अक्षय नाईकधुरे

राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाला खेळपट्टीवर नांगर टाकणाऱ्या फलंदाजाची गरज होती. धावा जमवण्यासोबत चेंडू खेळून काढत खेळपट्टीवर तासनतास उभ्या राहणाऱ्या फलंदाजाचा शोध सुरू असताना भारताला चेतेश्वर पुजारा मिळाला. वर्षं सरत असताना पुजारानं टीम इंडियाच्या कसोटी संघाची मनोभावे सेवा केली. कोणीही खेळलं नसलं, तरी पुजारा गोलंदाजांना तंगवणार, हे प्रत्येक भारतीयाच्या मनात पक्कं बसलं होतं. पुजारानंही चाहत्याच्या अपेक्षांना प्रत्येक सामन्यातून खतपाणी घालणं सुरूच ठेवलं.

२०१८मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिथल्या खेळाडूंसह चाहत्यांना विराटसोबत पुजाराचीही भीती होती. कारण हा माणूस फक्त बॅटिंग करतो आणि करतच राहतो, असं त्यांनी म्हटलं . पुजारा म्हणजे ‘क्लासिक टेस्ट बॅट्समन’, असं वर्णन ऑस्ट्रेलियन मीडियानं केलं. पण २०१८नंतर आणि मागील दोन वर्षात पुजारा स्वत:मध्ये हरवत गेला. प्रसिद्धी आणि कौतुकाच्या झोतात तो हरवून जाणारा नाही, एवढं मात्र प्रत्येकाला ठाऊक होतं. पण तो चांगला खेळत का नव्हता, याचं उत्तरही कोणाला सापडत नव्हतं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, तेव्हा अंगावर झेललेल्या चेंडुंमुळं पुजाराच्या लढाऊ बाणाचं कौतुक झालं, पण त्याची धावांची पाटी कोरीच राहिली.

यंदाच्या आयपीएलच्या ऑक्शनमध्ये पुजाराला टी-२० क्रिकेटसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघानं बोली लावून संघात घेतलं. तोसुद्धा या फॉरमॅटमध्ये खेळण्यास फार उत्सुक झाल्याचं लोकांनी पाहिलं, पण हेच त्याच्या कसोटीतील मागं पडण्याचं कारण होतं का, हे शोधण्यातही कोणी रस दाखवला नाही.

पण आता पुजारा त्याच्या जुन्या अंदाजात दिसतोय. कसोटीतज्ज्ञ अशी ओळख बनवलेल्या पुजारानं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर नाबाद ९१ धावांची खेळी करून टीम इंडियाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दुसऱ्या डावात त्याची फलंदाजी डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. इतर डावाच्या तुलनेत तो आज कमालीचा वेगवान खेळला. त्यानं १२ डावांनंतर अर्धशतक ठोकलं. टीम इंडियानं पहिल्या डावात ७८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडनं ४३२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. आता भारतानंही तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद २१५ धावा करत पिछाडी कमी केलीय.

पुजारानं आपल्या कारकिर्दीतील ३०वं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या नावावर १८ शतकं आहेत. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतानं लवकर तीन गडी गमावले. त्यानंतर पुजारानं २०४ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. यामुळे संघ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याला अद्याप शतकाची प्रतीक्षा आहे. जानेवारी २०१९पासून त्याला शतक करता आलेले नाही.

पुजारा हा टीम इंडियाचा विश्वासार्ह फलंदाज मानला जात होता. पण गेल्या दोन वर्षापासून त्याची कामगिरी घसरलीय. त्यामुळे आता संघातलं त्याचं स्थान निश्चित झालेलं नाही. आता त्याला हेडिंग्ले आणि उर्वरित सामन्यांत मोठी खेळी करून आपलं स्थान पक्कं करायचंय. इतकंच नव्हे, तर पुजारासारखा दुसरा कोणीही मिळणार नाही, हेसुद्धा त्याला तितक्याच आत्मविश्वासानं सर्वांना दाखवावं लागेल. कारण भिंत अजून भक्कम आहे, हे सांगण्यासाठी त्याला बॅट स्टम्प्ससमोर निधडी ठेवावीच लागेल!