाॅर्मवरुन पाहण्याचं प्रमाणही बरंच वाढलं आहे. यापुर्वी या माध्यमांवर सकाळी ८ ते १० या वेळेत व संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत सर्वाधिक वापरकर्ते उपभोग घेत असायचे. आता हा व्हिहरशीप पॅटर्नही खूप बदलला आहे. सकाळी यात जवळपास १ तासांची तर संध्याकाळीही २ तासांची सुधारणा झाली आहे. याचबरोबर दुपारी १ ते ३ या जेवणाच्या वेळेतही व्हिवरशीपमध्ये सकारात्मक आकडे समोर आले आहेत. अनेक कंपन्यांचे जेवढे वापरकर्ते ६० दिवसांत वाढतात तेवढे १० दिवसांत अर्थातच १० मार्च ते २० मार्च दरम्यान वाढले आहेत.

या काळात अनेक चित्रपटही प्रदर्शीत झाले होते. परंतु मल्टिप्लेक्स तसेच थिअटर बंद केल्यामुळे हे चित्रपट अक्षरश: आपटले. आता केरळमधील निर्मात्यांनी एकत्र येऊन हे सर्व चित्रपट ओटीटी प्लॅटफाॅर्म्सवर उपलब्ध करण्याबद्दल चर्चा सुरु केल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती बाकी भाषांमधील चित्रपट सृष्टीतही दिसण्याची शक्यता आहे. यामुळे फ्रेश व वेगळा कंटेंट लोकांपर्यंत याच महिन्यात येण्याची शक्यता आहे.

भारताची ओटीटी प्लॅटफाॅर्मची इंडस्ट्री २०२३पर्यंत ११.९७ हजार कोटींची होईल असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केला होता. परंतु या आकडेवारीत येत्या काळात नक्कीच वाढ झालेली दिसणार आहे. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात ३० मुख्य ओटीटी प्लॅटफाॅर्म असून २०२१ पर्यंत याचे वापरकर्त अंदाजे ५०० मिलियन होण्याची शक्यता आहे. याच माध्यमांमुळे टेलिव्हीजनचे अंदाजे १२ मिलीयन वापरकर्ते गेल्या २०१९मध्ये कमी झाले आहेत. याचकारणाने करोना व्हायरस अनेकांना शाप ठरलेला असताना ओटीटी प्लॅटफाॅर्मसाठी मात्र वरदान ठरला आहे.