20 September 2020

News Flash

BLOG : पर्थवर हरणे अजिबात कमीपणाचे नाही!!

सध्या कोहलीच्या पायाशी अमाप संपत्ती लोळण घेत असली, तरी टॉसचं एक साधं नाणं काही त्याला वश होत नाही.

रवि पत्की

क्वाला, कांगारू, अकॅशीयाचे झाड, ग्रेट ओशन रोड, सिडनीचे ऑपेरा हाऊस ही जशी ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय प्रतिके आहेत, तसेच पर्थची खेळपट्टी म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रीडा संस्कृतीचा जरीपटकाच. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटची ती ओळख आहे, अस्मितेचा मानबिंदू आहे. सुपरसॉनिक वेगाने येणारे आणि गुड लेन्थवरून काँकॉर्ड विमानासारखे ‘टेक ऑफ घेणारे’ चेंडू आणि त्यासमोर अस्तित्वाची लढाई लढणारे फलंदाज हा फक्त खेळ राहात नाही, तर ते क्रीडायुद्धचं असते. अशा खेळपट्टीवर निडरपणे उभे रहाणे, चेंडूच्या मागे येऊन न डगमगता बचाव करणे, अधिकाधिक चेंडूंचा मुकाबला करून चांगल्या धावा जमवणे हीच पाहुण्या संघातील फलंदाजांसाठी स्वप्रतिमा उंचावणारी गोष्ट असते.
अशा खेळपट्टीवर उपखंडातील संघाला कधीतरी तीन चार वर्षातून एकदा खेळायला मिळत असेल, तर दोन्ही डावात मिळून १६० षटके खेळलेल्या भारतीय संघाने लढाऊ बाणा दाखवला, असे म्हटले पाहिजे. या खेळपट्टीवर नियमित खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघानेदेखील भारतीय संघापेक्षा दोन्ही डावात मिळून चाळीसच षटके जास्त खेळली. भारताच्या स्पेशालिस्ट फलंदाजांपैकी कोणीही खेळताना स्टंप सोडून स्क्वेअर लेगच्या दिशेने सरकून चेंडू गलीच्या दिशेने खेळताना दिसला नाही. अनेक चेंडू अंगावर घेतले, पण डगमगले नाहीत. अशा खेळपट्टीवर भारताने सामना पाचव्या दिवसापर्यंत खेचला ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पर्थला आपण १६० षटके खेळतो तर मेलबर्न, सिडनीला जास्त षटके खेळून अधिक जोमाने स्पर्धा करू शकतो, असा विश्वास वाटतो.

आपल्या गोलंदाजांनीदेखील चांगली दहशत निर्माण केली. हॅरिस, ख्वाजा, फिंच, पेन यांना भारतीय गोलंदाजांनी डोक्यावर, खांद्यावर, पोटावर सणकून प्रसाद दिला. फलंदाजी करताना हॅरिसच्या हेल्मेटवर लागलेला शमीच्या चेंडूने हेल्मेट चेपले, इतका जोराचा दणका होता तो… शमीने कसदार गोलंदाजीने सहा गडी बाद करून त्याचा ‘क्लास’ दाखवून दिला.

अशा खेळपट्टीवर नाणेफेक महत्वाची :

नाणेफेक जिंकून भारताने पहिली फलंदाजी करून ३०० च्या आसपास धावा केल्या असत्या (आपल्या पहिल्या डावात २८० धावा झाल्याच होत्या) तर दुसऱ्या डावात शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला सामना सोपा गेला नसता. २००८ मध्ये आपण पर्थला जिंकलो होतो, ते पहिली फलंदाजी करून आणि सचिन, द्रविड, लक्ष्मण यांच्या ‘क्लास’मुळेच. तसेच ऐन लयीत असलेल्या आर. पी. सिंग आणि इरफान पठाण या दोन दुर्मिळ डावखुऱ्या गोलंदाजांची आपल्याला साथ होती. सध्या कोहलीच्या पायाशी अमाप संपत्ती लोळण घेत असली, तरी टॉसचं एक साधं नाणं काही त्याला वश होत नाही. इंग्लंडमध्ये देखील काही टॉस कोहलीने जिंकले असते, तर वेगळे चित्र दिसू शकले असते.

