काही काही प्रथा अशा असतात की त्या कोणत्याही पुस्तकात, धर्मग्रंथात लिहिलेल्या नसतात, किंवा कोणी त्या आपल्यावर लादलेल्या देखील नसतात. केवळ एखाद्या गोष्टीच्या प्रेमापोटी आपले पूर्वज ती गोष्ट करत असतात आणि तीच आवड आपसूक आपल्यातसुद्धा आली असल्यामुळे आपणसुद्धा तेवढ्याच प्रेमानी ती प्रथा पुढे नेत असतो. संक्रांतीला पतंग उडवणं आलं काय आणि दिवाळीला किल्ला करणं आलं काय ह्या सगळ्या गोष्टी अशाच प्रथेचे भाग. ह्या अशाच काही प्रथा आपल्या क्रिकेट धर्मातसुद्धा रुजल्या आहेत आणि त्यातली एक महत्वाची, सर्वांची आवडती म्हणजे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच. दिवाळीत पुणेकर कसे सारसबागेत दीप पूजनला जातात किंवा मुंबईकर गणपती सुरु झाल्या झाल्या लालबागकडे दर्शनासाठी आवर्जून वळतात अगदी तसंच काहीसं असतं मेलबर्नमध्ये. ख्रिसमससाठी सगळी फॅमिली एकत्र आलेली असते आणि त्या गेट टुगेदरचा महत्वाचा भाग म्हणजे ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जायचं मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड म्हणजेच एमसीजीवर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच बघायला! वाह ..सगळं कसं एकदम पूजनीय!

२५-३० वर्षांपूर्वी भारतात केबल टीव्हीचं राज्य सुरु झाल्यावर भारतातल्या क्रिकेटप्रेमींनासुद्धा ह्या बॉक्सिंग डे टेस्टचं भलतंच वेड लागलं. एकतर ख्रिसमसची सुट्टी असते आणि एकूणच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शाळा-ऑफिस सगळीकडे हलकं-फुलकं वातावरण असतं. अशातच पहाटे उठून बॉक्सिंग डे टेस्ट बघायची मजा काही वेगळीच! खरंतर आपला एमसीजीवर झालेल्या बॉक्सिंग डे टेस्टचा इतिहास तसा निराशाजनकच आहे. एमसीजीवर ऑस्ट्रेलियाला शेवटचं आपण हरवलंय ते अगदी ३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८२ मध्ये. त्यानंतरच्या प्रत्येक टूर मध्ये एमसीजी वर टेस्ट मॅच जिंकणं हे आपलं स्वप्न अपूर्ण राहून गेलंय. पण कसंय, ‘दिल से’ सारखा सिनेमा आपल्याला अजिबात आवडत नाही, पण त्यातली गाणी आयुष्यभर आपल्या ओठांवर असतात. टेस्ट मॅचची गम्मत अशीच असते, जरी एखादा सामना आपण जिंकू शकलो नाही पण त्यात काही पॅचेस-काही सेशन्स असे असतात कि आपल्याला भलतेच खुश करून जातात. एमसीजीवर आपल्या बाजूनी रिझल्ट लागले नाहीयेत पण एमसीजी नेहमीच आपल्यासाठी काही ना काही सुखद, आश्वासक आठवणी देऊन गेलीये एवढं नक्की.

