– शरद कद्रेकर

कसोटी सामन्यांची रंगतच वेगळी असते. आजकालच्या पिढीतील मुलांना वन-डे आणि टी-२० क्रिकेटपुढे कसोटी क्रिकेट फारसं आवडत नाही असं म्हटलं जातं. काही प्रमाणात ते खरंही आहे…मात्र एखादी अनिर्णित कसोटीही वन-डे, टी-२० क्रिकेटप्रमाणे उत्कंठावर्धक ठरु शकते याचा प्रत्यय ५५ वर्षांपूर्वी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीयमवर आला होता. १२ ते १५ मार्च १९६५ साली भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत खेळवला गेलेला तिसरा सामना हा लक्षात राहतो, तो दिलीप सरदेसाईंच्या द्विशतकामुळे…

रमाकांत देसाईची सर्वोत्तम गोलंदाजी (५६ धावात ६ बळी), मायदेशातील कसोटीतील ८८ ही भारताची निचांकी धावसंख्या…न्यूझीलंडने भारतावर प्रथमच फॉलोऑन लादला, दिलीप सरदेसाईचे पहिले कसोटी शतक तेदेखील द्विशतक! बोर्डे, हनुमंतसिंगच्या बहारदार खेळीमुळे पतौडीने ५ बाद ४६३ धावांवर भारताचा डाव सोडला. पण त्यात झालेली दिरंगाई, २५५ धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना न्यूझीलंडची ८ बाद ८० अशी झालेली हालत, चंद्रा, वेंकट आणि दुराणी या फिरकी त्रिुकुटाचा मारा या सर्व गोष्टींमुळे हा सामना रंगतदार अवस्थेत आला होता. पण चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि कसोटी अनिर्णितच राहिली. (या मालिकेतील चारही कसोटी सामने ४ दिवसांचेच होते)

दिलीप सरदेसाई मूळचा गोवेकर. शालेय शिक्षणानंतर मुंबईच्या विल्सन कॉलेजात तो दाखल झाला. मनोहर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या सरदेसाईने कॉलेज, युनिव्हर्सिटी, मुंबई रणजी संघात प्रवेश केला. भारतीय संघात त्याने पदार्पण केलं ते टेड डेक्स्टरच्या इंग्लंडविरुद्ध कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर. ६१-६२ च्या मोसमातील पदार्पणाच्या कसोटीत त्याला फलंदाजीत क्रमांक मिळाला सातवा. जयसिंह, कॉन्ट्रॅक्टर, दुराणी, मांजरेकर, उम्रीगर, बोर्डे यांच्यानंतर सरदेसाई ग्रीन पार्कवर उतरला पण टोनी लॉकच्या फिरकीवर तो स्वयंचीत (hit wicket) झाला. या कामगिरीमुळे पुढच्या कसोटीत त्याला डच्चू मिळाला. यानंतरच्या विंडीज दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली होती, मात्र हा दौराही त्याच्यासाठी फारसा फलदायी ठरला नाही. न्यूझीलंडविरुद्ध मद्रास कसोटी सामन्यातही सरदेसाई अपयशी ठरला, यानंतरच्या कोलकाता कसोटीत त्याला वगळण्यात आलं. मात्र मुंबईत घरच्या मैदानावर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली.

ब्रेबन कसोटीत रमाकांत देसाईच्या भन्नाट तेज माऱ्यासमोर किवीजचा डाव २९७ धावत आटोपला पण नंतर आक्रीत घडलं. टेलर, मॉत्झ, काँग्डन यांनी भारताचा ८८ धावांतच खुर्दा उडवला. न्यूझीलंडच्या जलदगती माऱ्यासमोर भारतीय फलंदाजी गडगडली. बोर्डेंनी २५ तर इंजिनीअरने १७ धावा केल्या, तर बाकीचे हजेरी लावून परतले. फॉलोऑन नंतरही २ बाद १८ अशी बिकट अवस्था झाली असताना सरदेसाई, जयसिंह या जोडीने प्रतिकार करत ८९ धावांची भर घातली. यानंतर बोर्डेंच्या साथीत सरदेसाईंचा खेळ बहरला आणि या दोघांनी शतकी भागीदारी रचली. बोर्डेंनी १७ चौकारांनिशी अडीच तासात शतकी मजल मारली. टेलर, मॉत्झ, पोलार्ड, ब्रायन युल, काँग्डन यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. दिलीप सरदेसाई आणि हनुमंतसिंह या जोडीनेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर तुटून पडत, स्विप, ड्राईव्ह, पुलच्या फटक्यांचा सढळ वापर केला. यादरम्यान कर्णधार पतौडी दिलीप सरदेसाईचं द्विशतक होईल याची वाट पाहत राहिला…मात्र इथेच भारताने सामन्यातला महत्वाचा वेळ वाया घालवला. अखेरीस ५ बाद ४६३ धावांवर पतौडीने भारताचा डाव घोषित केला.

दुसऱ्या डावातही भारताच्या फिरकी त्रिकुटासमोर न्यूझीलंडची अवस्था ८ बाद ८० अशी झाली होती. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ संपला आणि सामना अनिर्णित राहिला. सरदेसाईंनी या सामन्यात दुसऱ्या डावात नाबाद द्विशतक झळकावलं. हनुमंतसिंह यांच्यासोबत १९३ धावांची भागीदारीही रचली. मात्र याच द्विशतकामुळे भारतीय कर्णधार पतौडीने डाव उशीरा घोषित केला, ज्यामुळे त्या काळात पतौडींना टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. दिलीप सरदेसाईला “Renaissance of Indian Cricket” असं म्हटलं जातं. १९७१ च्या विंडीजविरुद्ध मालिकेत ३ शतकं आणि त्यात एक द्विशतक सरदेसाईंनी झळकावलं. इंग्लंडवर ओव्हल कसोटीत भारताच्या इंग्लिश भूमीवरील पहिल्या-वहिल्या विजयात देखील सरदेसाईचा मोलाचा वाटा होताच. सरदेसाईच्या क्रिकेट कारकीर्दत मुंबईने रणजी करंडकावरील आपली पकड १५ वर्ष निसटू दिली नव्हती (१९५८-१९७३) आणि त्यांना याचा सार्थ अभिमान होता. सॅल्यूट दिलीप सरदेसाई!