संघ निवडीचे चमत्कारिक धोरण चालूच :

चार वेगवान गोलंदाज खेळवण्यामागे पर्थची अतिवेगवान खेळपट्टी हे कारण बरोबर असलं तरी यजमान संघसुद्धा एक फिरकीपटू घेऊन का खेळतोय? याचा विचार कोहली आणि शास्त्रीने केला नसेल तर नवलच आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात सहा डावखुरे फलंदाज आहेत. जडेजाला डावखुऱ्या फलंदाजांविरोधात ऑफ स्टंपच्या बाहेरच्या रफ मधून चांगला बाऊन्स आणि स्पिन मिळाला असता तर खूपच फायदेशीर झाले असते. चार वेगवान गोलंदाज घेऊन जेव्हा आपण खेळतो तेव्हा पर्थच्या खेळपट्टीवर प्रतिस्पर्ध्याला आम्ही १५० च्या आत उध्वस्त करू, अशा दहशतीचे गोलंदाज लागतात. लॉइडने रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल, गार्नर यांच्या जिवावर ही चैन करणं वेगळं आणि बुमराह, इशांत, उमेश आणि शमीच्या जिवावर कोहलीने अशी चैन करणं वेगळं. सध्या हे चौघे जण अतिशय चांगली गोलंदाजी करत आहेत तरी सुद्धा असल्या चमत्कारिक निवडीमागे ‘गट फीलिंग’ म्हणजे आतड्यातून आलेली भावना (उत्स्फूर्त भावना, अंतरीचा आवाज) हे कारण संघ व्यवस्थापन देतंय. ही आतड्यातून आलेली उत्स्फूर्त भावना वारंवार दगा देते आहे म्हणल्यावर पचन संस्थेतल्या भावनेपेक्षा मज्जासंस्थेतल्या तार्किक विचाराकडे मोर्चा लवकरात लवकर वळवणे इष्ट होईल. भारतीय निवड समितीचे सदस्य हे मुख्यमंत्री निवडण्याकरता आमदारांच्या बैठकीसाठी दिल्लीहून पाठवले गेलेले केंद्रीय निरीक्षकांसारखे सध्या झाले आहेत. त्या केंद्रीय निरीक्षकांना माहित असते आपल्याला काही अधिकार नाहीत. हीच गोष्ट आमदारांनाही माहित असते. त्यामुळे तेदेखील निरीक्षकांच्या जेमतेम गुडघ्याला हात लागेल इतपत वाकून नमस्कार करतात आणि मानपान तिथेच संपते. निरीक्षक टी.व्ही वर झळकून घेतात. पंचतारांकित हॉटेल आणि विमान प्रवास घडतो आणि श्रेष्ठींच्या जवळचे असल्याच्या धुंदीत पुढील एक दोन वर्षे मस्त निघून जातात. केवळ सात कसोटी खेळलेल्या मन्नावा प्रसाद अध्यक्ष असलेल्या निवड समितीच्या बैठकीत कोहलीच्या उपस्थितीत कुठला निवड समिती सदस्य किती बोलत असेल देव जाणे. चॅम्पियन बॅट्समन असलेल्या कोहलीला सर्वोत्तम अकरा खेळाडू निवडण्याकरता लागणारी तार्किक विचारशक्ती नाही हे त्याने परिणामकारक सिद्ध होऊ शकतील अशाच खेळाडूंना वगळून वारंवार सिद्ध केलंय. अशा चमत्कारिक निवडींमागे अजून काही वेगळी कारणं आहेत का हे यथावकाश समोर येईलच. पण या लहरी धोरणाचा संघाला मोठा फटका बसला आहे हे खरे.

