– शरद कद्रेकर

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षात आश्वासक सुरुवात केली आहे. न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाने टी-२० मालिकेत बाजी मारली तर वन-डे मालिकेत पराभव स्वीकारला. यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे आता कसोटी सामन्यांना एक वेगळचं महत्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतोय. मात्र न्यूझीलंडमधलं वातावरण, तिकडच्या खेळपट्ट्या या सर्वांचा विचार केला असता, भारतीय संघासमोर कसोटी मालिकेतलं आव्हान सोपं नसणार आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला जुन्या आठवणींमध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहोत.

ही गोष्ट आहे लिटल मास्टर सुनील गावसकर यांची… सुनील गावसकर क्रिकेट जगतातील एक धुरंधर व्यक्तिमत्व. दहा हजार धावांचे शिखर सर करणारा सुनील हा पहिला कसोटीपटू. एकाग्रता, समर्पित तसेच विजिगिषु वृत्ती ही सुनीलची वैशिष्ट्यं ! भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी सुनीलला मिळाली ती कर्णधार बिशन बेदीला दुखापत झाल्यामुळे. इडन पार्क ऑकलंडला न्यूझीलंडविरुद्ध २४ ते २८ जानेवारी १९७६ दरम्यान झालेल्या या सलामीच्या कसोटीत भारताने ८ विकेटसनी विजय संपादला.  योगायोगाची बाब म्हणजे सुनीलची ही १८ वी कसोटी आणि भारताचा तो १८ वा कर्णधार ठरला होता ! कर्णधार म्हणून त्याचं पदार्पण यशस्वी ठरलं…आणि विजयी भव असं जणू नियती म्हणाली.

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार टर्नरने प्रथम फलंदाजी स्वीकारली. बेदीच्या गैरहजेरीत चंद्रशेखर, प्रसन्ना, वेंकट यांनी फिरकीची धुरा समर्थपणे वाहिली. २० पैकी १९ विकेट्स तर ‘चंद्रा-प्रास’ (प्रसन्नाचे टोपणनाव ) या कर्नाटकी जोडगोळीने घेतल्या. प्रसन्नाने तर कमालच केली… पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ८ असे एकूण ११ मोहरे त्याने टिपले. ७६ धावात ८ बळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी. याच दरम्यान त्याने विनू मंकड यांचा भारतातर्फे सर्वाधिक १६२ कसोटी बळींचा विक्रमही मोडला. याच दौऱ्यात बेदीने प्रसन्नाला मागे टाकलं. वेंकटला या कसोटीत एकमेव विकेट मिळाली ती मार्क बर्जेसची, प्रसन्नाकरवीच त्याने बर्जेसला झेलबाद केलं.

ऑकलंड कसोटीत दिलीप वेंगसरकर, सुरिंदर अमरनाथ, सईद किरमाणी यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सुनील गावसकरबरोबर दिलीप वेंगसरकर सलामीला आला. दिलीप हा सुनीलचा सलामीचा नववा साथीदार. दादर युनियनची सुनील-दिलीप ही जोडी भारताकडून सलामीला आली, त्याआधी सुनील गावस्कर-रामनाथ पारकर या दादर युनियनच्याच सलामीवीरांनी भारतासाठी ओपनर्सची भूमिका बजावली होती. (सुनीलने आपल्या प्रदीर्घ कसोटी कारकीर्दीत २० साथीदारांसह भारतासाठी सलामीवीराची भूमिका निष्ठेने पार पाडली)

दिलीपने डेल हेडलीच्या (रिचर्डचा थोरला बंधू ) पहिल्या षटकात ७ धावा घेत आश्वासक सुरुवात केली, पण रिचर्ड कॉलिंग्जने पुढच्याच षटकात दिलीपला (७) पायचीत पकडलं. डावखुऱ्या सुरिंदर अमरनाथने गावस्करच्या साथीने २०४ धावांची विक्रमी भागीदारी रचताना कसोटी पदार्पणातच आपल्या पिताश्री लाला अमरनाथ यांच्याप्रमाणेच  शतक झळकावण्याचा मान संपादला. सुनीलने संयमी खेळ करत आपलं शतक झळकावण्यास ५ तास घेतले. शतकी खेळीदरम्यान ड्राईव्ह आणि कटचा त्याने सढळ वापर केला. सुनील, सुरिंदर या शतकवीरांवर किवीजनी मेहेरनजर केली, दोघांनाही ३-३ जीवदानं लाभली. ही जोडी फुटल्यानंतर गावसकरांनी ब्रिजेश पटेलच्या साथीने पुन्हा एकदा अर्धशतकी भागीदारी रचली.  सुनीलने ३६८ मिनिटे किल्ला लढवत एक षटकार, १५ चौकारांसह १२६ धावा करताना सव्वासहा तास खेळून काढले. हॅडली, कॉलिंग्ज यांना सामोरं जाताना सुनीलचं फूटवर्क अप्रतिम, लाजवाबचं ! यानंतर तळातल्या फलंदाजांनी दाखवलेल्या चिकाटीमुळे भारताला पहिल्या डावात १४८ धावांची घसघशीत आघाडी मिळाली.

कर्णधार ग्लेन  टर्नरला ऑकलंड कसोटीत सूर गवसला नाही. २३ आणि १३ अशा माफक धावा त्याने केल्यामुळे भारतीय संघाला त्याची विकेट स्वस्तातच मिळाली.  पहिल्या डावात चंद्राने तर दुसऱ्या डावात प्रसन्नाने त्याला चकवले. मॉरिसनलाही प्रसन्नानेच  विश्वनाथकरवी झेलबाद केल्यामुळे यजमान संघाची बिनीची जोडी ३९ धावातच गारद झाली. अनुभवी बेवन काँग्डन आणि जॉन पार्कर या तिसऱ्या जोडीने शतकी भागीदारी रचून पहिल्या डावातील पिछाडी भरून काढली. पण त्यानंतर मात्र प्रसन्नाच्या जादुई फिरकीपुढे किवीजचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

२१५ धावात न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपल्यामुळे भारतासमोर आव्हान होतं ६७ धावांचं. दिलीप वेंगसरकर (६) सुरिंदर अमरनाथ (९) बाद झाल्यानंतर भारताला विजयी लक्ष्य गाठून दिलं सुनील गावसकर (नाबाद ३५), विश्वनाथ (नाबाद ११) या वामनमूर्तींनी ! ऑकलंड कसोटी चौथ्या दिवशीच जिंकून सुनील गावस्करच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या नवोदितांचा भरणा असलेल्या भारतीय संघाने इतिहास रचला. पतौडी- वाडेकर युगानंतर भारतीय क्रिकेटमध्ये आता गावसकर पर्वाची सुरूवात झाली होती!