दिलीप ठाकूर

‘अॅव्हेंजर्स ‘च्या अॅडव्हास बुकिंगमधील तिकीटाबाबत आजचा “युथ ” व्हाॅटसअपवर कसा संवाद साधतोय? मला शुक्रवारचे रात्री दीडच्या शोचे तिकीट मिळाले, ऑनलाईनही बुकिंगलाही बराच वेळ गेला. यावर समोरुन मेसेज येतोय, तरी तू नशीबवान आहेस, मला तर रविवार पहाटे साडेचार वाजताचे तिकीट मिळाले, काही हरकत नाही, रविवारी रजाच आहे आणि सोमवारी निवडणूक आहे….

‘अॅव्हेंजर्स-एंडरगेम ‘ ही आजच्या डिजिटल पिढीची जबरदस्त क्रेझ आहेच, पण त्याने चोवीस तासात काही मल्टीप्लेक्समध्ये कधीही जा, या चित्रपटाचे राऊंड शो सुरू आहेत हा नवाच ट्रेन्ड आणलाय आणि अशाच काही बहुचर्चित हाॅलीवूडपट आणि हिंदीतील मोठे चित्रपट यांसाठी पहिले तीन दिवस तरी असेच एकामागोमाग शो असणार…

आता रात्री दीड व साडेतीन/चार वाजता सिनेमा पाह्यला कोण येतेय असा प्रश्न करणारे बहुदा एक गोष्ट विसरतील की, मुंबई चोवीस तास जागे वा कार्यरत असणारे शहर आहे. त्यात पुन्हा काहींना रात्री उशीराच शांतपणे चित्रपट पहावासा वाटतो ( दिवसभर मानसिक चढउतार सुरु असतात ना?) आणि ‘अॅव्हेंजर्स ‘सारख्या जबरा क्रेझ असलेल्या चित्रपटाला कधी बरे पाहतोय अशी भारी ओढ असलेल्या युथला वेळेचे भान ते कसले? सिनेमासाठी वाट्टेल ते आणि तेव्हा असा फंडा असलेले कधी बरे आपण सिनेमा पाहून ते इतरांना सांगतोय अशा पवित्र्यात असतात.

थोडसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन सांगायचे तर, आपल्याकडे शहरी भागात दिवसा तीन खेळ आणि ग्रामीण भागात दिवसा दोन खेळ अशी स्थिरावलेली प्रथा होती. साठच्या दशकात शहरात मॅटीनी शो कल्चर आले. म्हणजे सकाळी साडेअकराचा खेळ. तर वीजेच्या लंपडावामुळेच ग्रामीण भागात दिवसा दोन खेळ होत. काही गावातील ओपन थिएटरला तर एकच खेळ होई. आता हे सगळे आठवणीत राहिले. पण विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी ‘( १९९१) ने ग्रामीण भागात दिवसा पाच खेळ हा प्रकार आणला. सकाळी नऊ वाजता पहिला खेळ आणि मग अडिच तासाच्या अंतराने एकेक असा प्रकार सुरु झाला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जत्रांमधील तंबू थिएटर्समध्ये असे खेळ रंगू लागले. तेथे आत जेवढी आणि जशी गर्दी असते, त्यापेक्षा बाहेर जास्त असते. आणि हेच कल्चर राऊंड शोला पूरक ठरते.

