– नामदेव कुंभार

आपल्या डोळय़ांसमोर ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वासाने आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश पायात लोळण घालते. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातील विजय असाच होता. या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते. भारतीय कर्णधार विराट कोहलीला आफ्रिका आणि इंग्लंडमधील पराभवामुळे कोणत्याही परिस्थितीत हा विजय मिळवायचाच होता. विराट कोहलीमध्ये चुका समजून घेऊन त्या सुधारण्याची क्षमता अधिक आहे. आफ्रिका-इंग्लंडमध्ये झालेल्या चुकावर गांभिर्याने काम केलं. त्याचाच परिणाम म्हणून भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवला. भारताला या विजयासाठी ७१ वर्ष वाट पाहावी लागली.

१९४७-४८ नंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये डझनभर दौरे केले, पण तेथील उसळत्या खेळपट्यांवर भारतीय संघाला विजयासाठी २०१८-१९ उजडावे लागले. फक्त भारतच नाही तर आशिया खंडातील इतर कोणत्याही संघाला ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजय मिळवता आला नाही. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जात होते. स्मिथ आणि वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी कुमकुवत होती. मात्र, त्याहून अधिक आपल्या गोलंदाजीचे आक्रमण बलाढ्य होतं. स्मिथ-वॉर्नरच्या जोडीला भारतीय गोलंदाजांनी नाकी-नऊ आणलेच असते. शिवाय कांगारूच्या गोलंदाजांनाही या दोघांची कमी अधिक भासली असेल. कारण, त्यांची चेंडू कुरतडण्याची कला इतरांना जमली नाही किंवा तसे धाडसच झाले नाही.

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी कुमकुवत वैगरे नव्हती. कारण घरच्या मैदानावर प्रत्येक संघाला फायदा होतो. ऑस्ट्रेलियाने आपला सर्वोत्तम संघ उतरवला होता. त्यांना आपण पाणी पाजले हे नक्की. भारतीय संघातील गोलंदाजांनी गतवर्षात २५० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. आफ्रिका, इंग्लंड आणि आता ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या वेगवान माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाच्या फंलदाजांनी नांगी टाकली आहे. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत असेल; पण गोलंदाजी जवळपास जागतिक दर्जाची होती. खेळपट्टय़ा त्यांच्या होत्या. त्या बनवणारे क्युरेटर्स त्यांचे होते. पाच महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये आपल्या सरासरी ३०० धावा झाल्या असत्या तर आपण मालिका जिंकलो असतो. पण तेवढय़ाही आपल्याला जमत नव्हत्या. तिथे विराट कोहली हा एकटाच फलंदाजी करत होता. त्याला इतर फलंदाजांनी हवी तशी साथ दिली नाही. ऑस्ट्रेलियात धावांच्या बाबतीत पुजाराने रतीब घातला. त्याला विराट कोहली आणि पंत यांनी चांगली साथ दिली.

दुसऱ्या कसोटीचा अपवाद वगळता मालिकेवर विराटसेनेचे वर्चस्व होते. या मालिकेत तीन शतकांसह पुजाराने ५२१ धावा केल्या. सचिन-द्रविड़-गांगुली-लक्ष्मण यासारख्या दिग्गज खेळाडूनंतर पुजाराने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीच्या बळावर संघाला विजय मिळवून दिला. कसोटीमध्ये चेंडूवर नजर ठेवून संयमाने फलंदाजी करावी लागते. टी-२० सारख्या क्रिकेटमुळे सध्याच्या फलंदाजांमध्ये हा संयम दिसून येत नाही. पुजाराशिवाय मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारीनेही आपली छाप सोडली आहे. दोघांचेही रणजी क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे. मयंकच्या रूपाने भारताला सलामीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

मयंकची सुरुवातीलाच अग्निपरिक्षा झाली आहे. तो ज्या परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये उतरला आणि यशस्वी झाला. त्यावरून तो लंबी रेस का घोडा असल्याचे वाटतेय. मयंकने अवघड पेपर सोप्या पद्धतीने सोडवल्यामुळे मुरली विजयचा पत्ता कट झाला असे म्हटल्यास वावगे वाटायला नको. त्याचप्रमाणे दुखापतीतून सावरून पृथ्वी शॉ परल्यानंतर राहुललाही झटका बसण्याची शक्यता आहे. मयंकने अखेरच्या दोन्ही कसोटीत नवा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला. पुजारा आणि मयंकमुळे मधल्या फळीपर्यंत नवीन चेंडू पोहचलाच नाही. आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये आपली हीच चूक झाली होती. सुरूवातीलाच धक्के बसत होते. त्यानंतर विराट एकटाच भिंत बनून उभा राहत होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताच्या प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले आहे.