भारतीय फलंदाजी म्हणजे दोन्ही बाजूला शेपूट आणि मधे धड असलेला युनिक प्राणी :

प्राणिशास्त्रात अँफिऑक्सस नावाचा प्राणी शिकवला जातो. तो पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूला निमुळता असतो आणि मधे धड असते. त्याला कवटी असलेले डोके नसते. वास्तविक प्राणी म्हणजे डोकं, धड आणि शेपूट ही शरीर रचना असली पाहिजे. या अँफिऑक्सससारखी भारतीय फलंदाजीची शरीररचना झाली आहे. शेपूट, धड, शेपूट अशी रचना भारतीय फलंदाजीत सध्या दिसते. सलामीवीर हे काहीच योगदान देत नाहीयेत. म्हणजे ते सुरूवातीची शेपूट आहेत, तर ८ ते ११ नंबरचे खेळाडू ही मागची शेपूट आहेत. प्राणी शेपटीने जसे माशांना, चिलटांना हाकलतात, तशाच पद्धतीने वेगवान चेंडू आल्यावर बॅटी फिरवणारे हे तळाचे फलंदाज आहेत. अर्थात ज्या खेळपट्टीवर मुख्य फलंदाज निरुत्तर असतात, तिथे तळाच्या फलंदाजांकडून अपेक्षा करणं चूकच. अशा खेळपट्टीवर तळाचे फलंदाज दुखापतीशिवाय सहीसलामत सुटून पुढच्या कसोटीला उपलब्ध असणे अधिक महत्त्वाचे. मुरली विजय आणि के. एल. राहुल यांच्या सततच्या अपयशाने मात्र त्यांनी सलामीची सुद्धा शेपूट केली आहे हे खरे.

नॅथन लॉयनची पत शेन वॉर्न इतकी :

सर्व खेळपट्ट्यांवर, सर्व देशात आपल्या कमालीच्या कौशल्याने छाप पाडणारा नॅथन लॉयन म्हणजे अभिजात ऑफ स्पिन गोलंदाजीचा ध्वजधारकच. बॅट आणि पॅडमधून त्रिफळा, फॉरवर्ड शॉर्ट लेग, सिली पॉइंट आणि स्लिपमध्ये फलंदाजाला पकडणे, स्टेट थ्रू वर फलंदाजांच्या बॅटची कड यष्टीरक्षकांकडे जाणे इत्यादी वैभवशाली प्रकारातून तो विकेट्स घेतो. गुणवत्तेने ओतप्रोत भरलेले चेंडू टाकतो तो… ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना कसा करायचा याच्या विवंचनेत संघ असतात आणि लॉयनच बेमालूमपणे त्याच्या ऑफ स्पिनच्या गळाला अनेक फलंदाज लावतो. फ्लाईट, स्पिन, दिशा सगळ्यात नैपुण्य मिळवून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात तो मोठा वाटा उचलतो. शेन वॉर्नइतकेच विजय तो ऑस्ट्रेलियाला मिळवून देईल असं दिसतंय. काही दिवसात वॉर्नच्या शेजारचे सिंहासन तो मिळवेल हे नक्की.
पर्थला भारत हरला याचं वाईट वाटलं, तरी त्यात मानहानी वगैरे काही नाही. आपण अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत गारठून नक्कीच गेलो नाही. कोहलीचे मास्टरपीस शतक, रहाणे-विहारी यांची जिगरबाज फलंदाजी हे सारे उभारी देणारे होते. दोन कसोटींनंतर दोन्ही संघाचे बळ जवळपास समान वाटत आहे. वार्नर, स्मिथ नसले तरी त्यांच्याच भूमीत ऑस्ट्रेलियाला हरवणे सोपे नाही. याचा उहापोह आपण मालिका सुरू होण्यापूर्वीच केला होता. तरीही कोहलीच्या आणि संघाच्या मागे आपण चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीत उभे राहायलाच हवे.

गुड लक इंडिया!! छोडना मत!!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 1:40 pm

Web Title: ind vs aus defeat on perth is never an insult
Next Stories
1 BLOG: नरेंद्र मोदींच्या मुंबईतल्या घरासाठी लोकलचे प्रवासी गोळा करणार चंदा
2 Blog: उद्धवनीतीचा अखेरचा ‘ रामबाण ‘कधी …?
3 BLOG : वाट पाहूनी जीव थकला !
Just Now!
X