‘गदर एक प्रेमकथा ‘चे उत्तर भारतातील अनेक ठिकाणी असेच सकाळपासूनच शो सुरु झाले. असे जबरदस्त हवा निर्माण झालेले चित्रपट आपण कधी बरे पाहतोय अशी गर्दीची मानसिकता असते आणि मग असे ‘जादा खेळ ‘ होतात. आपल्या सिनेमावेड्या देशात असे काहीही घडू शकतं आणि ही क्रेझ फक्त आणि फक्त पडद्यावरच्या विश्वाशी एकरुप होऊन टाळ्या शिट्ट्यांनी चित्रपट एन्जाॅय करते. मल्टीप्लेक्स युगात जणू अधिकृतरित्या सकाळी नऊचा खेळ सुरु झाला आणि काॅलेज जीवनाला एक रंग आला. सत्तरच्या दशकात लेक्चर बुडवून मॅटीनी शो पाह्यचे जणू व्रत होते. आताचा युथ सकाळीच नऊ वाजता सिनेमाला येऊ लागला. मल्टीप्लेक्सने रात्री साडेदहा वा अकरा वाजताचा मिडनाईट मॅटीनी शो सुरु केला. वडाळ्याच्या आयनाॅक्समधून त्याची सुरुवात करताना मिडियालाही बोलावले. तेव्हा समजले की, अगोदर मस्तपैकी महागडे खाणे खा आणि मग सिनेमा एन्जाॅय करा अशी ती संकल्पना आहे. थोड्याच दिवसात अनेक मल्टीप्लेक्समध्ये रात्री साडेदहा वा अकरा वाजताचा खेळ हाऊस फुल्ल होऊ लागला. सुल्तान, दंगल, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा चित्रपटांना तर पहिले दोन तीन आठवडे सगळ्याच खेळांना गर्दी असते, त्यात मग सुखवस्तू रसिकांना रात्रीचा उशीराचा खेळ आपलासा वाटू लागला. रजनीकांत क्रेझने यात आणखीन भर टाकली. त्याचा मुंबईत जबरदस्त चाहतावर्ग आहेच, ते फॅन क्लब आपल्या रजनीसरांसाठी सकाळीच साडेपाचला मांटुग्याच्या अरोरा अथवा सायनच्या मल्टीप्लेक्सला खास खेळ आयोजित करु लागले. तेही कमी पडतेय म्हणून वडाळ्याच्या आयनाॅक्समध्ये गेले. सकाळीच वाजत गाजत नाचत रजनीच्या महामसालेदार चित्रपटाचे आगमन, रजनीच्या भल्या मोठ्या कटआऊटसला दूधाने आंघोळ ही दक्षिणेकडील संस्कृती येथे आली आणि सहज रुजली. बरं एकदा तर अरोरामध्ये रजनीकांतचा सिनेमा पाह्यला मधुर भंडारकर आल्याने या खेळाला प्रतिष्ठाही आली. ही छोटी गोष्ट वाटेल, पण त्याचीच बातमी होऊन पहाटेचा खेळ अधोरेखित झाला.

‘बाहुबली ‘च्या दोन्ही भागानाही अशीच तुडुंब गर्दी झाली. सकाळीच उठून सिनेमा पाह्यला जायचे ही फक्त कल्पना ( वा अगदी थट्टा) न राहता ती वस्तुस्थिती झाली. ठग्ज ऑफ हिन्दुस्तान, झीरो, कलंक अशा पडद्यावर आल्या आल्या पडलेल्या चित्रपटानाही पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वा नउच्या खेळास गर्दी झाली पण त्यांच्या मध्यंतर होईपर्यंत मेसेज फिरले की, या पिक्चरमध्ये दम नाही. कलंकची तर पुढच्याच खेळापासून गर्दी ओसरली आणि खिरापतीप्रमाणे वाटलेल्या मुलाखती निष्प्रभ ठरल्या. ढीगभर मुलाखतीने चित्रपट मोठा होत नाही. रजनीकांत कधीच मुलाखती देत नाही, त्याची प्रतिमाच बरेच काही बोलते. आणि सगळे संदर्भ बदलते.

एव्हाना तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मराठी चित्रपटात असे भाग्य कधी बरे लाभले? कट्यार काळजात घुसली आणि मुंबई पुणे मुंबई ( पहिला) यांच्या सकाळी नऊचा खेळांना गर्दी झाली होती. ते सातत्य आपण ठेवताना अशा गोष्टीत मराठी चित्रपट मागे नाही असा प्रेक्षकांना विश्वास द्यायला हवा होता. मराठी चित्रपटावर प्रचंड प्रेम करणारा रसिक वर्ग आहे, पण अनेकदा तरी अवाजवी खेळ घेऊन आपल्या गर्दीचे फारच विभाजन होते आणि मराठी चित्रपट चालत नाहीत अशी दुर्दैवाने चुकीची प्रतिमा होते. मराठी चित्रपट मोठाच आहे, पण आपण शोची संख्या मोठी मानतो. दुर्दैवाने हे पटतच नाही.

‘अॅव्हेंजर्स ‘ने हे सगळेच खूप पुढे नेले. एका वृत्तानुसार काही मल्टीप्लेक्समध्ये सेकंदाला ऑनलाईन अठरा तिकीटांची विक्री झाली. सुपर हीरोंचा भरणा असलेले हा महामनोरंजनाचा तडका मोठा पडदा आणि अत्याधुनिक साऊंड सिस्टीममध्ये एन्जाॅय करण्यात आजचा युथ क्रेझी आहे. मोबाईलवर जगभरातील माहिती आणि मनोरंजनाची बहुरंगी दुनिया असली तरी एकादा चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये खेचून घेऊ शकतो हेही सिध्द झाल्याने, आमचा नवा चित्रपट थिएटरमध्येच येऊन पहा असे कळकळीने आवाहन करण्यापेक्षा ( विशेषतः मराठी चित्रपट) चित्रपटात दम पाहिजे, नाविन्य पाह्यजे तर मग सिनेमाची वेळ दिवसा वा रात्री कधीची का असेना? पब्लिक झुंडीच्या झूंडीने यायला तयार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रसिकांना मोठ्या पडद्यावर आणि पडदाभर चित्रपट पाह्यचाय, तसे काही भन्नाट द्या…