– सौरभ करंदीकर

सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की डोळ्यासमोर येते भव्य सजावट, मोठमोठे ‘मंडप’ आणि गणेश भक्तांच्या गर्दीत अडकलेल्या दुचाकी, रिक्षा, टॅक्सी आणि इतर गाड्या. अशावेळी घराबाहेर पडायचं तर हवी अपार गणेशभक्ती आणि गुगल मॅप्सची साथ! रस्त्यावर ट्रॅफिक किती आहे याचा अचूक अंदाज देतात गुगल मॅप्समधले विविधरंगी रस्ते आता आपल्या सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. परंतु गणरायाची सार्वजनिक प्रतिष्ठापना नक्की कुठे कुठे आहे, आणि त्यामुळे वाहतुकीवर काय परिणाम होईल हे सुद्धा गुगल मॅप्स समजलं असतं तर?

अनेकांच्या डोक्यात असा विचार याआधी नक्कीच डोकावून गेला असणार. त्यातही गुगल मॅप्सवर ज्याप्रमाणे धार्मिक ठिकाणे दर्शवली जातात तशीच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये मंडपांच्या आजूबाजूचे ट्रॅफिक अपडेट्स, पार्किंगची सुविधा, कोणते रस्ते बंद आहेत याबद्दलची माहिती गुगल मॅप्सवर दिसली तर गणेशोत्सवातील वाहतूककोंडीचे विघ्न नक्कीच दूर होईल. असाच काहीसा विचार माझ्याही डोक्यात आला. मी स्वत: एक युजर एक्सपीरियंस डिझायनर असल्याने मला युझर्सच्या दृष्टीकोनातून तंत्रज्ञान मांडायला आवडतं. याच गणेशोत्सव विशेष मॅप्सवर खरचं गुगलने काम करावं असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच मी या खास बाप्पा विशेष मॅप्ससाठी ‘गुगल मॅप्स’ला थोडी मदत करण्याचा विचार केला आणि मॅपवर वापरता येथील अशी काही चिन्हं (आयकॉन्स) तयार केली आहेत. विशेष म्हणजे बाप्पांचं लाडकं पक्वान्न म्हणजे मोदकाची आठवण करुन देणारी ही आयकॉन्स आहेत. त्यातही निळा, भगवा आणि लाल रंगामध्ये हे मोदकासारखे दिसणारे आयकॉन वेगवेगळ्या कारणासाठी वापरता येतील.

म्हणजे ट्रॅफिक सुरळीत असल्यास एखाद्या लोकप्रिय गणपती मंडळाच्या ठिकाणच्या मॅपवर निळा मोदक दिसेल. तर भगवा मोदक म्हणजे तुरळक गर्दी असून केवळ दुचाकीच या भागांमध्ये प्रवेश करु शकेल असं दर्शवणारा असेल. तिसरा आणि सर्वात महत्वाचा म्हणजे लाल मोदक. मॅपवर लाल मोदक दिसत असल्यास या ठिकाणी कोणत्याही वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही तर केवळ पायी जाणाऱ्या गणेश भक्तांनाच या ठिकाणी प्रवेश मिळेल असं दर्शवल्यास या मॅप्सचा मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईकर गणेशभक्तांना खूपच फायदा होईल.

तुम्हाला काय वाटतं असा गणपती विशेष मॅप युझर्सला फायद्याचा ठरेल का?

(लेखक युजर एक्सपीरियन्स आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत आहेत.)
karandikar@gmail.com