18 July 2019

News Flash

…ईद तेव्हाची आणि आताची

भैरोबाच्या पालखीला मोहम्मद सत्तार भाई आणि पीराच्या उरसापुढे नाम्या गोंधळी असायचे

– डॉ. अभिजित कदम, उरली कांचन

साधारण पणे हजार दोन हजार वस्ती असलेल्या छोट्या परंतु अत्यंत सुशिक्षीत आणि सुसंस्कृत गावामधे माझ बालपण गेलं. त्यावेळी मित्राचा धर्म, जात, पंथ वगैरे बघून मैत्री कर किंवा करू नको असं घरातून कधीही सांगितलं गेलं नाही त्यामुळे सर्व धर्मातले, जातीतले मित्र मिळाले. या मित्रांनी माझ जीवन अनुभव समृद्ध केले.

माझ्या गावातल्या भैरोबाच्या पालखीचा झेंडा मोहम्मद सत्तार भाई नाचवायचा आणि पीराच्या उरसापुढे नाम्या गोंधळी सांबळावर तुळजापुरच्या आईची गाणी वाजवायचा. पीराला उरसा दिवशी हिरवी चादर चढवली तरी त्याला लाल गुलाल वर्ज्य नव्हता. भैरोबाच्या जत्रेचा छबिना आख्या गावातुन निघायचा तेव्हा पेठेतला सलमान शेख स्वतः रस्त्यावर फुलांची रांगोळी काढायचा. छोटसं गाव, छोटी छोटी लोकं यामुळे प्रत्येक जण आपला वाटायचा.

ईदीच्या दिवशी आमच्या घरची चूल पेटायची नाही आणि दिवाळीला ओळखीच्या मुस्लिम घरात फराळाचा डब्बा गेल्याशिवाय रहायचा नाही. गावात दळवळणाची साधन नव्हती परंतु मनाचे रस्ते ऐसपैस होते. वीज नियमित नसायचीच पण डोक्यात सहिष्णुतेचा प्रकाश होता. गाव आता मोठं झालंय, माझी शाळादेखील डिजिटल झालीये, रस्ते काँक्रीटचे झालेत, घराला कंपाउंड वॉल आल्यात आणि लोकांनी मनाची दारं बंद करुन घेतलीयत.

आता रुस्ते, वीज सगळं आहे पण ईदीच्या दिवशी जाळीची टोपी घालून घरी डब्बा घेऊन येणारा मुन्ना नाही. डब्बा घरात टाकून हाताला ओढत त्याच्या घरी नेणारा जावेद नाही. खीर बादमे, पहले ये अत्तर लगाव म्हणत हातावर अत्तराचा बोळा घासणारा अस्लम चाचा नाही. मी देखील आता गावाकडं जायचं कमी केलंय, माहीत नाही कधी पण मलाही शहराची ओढ़ लागलीये.

First Published on June 5, 2019 3:10 pm

Web Title: id then and now a memoir