भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात होते आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  दौऱ्याच्या सुरुवातीला तीन टी 20 सामने झाले, मात्र टी 20 हा प्रकार क्रिकेटच्या अर्थकारणासाठी आवश्यक असला तरी त्याला कुठलेही गांभीर्यमूल्य नाही. वास्तवात टी 20 हे क्रिकेटचं खूपच कमी दिवसात जन्मलेलं बाळ आहे.  बाहुबळ, चापल्य आणि इंप्रोवायजेशन या पलीकडे त्याचे क्षितिज नाही. क्रिकेट हा अनेक गुण समूहाला सामावणारा नुसता खेळ नाही तर जीवनगुरु आहे हे समजून घेण्यासाठी कसोटी क्रिकेटला पर्याय नाही.

ऑस्ट्रेलिया हा सर्व क्रीडा प्रकारांवर प्रेम करणारा देश आहे. वास्तविक त्याला स्पोर्ट्स नेशन असे लोक म्हणतात तेव्हा त्यात कसलीही अतिशयोक्ती वाटत नाही. क्रिकेटची भव्य स्टेडियम्स, खूप लांब सीमारेषा, वेगवान, बाऊन्सी पण फलंदाजानादेखील समान संधी देणाऱ्या खेळपट्ट्या, फक्तं जिंकण्याकरता खेळणारे खेळाडू (त्या करता काहीही करणारे असे दुर्दैवाने आता चित्र उभे राहिले आहे), पाहुण्या संघाचे कौतुक आणि प्रसंगी टिंगल, मानसिक खच्चीकरण असे सगळे करायला तयार असणारे प्रेक्षक, चॅनल नाईनचा कॉमेंटरी बॉक्स,  त्यात बसून क्रिकेट धर्मावर फक्तं त्यांनीच अधिकारवाणीने प्रवचन करावे असे विद्वान आणि अत्यंत लोकप्रिय धर्माचार्य समालोचक, आणि अजून अनेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटची वैशिट्ये सांगता येतील.

सध्या माजी खेळाडू वर्तमानपत्रांच्या रकान्यातून भारतीय संघाला संभाव्य विजेते, जिंकण्याची सर्वोत्तम संधी असे मथळे असलेले स्तंभ लिहीत असले तरी आपण भारतीय प्रेक्षकांनी वर्तमानात राहून प्रत्येक चेंडूचा आनंद घ्यावा. जय-पराजय यासारख्या गोष्टींचा विचार करुन सामना बघू नये. अनेक स्तंभलेखक त्यात परदेशातले सुद्धा बीसीसीआयला बांधिल असल्याने त्यांचे प्रत्येक लिखाण गांभिर्यतेने घ्यायचे का हे आपणच ठरवायचे.

सकाळी साडेपाचला गजर लावून कुसमुसत पण अभ्यंगस्नानाला उठावे अशा मंगल भावनेने उत्साहात उठावे, वाफाळलेला चहाचा कप घेऊन टी.व्ही.  समोर बसावे आणि तिर्थयात्रेला निघावे. फक्तं टी. व्ही.लावताच “मॉर्निंग एव्हरीवन” असे शुभचिंतन करणारा आपला लाडका ह.भ.प. रिची बेनॉ नसेल…..मिस यू रिची!!

भारतीय संघाने क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकलेली नाही. 1977-78 साली ऑस्ट्रेलियाचे सर्व नामी खेळाडू पॅकर सिरीजमध्ये खेळत होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिआचा ‘ब’ संघ भारताविरुद्ध खेळला होता. ती मालिका अत्यंत चुरशीची झाली परंतु ती मालिकाही ऑस्ट्रेलियानेच जिंकली होती. आपण काही मालिका उत्कृष्ट खेळाने बरोबरीत सोडवल्या. आता फक्तं शेवटचा अडथळा पार करणे आपल्या संघाला जमवायचे आहे.

ह्यावेळचा संघ हा चमत्कार घडवू शकतो का ह्या प्रश्नाचे हो किंवा नाही असे थेट उत्तर देणे जोखमीचे आहे. वॉर्नर आणि स्मिथ हे मोठे खेळाडू संघाबाहेर असल्याने लगेच ऑस्ट्रेलियाचा संघ निदान घरच्या मैदानांवर कमकुवत ठरत नाही. ख्वाजा, हँड्सकॉम्ब, फिंच, शॉन आणि मिचेल मार्श हे बंधू तसेच नवीन आलेला मार्कस हॅरिस ही फळी मोठा स्कोर करू शकते. तसेच हे फलंदाज अगदीच नवखे आहेत अशातला भाग नाही. स्टार्क, हेजलवूड, कमिन्स, ट्रेमेन, सिडल, लायन हा बॉलिंग अॅटॅक त्यांच्या खेळपट्यावर बिनतोड वाटतो.  भारतीय संघातल्या किमान पाच फलंदाजांना सातत्याने चांगली योगदाने द्यावी लागतील. बाउन्स पेक्षा स्विंगचे आव्हान भारतीय फलंदाजांना जड जाते हा अलीकडचा इतिहास पहाता ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाज धावा करतील असे वाटते, फक्तं चिवटपणा हवा.

भारतीय गोलंदाजी कागदावर चांगली वाटत आहे. प्रत्यक्षात टिच्चून गोलंदाजी, स्टॅमिना टिकवून ठेवावा लागेल. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टयांवर नेथन लायनला कसोटीच्या दुसऱ्या दिवसापासून स्पिन मिळायला लागतो. तो महत्वाच्या क्षणी विकेट्स काढतोच काढतो. तसे यश मिळवायला त्याच जातकुळीचा स्पिनर अश्विन स्वतः च्या गोलंदाजीत काय बदल करतो आणि यशस्वी होतो का हा ह्या दौऱ्यातला अत्यंत कुतूहलाचा विषय असेल. कर्णधार म्हणून कोहलीे काही नवीन विचार ,युक्त्या मैदानावर अमलात आणतो का हे पहावे लागेल. बरेचदा मोक्याच्या क्षणी तो स्विच ऑफ झाल्यासारखा वाटतो आणि सामना ड्रीफ्ट होतो. त्यामुळे भारतीय खेळा़डू ऑस्ट्रेलियन आव्हान कसं पार करतील याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.