– नामदेव कुंभार

अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत लोळवून विजयाचा गुलाल उधळला. पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अवघ्या ३६ धावांवर गुंडाळलेल्या भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. ३६ ही भारताच्या कसोटी इतिहासातील नीचांकी धावसंख्या होतीच; पण अलीकडच्या काळात कोणताही संघ अशा प्रकारे कोसळला नव्हता. या पराभवामुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून उभे राहणे हेच प्रमुख आव्हान होते. तशात विराट आणि शमी या प्रमुख क्रिकेटपटूंची अनुपस्थिती हे आव्हान अधिक खडतर बनवणारी ठरली. परंतु अजिंक्य रहाणे आणि त्याच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी ते पेलले.

पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्विकारावा लागल्यानंतर अनेकांनी भारताला ४-० च्या फरकानं मालिका गमवावी लागेल, अशी भविष्यवाणीही करुन टाकली. ‘व्हाईटवॉश’चं दिवास्वप्न बघणाऱ्यांना नवख्या पोरांनी चोख प्रत्युत्तर देत भारताचं नाव राखलं आहे. भारतीय संघानं आतापर्यंत अनेक कसोटी मालिका जिंकल्या आहेत. पण हा विजय त्यापेक्षा खूप मोठा आहे. कारण, आघाडीचे सर्व खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यातच ज्याचा खेळ पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियन चाहते करोना काळातही क्रिकेट मैदानांकडे वळती अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांना होती, ज्याच्या नावावर कसोटीची तिकिटं हातोहात खपली तो भारतीय संघाचा म्होरक्या विराट कोहली पहिल्या सामन्यानंतर खासगी कारणामुळे मायदेशी परतला होता. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचं मनोबल खचलं होतं. त्यामुळे भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून ओळखा जाणार विराटच मायदेशी परतल्याने आता भारताचं काही खरं नाही असं चित्र उभं करण्यात आलं. पंरतु, दुसऱ्याच कसोटीच कर्णधार पदाची सुत्रं हाती घेत लिडींग फ्रॉम द फ्रण्ट म्हणत अजिंक्य रहाणेनं शतकी खेळी करत तुम्हीही करु शकता असा विश्वास तरुण खेळाडूंना दिला. एखाद्या सामन्याचा जसा टर्नींग पॉइण्ट असतो तसा तो मालिकेचा टर्निंग पॉइण्ट ठरला. त्यानंतर भारतीय संघानं मागे वळून पाहिलेच नाही.

या मालिका विजयात कोणा एका खेळाडूचा वाटा नाही. सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला आहे. तुम्ही तिन्ही कसोटीवर नजर फिरवल्यास याची प्रचिती येईल. प्रत्येक कसोटी सामन्यातील प्रत्येक सत्रात भारतीय संघाला नवा हिरो मिळाला. अजिंक्यच्या शतकापासून सुरु झालेला प्रवास ऋषभ पंतच्या अर्धशतकापर्यंत येऊन थांबला आहे. रविंद्र जाडेजा, अश्विन आणि विहारी यांनी दुखापतीनंतरही अनुभवातून जिगरा दाखवला. तर शार्दुल-सुंदर यांनी नवख्या खेळाडूंची जिद्द दाखवून दिली. बुमराहला दुखापत झाल्यानंतर सिराजनं गोलंदाजीचं नेतृत्व केलं. अवघ्या दोन सामन्याचा अनुभव असणारा गोलंदाज नेतृत्व करत होता…. विचार करा… त्याच्यावर किती दडपण आलं असेल… पण त्यानं पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाची घमेंड उतरवली. गिल-पंत यांनाही आपला जलवा दाखवला.

ऑस्ट्रेलियाच्या या मालिकेत भारताच्या युवा शक्तीची ताकद जगानं पाहिली. आघाडी फळी मोडून पडल्यानंतर दुसऱ्या फळीनं तितक्याच जिद्दीनं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. ऋषभ पंत, शुबमन गिल, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि नटराजन यांनी आपल्या खेळीनं सर्वांना प्रभावित केलं आहे. या सर्वांची इतिहासात नोंद झाली आहे. हे युवा खेळाडू पुढील काही दिवस कांगारुंच्या स्वप्नातही येतील. एकूण दौऱ्यावर असंख्य खेळाडूंना दुखापती झाल्या. अगदी कसोटी मालिकेचा जरी आढावा घेतला तरी अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटीपासून ते ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटीपर्यंत फक्त कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोनच खेळाडू कायम आहेत. बाकी खराब कामगिरीमुळे संघाबाहेर असलेला पृथ्वी शॉ वगळता दुखापतीमुळेच वगळावे लागलेल्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीतील हा विजय जगाला नक्कीच भारताची ताकद दाखवून देईल….

(namdeo.kumbhar@loksatta.com)