भारताची सर्वात महत्वाची गोष्ट जी एमसीजीनी जगासमोर आणली ती म्हणजे, आक्रमकता आणि निर्भीडपणा. २००३-०४ चा आपला ऑस्ट्रेलियायचा दौरा, टेस्ट एमसीजी वर होती होती. बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे अर्थातच स्टेडियम खच्चाखच भरलेलं. Adelaide टेस्ट जिंकून आपण मालिकेत आघाडीवर होतो. अर्थातच कॉन्फिडन्स हाय नोटवर होता. गांगुलीने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. सेहवाग आणि आकाश चोप्रा दोघांनाही ब्रेट ली आणि ब्रॅकेननी बॉल नवीन असताना चांगलंच सतावलं होतं. पण १० ओव्हर्सनंतर पहिला बॉलिंग चेंज झाला आणि वीरूभाऊंनी अचानक गिअर स्विच केला. पहिल्या दिवसाचं पाहिलंच सेशन सुरु असल्याचा त्याच्या बॅटिंग वर काहीही फरक पडला नव्हता. पहिल्या १० ओव्हर्समध्ये केवळ १ चौकार मारणाऱ्या सेहवागनी नंतर अक्षरशः आपल्या तालावर ११ ऑस्ट्रेलिअन्स आणि ६५००० प्रेक्षकांना नाचवायला सुरुवात केली होती. सेहवाग टॉप गिअरमध्ये स्विच झाला होता. पुढच्या २० ओव्हर्समध्ये ९ चौकार आणि एक सिक्स मारून लंचपर्यंत स्वतःच्या ५० रन्स पूर्ण केल्या होत्या. ऑस्ट्रेलियन बॉलर्सचा चेहरा हनिमून पिरियड संपलेल्या नवजोडप्यासारखा झाला होता.

विरेंद्र सेहवाग नावाचं वादळ भारतासाठी ‘ओपनिंग’ करायच्या पूर्वी भारतीय ओपनर्सना ‘डिफेन्सिव्ह’ हाच एक अप्रोचमध्ये खेळायची सवय होती. कितीही फ्लॅट पीच असलं तरी पहिल्या सेशनमध्ये ‘आउट व्हायचं नाही’ हाच महत्वाचा उद्देश असायचा. पुस्तकी क्रिकेट प्रमाणे ते बरोबर असेलही कदाचित, पण आमचा हा विरेंद्र सेहवाग त्याच सगळंच तंत्र, त्याचे नियम सगळंच वेगळं होतं. लंच ब्रेकमध्ये आम्हाला स्वस्थ बसवत नव्हतं, कधी एकदा सेहवाग शो सुरु होतोय असं झालं होतं. ५१ हा त्याचा ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट हायेस्ट स्कोअर झालाय हे ऐकून धक्का बसला. आता विकेट तेवढी फेकू नकोस पण तुझी ही दिवाळी अशीच सुरु ठेव अशा दोन विरोधाभास करणाऱ्या प्रार्थना सुरु झाल्या होत्या.

सेहवागचं गणितच वेगळं असतं, त्याचा ताल- त्याची लय त्यालाच कळते. त्याच्या करियरमधलं सगळ्यात बाप असं सेशन आता सुरु झालं होतं. लंच टू टी या दुसऱ्या सेशनमध्ये भारताने तब्बल १३० रन्स चोपल्या… ऑल थँक्स टू सेहवाग. त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियन बॉलिंग शालेय दर्जाची वाटू लागली होती. ह्या २ तासात एकट्या सहवागनी ९० एक रन्स काढल्या होत्या. एका सेशनमध्ये एकाच बॅट्समननी एवढ्या रन्स काढलेल्या बघायची सवयच नव्हती. हा जलवा फ़ारच उत्साह वाढवत होता. आकाश चोप्रा बरोबर १४१ आणि द्रविड बरोबर १२० वगैरे रान्सची पार्टनरशिप केली वीरूनी. ह्या अशा पार्टनरशिपमध्ये चोप्रा/द्रविडसाठी काम खूप सॊप्प आणि मनोरंजक रोल होता होतं. एक रन काढून वीरूला स्ट्राईक द्यायची आणि आपण समोर उभं राहून निवांतपणे वीरुचे फटाके बघायचे. वीरू खरंच इतका निर्भिडपणे ते मैदान गाजवत होता कि त्याला पर्सनल माईलस्टोनची काहीही चिंता नव्हती. त्याचं त्याकडे लक्ष देखील नव्हतं. ५०,१०० आणि १५० असे तीनही अतिशय महत्वाचे माईलस्टोनच्या जवळ असताना सर्वसाधारणपणे बॅट्समन लोकं एक-दोन रन्स काढून , सावध खेळून आपलं ऑब्जेक्टिव्ह अचिव्ह करतात..पण वीरू तो…त्याचे रुल्स वेगळेच होते. ह्या मॅचमध्ये ५०,१०,१५० च्या जवळ असताना त्यानी बिनधास्तपणे बॉण्ड्री मारून शतक,अर्धशतक पूर्ण केलं. हे कमालीचं दृश्य होतं, एकदम युनिक असं. ह्याच आवेशात तो पूर्ण दिवस खेळात होता. एमसीजीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांनी चेंडूची टूर केली होती. लेगस्पिनर मॅकगिलला तर ‘नको हे क्रिकेटमध्ये करियर’ अशा मानसिक अवस्थेत सेहवागनी पोचवलं होतं.

