05 March 2021

News Flash

रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल का?

Ind vs Aus : ऑस्ट्रेलियातील उसळत्या मैदानावर रोहित शर्माची कामगिरी भरीव आहे

– नामदेव कुंभार

India tour of australia 2020 : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघामध्ये २७ नोव्हेंबरपासून मर्यादित षटकांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारतीय संघात एकापेक्षा एक धुंरधर फलंदाज आहेत. तरीही हिटमॅन रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा फटका भारतीय संघाला बसेल का? दुखपतीमुळे रोहित शर्माची एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी निवड झाली नाही. त्यानंतर चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यातच मुंबई इंडियन्सनं आपल्या अधिकृत ट्विटरवर रोहित शर्माचा सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आयपीएलमधील बाद फेरीच्या सामन्यात रोहित शर्मानं फलंदाजीही केली. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करत मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जेतेपद जिंकून दिलं. पण आयपीएल संपता संपता आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होताना बीसीसीआय, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात सर्व काही ठीक आहे का? अशा चर्चांना उधाण आलं. रोहित शर्मानं दोन दिवसांपूर्वी स्पष्टीकरण देत दुखपतीमुळे एकदिवसीय आणि टी-२०मधून माघार घेतल्याचं सांगितलं. पण रोहित शर्माला झालेली दुखापत खरचं गंभीर होती का? जर दुखापत गंभीर होती तर रोहित शर्मानं आयपीएलमधील बाद फेरीत खेळण्याचा निर्णय का घेतला? रोहितला राष्ट्रीय संघापेक्षा आयपीएल महत्वाचं वाटतं का? बीसीसीआय आयपीएल संघाना दुखापतग्रस्त खेळाडूंना खेळू देऊ नका ? असं स्पष्टपणे सांगू शकत नाही का? असे बरेच प्रश्न निर्माण होतात.. हे प्रश्न कालांतरानं विसरुनही जातील… मात्र सध्याच्या घडीला महत्वाचा प्रश्न असा आहे की, रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात फटका बसेल का?

(आणखी वाचा : रोहित शर्माचे ३० कोटींचे आलिशान घर पाहिलेत का? )

‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर मारल्यास कदाचित रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अडचणीत येऊ शकतं असं दिसतेय. उसळत्या चेंडूवर पूल शॉट मारण्याची रोहित शर्माची कला खरंच कौतुकास्पद आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्माची कामगिरीही उल्लेखनीय आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक धावा काढणाऱ्या तीन फलंदाजामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांचा समावेश आहे. रोहित शर्मानं एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात आतापर्यंत ४० डावांत ८ अर्धशतकं आणि ८ शतकांच्या मदतीनं दोन हजार २०८ धावा चोपल्या आहेत. तर विराट कोहलीनं ३८ डावांत ८ शतकं आणि ८ अर्धशतकाच्या मदतीनं एक हजार ९१० धावा चोपल्या आहेत. क्रीडा विश्वातील सध्याचे आघाडीचे दोन फलंदाज रोहित आणि विराट आहेत. दोघांच्या जोडगोळीनं अनेकदा ऑस्ट्रेलियाला पाणी पाजलं आहे. यांना जय-विरुची जोडी म्हटलं तरी चालेल… पण या दौऱ्यावरील एकाची अनुपस्थिती संघाला थोडाफार झटका देणारी आहे. के. एल. राहुलच्या रुपानं भारतीय संघाकडे दर्जेदार फलंदाज आहे. मात्र राहुल रोहित शर्माची जागा भरेल का? हा प्रश्न उपस्थित होतोच…

( आणखी वाचा : Ind vs Aus : रोहित-इशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर )

ऑस्ट्रेलियातील उसळत्या मैदानावर रोहित शर्माची कामगिरी भरीव आहे. २००७ पासून भारतीय संघाचा भाग असलेल्या रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामन्याच्या १९ डावांत ९०९ धावांचा पाऊस पाडला आहे. रनमशीन विराट कोहलीलाही अशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीच्या नावावर ६२९ धावा आहेत. सध्याच्या भारतीय संघात विराट कोहली, शिखर धवन, राहुल, अय्यर यासारखे तगडे फलंदाज आहेत. एखाद्या खेळाडूची अनुपस्थिती दुसऱ्याला संधी असते. मात्र रोहित शर्मासारख्या तगड्या फंलदाजाची उणीव भरणं सहजासहजी शक्य नाही. परिस्तितीशी जुळवून घेत फलंदाजी कशी करावी हे तंत्र प्रत्येक फलंदाजाला जमण्यासारखं नाही. एकूणच… रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला थोडाफार फटका बसू शकतो. पण राहुल, मयांक अग्रवाल आणि गिलसारख्या युवा फलंदाजांसाठी ही मोठी संधी असणार आहे… पाहूयात ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतोय…

(namdeo.kumbhar@loksatta.com)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2020 3:13 pm

Web Title: india tour of australia 2020 ind vs aus rohit sharma team india special blog by namdeo kumbhar nck 90
Next Stories
1 टीम इंडियाची रेट्रो जर्सी कशी दिसते पाहिलीत का?? शिखरने रिव्हील केला लुक
2 Ind vs Aus : रोहित-इशांत शर्मा पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर
3 IPL मधला विराटचा सहकारीच म्हणतोय…रोहित कोहलीपेक्षा सरस
Just Now!
X