अनेक वर्षांनंतर आशिया खंडाबाहेर वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणासमोर भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजांची गोलंदाजी पाहून आनंद मिळाला. धावांचं पुरेसं पाठबळ मिळाल्यामुळे कांगारूंना गुंडाळणं त्यांना सोपं गेलं. भारतासाठी हा विजय सकारात्मक संकेत आहे. भारतीय संघ योग्य दिशेने जात आहे. पण भारताची खरी परिक्षा इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकात आहे. त्यावेळी भारतीय संघातील खेळाडू कसे प्रदर्शन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सध्या भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. संघाची कामगिरी पाहाता विश्वचषकात संतुलित संघ जाईल अशी अपेक्षा आहे. संघातील तरूण खेळाडू विश्वचषकात चांगली कामगिरी करतील अशी आपेक्षा आहे. सध्याच्या संघतील खेळाडूचे सरासरी वय २५-२८ असे आहे. या वयातील खेळाडूमध्ये एक वेगळीच इच्छाशक्ती आणि उर्जा असते. जे खेळाप्रति प्रमाणिक आणि मेहनती असतात. क्षणात आपला खेळ बदलण्याची क्षमता त्यांच्याकडे राहते. उदाहरण म्हणून ऋषभ पंतचा खेळ पाहा. इंग्लंडमध्ये खेळताना अडखळणारा पंत ऑस्ट्रेलियात अनुभवी खेळाडूसारखा खेळत होता. त्याच्यात आत्मविश्वास होता. क्षणात सामना फिरवण्याच्या क्षमता त्याच्यामध्ये आहे. एकदिवसीय संघामध्ये सध्या पंतला स्थान नसले तरी भविष्यात तो संघाचा अविभाज्य घटक होईल.

ऑस्ट्रेलियात मिळवलेला विजयाने भारतीय संघामध्ये एक उर्जा निर्माण केली आहे. मे महिन्यात होणाऱ्या विश्वचषकांमध्ये याच उर्जेने विराट सेनेने उतरायला हवं. त्यासाठी संघातील खेळडूंना आराम मिळणं गरजेचं आहे. विराट कोहलीने गेल्या काही दिवसांपासून ही काळजी घेतली आहे. विशेषत: वेगवान गोलंदाजांना त्यानं योग्य पद्धतीने आराम दिला आहे. वर्ल्डकपमध्ये बुमराह, भुवनेश्वर आणि शमी फिट असणं गरजेच आहे. यांच्याशिवाय कुलदिप-जाडेजा-चहल या तिकडीलाही कोहलीने रोटेशन पद्धतीने आराम दिला आहे. कोहलीपुढे विश्वचषात सर्वात मोठा प्रश्न केएल राहुलचा आहे. कारण राहुल भारताचा तिसरा सलामीवीर आहे. आणि सध्या राहुल खराब फॉर्ममध्ये आहे. जर राहुलला घेऊन विश्वचषकात भारत उतरल्यास भारताला पराभवलाही सामोरं जावं लागू शकते. त्यामुळे विराटने लवकरात लवकर यावर उपाय शोधावा. ऑस्ट्रेलियातील मिळालेला विजय म्हणजे फक्त सुरूवात आहे. खरी परिक्षा विश्वचषकामध्ये होईल. विराट कोहलीच्या डोळ्यासमोर विश्वचषकाचे ध्येय आहे. ते गाठण्यासाठी त्याने वर्षभरापासून जिद्दीने तयारी सुरू केली आहे. संघाला सोबत घेऊन प्रमाणिकपणे प्रयत्न करत आहे. जर सर्व व्यवस्थित घडून आल्यास यश विराट कोहलीच्या पायात लोळण घालेल आणि भारत तिसऱ्यांदा जगज्जेता होईल!