समोरून चोप्रा, द्रविड आणि सचिनदेखील आउट झाले होते, अशा वेळेस सेहवाग तू जरा शांत घे, आपल्या तू हवा आहेस असं मनात वाटत होतं. साहेब १८९ वर खेळत होते आणि भारत ३००/३. ऑस्ट्रेल्याचा पार्ट टाइम बॉलर कॅटीच बॉलिंग करत होता. पहिल्याच दिवशी पार्ट टायमरला बॉलिंग करायला लागणं म्हणजे ऑस्ट्रेलिया सेहवागसमोर हतबल झाल्याची साइन होती. कॅटीचला एक लांब ६ मारून वीरू १९५ वर पोचला, मनात शंकेची पाल चुकचुकलीच. आता प्लिज ६ मारायला नको जाऊस, १-२ काढून २०० पूर्ण कर असं मनात म्हणेपर्यंतच कॅटीचनी अतिशय सोपा असा फुलटॉस टाकला आणि सेहवागनी त्याच्या स्वभावानुसार स्वार्थ बाजूला ठेवून शॉट मारला…आणि घात झाला. संपूर्ण दिवसात त्याचा मिसटाइम झालेला हा पहिला शॉट आणि सेहवाग १९५ रन्स वर बाद. प्रत्यक्ष उपस्थित असलेले हजारो आणि टीव्हीवर बघणारे लाखो लोकं शांत झाले. वादळ म्हणावं- तुस्नामी म्हणावी जे काही असेल ते अचानक शमलेलं होतं. पण रंगीत दिव्यांनी नटलेल्या ख्रिसमस ट्री सारखाच आनंद देऊन तो गेला होता… सचिन-द्रविड सारखी टेक्निक नाही, लक्ष्मणसारखं खडूस टेस्ट क्रिकेट नाही…पण तो विरेंद्र सेहवाग होता. त्याच्यासाठी त्यानींच लिहिलेल्या रुलबुकला फॉलो करत “फुटवर्क? माय फूट .!” अशा काहीशा आवेशात त्यानी भारताचा एकदम निर्भीड असा नवीन चेहरा जगासमोर आणला होता…दुर्दैवाने आपण ती मॅच हरलो पण वीरू १९५ आयुष्यभर लोकांच्या मनात पुरेल असाच होता.

ह्याच एमसीजीनी सेहवागसारखाच आक्रमक आणि निर्भीड अटीट्युड जगासमोर आणला २०१४च्या दौऱ्यात. भारताला २०११ आणि २००७ च्या दौऱ्यात बॉक्सिंग डे टेस्ट जिंकण्यात अपयश आलं होतं. २०१४ मध्ये आपण २-० नी सिरीजमध्ये मागे पडलो होतो. टीम खचली होती. ऑस्ट्रेलियानी पहिल्या इनिंग मध्ये ५७० रन्स केल्या होत्या. आपल्यासाठी वाईट इतिहास असलेल्या एमसीजीवर आता हरायचं नाही हाच एक मोठा ‘गोल’ आपल्यासमोर होता. चांगल्या सुरवातीस १४८-३ अशा काहीशा अवघड अवस्थेत भारत होता. फॉलोऑन टाळायचा हे आपलं पाहिलं ध्येय होतं. आपली मिडल ऑर्डर ह्या दौऱ्यात पहिल्यांदाच सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली अशा फॅब फोर शिवाय खेळत होती. कोहली आणि अजिंक्य रहाणे मैदानात होते. भिन्न स्वभावाचे हे दोघेही मैदानात ठाण मांडून होते. कोहली राजासारखा खेळत होता…ऑफ ड्राइव्ह, फ्लिक, पूल ..अशा सगळ्या शस्त्रांवर त्याची मक्तेदारी पुन्हा सिद्ध करत होता.

