शरद कद्रेकर

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळाची सभ्यता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी जशी खेळाडूंवर असते तशीच ती पंचांवरही असते. सामन्यात सर्व नियम योग्य रितीने पाळले जात आहेत की नाही, कोणताही पक्षपात न करता अचूक आणि योग्य निर्णय देणं ही पंचांची जबाबदारी असते. मात्र सुनील गावसकरांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेला भारतीय संघाला पक्षपाती पंचांचा सामना करावा लागला. फिरकी त्रिकुटाच्या जोरावर भारताने ऑकलंड कसोटी ५ विकेट राखून जिंकली सुद्धा…या सामन्यात चंद्रशेखरने न्यूझीलंडच्या फलंदाजांसोबत पंचांनाही आपल्या ‘फिरकी’ने क्लिन बोल्ड केलं.

ऑकलंड कसोटीत न्यूझीलंडचे पंच डेनिस कॉप्स आणि रॉबर्ट माँटेथ यांनी पक्षपाती निर्णयांनी हद्द गाठली होती. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात बेवन काँग्डन आणि जॉन पार्कर यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. सलामीचे दोन फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर या शतकी भागीदारीमुळे न्यूझीलंडचा डाव सावरला होता. या शतकी भागीदारीत पंचांनीही आपली मोलाची भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांचं पायचीतचं प्रत्येक अपील दोन्ही पंच फेटाळून लावत होते, जणू काही हा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांना लागूच नव्हता. काही षटकांमध्ये पंचांनी चेंडू बॅटला कड लागून गेलेला असतानाही त्याकडे डोळेझाक केली.

दुसऱ्या डावात ८ बळी घेणाऱ्या इरापली प्रसन्नाने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडलं. मात्र चंद्रशेखरने आपल्या अनोख्या स्वभावात पंचांची फिरकी घेतली. यष्टीरक्षक फलंदाज केन वॉड्सवर्थ या फलंदाजाचा त्रिफळा उडवत चंद्रशेखरने पंचांकडे अपील केलं. Is he Out?? असं विचारत चंद्रशेखरने पंचांकडे अपील केलं. काहीश्या रागातच चंद्राने हा सवाल पंचाना केला होता. त्याचा त्रागा समजण्याजोगा होता. कर्णधार सुनिल गावसकर यावेळी चंद्रशेखरला शांत राहण्यासाठी सांगत होता, मात्र चंद्रशेखर वारंवार पंचांनी फलंदाजाला खरंच बाद दिलं आहे का?? असं विचारुन पंचांची फिरकी घेत होता. चंद्रशेखरचं हे वागणं खरंच मार्मिक होतं…पण त्याच्या या वागण्यामुळे पंचांच्या कामगिरीचा सुमार दर्जा स्पष्ट झाला होता.