अचानक कांगारुंनी स्लेजिंग करायला सुरवात केली. मिचेल जॉन्सन ह्या स्लेजिंगमध्ये सगळ्यात पुढे होता. त्या स्लेजिंगमुळे त्यांना जे हवंय तेच साध्य होत होतं. फॉर्मात असलेला कोहली चांगलाच डिस्टर्ब झाला होता. त्याचे शॉट्स चुकायला लागले, परिणामी समोरून जॉन्सनलासुद्धा जरा जास्तच जोश आला होता. म्हत्वाची विकेट पडण्याच्या वाटेत होती. ह्या अशा नाजूक वेळेस ‘पार्टनरशिप’ हा टेस्ट क्रिकेटचा अतिशय महत्वाचा भाग ठरतो. कोहली-जॉन्सन हे युद्ध समोरून अजिंक्य रहाणे शांत, निर्विकारपणे बघत होता. कांगारुंच्या वर्बल स्लेजिंगकडे डेलीब्रेटली इग्नोर केल्यासारखा तो मैदानात उभा होता. “अजिंक्य ग्राउंड में येडा बन के पेढा खाता है” हे रोहित शर्माचं वाक्य रहाणेनी तंतोतंत पाळलं. सिनियर कडून ज्युनिअरनी खेळाची सूत्र हाती घेतली…अजिंक्य रहाणेनी पुढच्या काही ओव्हर्समध्ये जॉन्सनचा यथेछ समाचार घेतला. जॉन्सनला पुढे येऊन लेग साईडला त्यांनी मारलेले फटके म्हणजे नेहमी कोपऱ्यात शांत बसणाऱ्या, होमवर्क पूर्ण करणाऱ्या मुलाने सदैव खोड्या काढणाऱ्या दंगेखोर मुलाला अंगठे पकडून उभं केल्यासारखं होतं.

त्याचा हा सर्जिकल अटॅक चांगलाच इफेक्टिव्ह होता. एका दगडात दोन पक्षी मारले गेले गेले… एकीकडे जॉन्सनचा स्पेल संपवला गेला आणि तिकडे आपल्या कर्णधार कोहली पुन्हा त्याच्या लयीत बागडू लागला. किंबहुना थोडा जास्तच फ्री बर्ड सारखा झाला. पुन्हा एकदा धावांचा पाऊस सुरु झाला. एमसीजीवर ढोल-ताशाचा आवाज घुमू लागला. कोहली-राहणेनी एकत्र २५० रन्स जोडल्या होत्या. कोहली १७४ तर राहणे १४७ वर बाद झाले. आपण ही टेस्ट ड्रॉ करण्यात यशस्वी झालो. गेल्या काही वर्षातला बॉक्सिंग डे टेस्टमधला हा आपला बेस्ट टीम परफॉर्मन्स ठरला होता. एमसीजीवर विजयानी नेहमीच हुलकावणी दिलीये आपल्याला…पण काही पॉझिटिव्ह मुमेंट नक्कीच दिल्यात. सेहवाग, रहाणे आणि किंग कोहली अशा ३ भिन्न वृत्तीच्या बॅट्समन कडून नवीन आणि बदललेल्या आक्रमक भारताचं दर्शन लाखो लोकांना दिलं. आता २६ पासून पासून तिसरी कसोटी एमसीजीवर सुरु होतेच आहे, त्यातसुद्धा आक्रमक भारत विजय रथात स्वार होईल आणि न्यू इयरचे फटाके मेलबर्नमध्येच वाजतील अशी आशा आपण करुयात.