राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यात, अखेरच्या षटकार घडलेल्या नाट्यामुळे तापलेलं वातावरण आता हळूहळू निवळायला लागलंय. ‘कॅप्टन कूल’ नावाने परिचीत असलेल्या महेंद्रसिंह धोनीचा रुद्रावतार या सामन्यात प्रेक्षकांना पहायाल मिळाला. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पंचांनी पहिल्यांदा दिलेला नो-बॉलचा निर्णय रद्द केला. त्यामुळे नाराज झालेल्या धोनीने मैदानात येऊन पंचांकडे स्पष्टीकरण मागितलं. धोनीच्या या वागण्यावरुन त्याच्यावर टीकाही झाली. बाद झाल्यानंतर एखाद्या खेळाडूने किंवा कर्णधारानने अशा पद्धतीने मैदानात येऊन पंचांशी वाद घालणं चुकीचं असल्याचं मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केलं. यासाठी धोनीला त्याच्या मानधनामधून 50 टक्के रक्कम गमवावी लागली. मात्र या संपूर्ण प्रकारात भारतीय पंचांच्या सुमार कामगिरीचा मुद्दा हा सोयिस्करपणे विसरला जातो आहे.

राजस्थानविरुद्ध सामन्यात पंच उल्हास गंधे यांनी दिलेला नो-बॉलचा निर्णय दुसरे पंच ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी रद्द केला. आयपीएलच्या बाराव्या हंगामात पंचांनी दिलेला हा काही एकमेव वादग्रस्त निर्णय नाहीये. याआधी, मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात पंच एस. रवी यांनी शेवटच्या षटकात लसिथ मलिंगाने टाकलेल्या नो-बॉलकडे दुर्लक्ष केलं. नेमक्या याच चेंडूवर डिव्हीलियर्स माघारी परतल्यामुळे बंगळुरुला सामना गमवावा लागला होता. याव्यतिरीक्त अनेक नो-बॉल, वाईड बॉलचे निर्णय वादग्रस्त पद्धतीने दिले गेले आहेत. या प्रकारामुळे चाहते आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय पंच हे मस्करीचा मुद्दा ठरत आहेत. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलही पंचांच्या या सुमार कामगिरीवर नाराज असल्याचं कळतंय. मात्र बीसीसीआयकडे अनुभवी पंचांची कमतरता असल्यामुळे, अशा वादग्रस्त निर्णयांसाठी त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचं, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

मात्र जगातली सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना अशी ओळख असलेल्या बीसीसीआयकडे, पंचांच्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी एक यंत्रणा असू नये ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. सध्या स्थानिक पंचांसाठी बीसीसीआय नक्की कार्यक्रम राबवत आहे, मात्र प्रत्यक्ष सामन्याच पंचांची कामगिरी पाहता हा कार्यक्रम पुरेसा नसल्याचं स्पष्ट होतंय. बरं पंचांची ही कामगिरी फक्त आयपीएलच्या सामन्यांमध्ये सुमार होतेय का?? तर नाही…स्थानिक रणजी सामन्यांमध्येही पंचांकडून अशाचप्रकारे वादग्रस्त निर्णय दिले गेलेले आहेत. अशा स्पर्धांमध्ये DRS (Decision Review System) यंत्रणा नसल्यामुळे खेळाडू तिसऱ्या पंचांकडे दादही मागू शकत नाहीत. स्थानिक सामन्यांमध्येही अनेकदा खेळाडूंनी पंचांच्या कामगिरीबद्दल सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. मात्र यावर कारवाई होताना आणि पंचांच्या कामगिरीत सुधार होताना कधीच दिसत नाही.

पंच हे देखील माणूसच आहेत, आणि त्यांच्याकडूनही चुका होऊच शकतात असा बचाव अनेकांकडून केला जातो. काही क्षणांसाठी हा मुद्दा आपण ग्राह्य धरुया…याच कारणासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये DRS (Decision Review System) ही यंत्रणा राबवण्यात आली. म्हणजे पंचांनी दिलेल्या एका निर्णयाबद्दल जर खेळाडू खूश नसतील तर ते तिसऱ्या पंचांकडे दाद मागू शकतात. तसेच खुद्द पंचांनाही एका विशिष्ठ घटनेत संभ्रम असेल तर ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. पायचीतचे निर्णय देताना पंचांकडून थोड्याफार चुका होणं मान्य आहे. मात्र सोप्या-सोप्या रनआऊट प्रकारातही पंच आजकाल थेट तिसऱ्या पंचांवर अवलंबून रहायला लागले आहेत.

कित्येकदा, समोर बसलेल्या माणसाला खेळाडू धावबाद असल्याचं कळतं असतं. टीव्ही रिप्लेमध्ये खेळाडू कॅमेऱ्याच्या फ्रेममध्येही नसतो आणि स्टम्प उडालेले असतात. अशावेळेलाही तिसऱ्या पंचांची मदत का घेतली जाते?? याहुन धक्कादायक प्रकार म्हणजे, एखादा खेळाडू झेलबाद झाल्यानंतर, गोलंदाजाने नो-बॉल तर टाकलेला नाही ना हे पाहण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतात. हा भीषण प्रकार कुठेतरी थांबायलाच हवा. गोलंदाज नो-बॉल टाकतोय की नाही याकडे पंचांचं लक्ष देणं हे गरजेचच आहे. यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घ्यावी लागत असेल तर भविष्यकाळात पंचांच काम रोबोटने केलं तर आश्चर्य वाटायला नको.

क्रिकेटला Gentleman Game म्हणून ओळखलं जातं…मात्र असले प्रकार या खेळाची प्रतिष्ठा धुळीस मिळवायला पुरेसे आहेत. त्यामुळे पाणी पुलाखालून वाहून जाण्याआधी बीसीसीआय यावर उपाययोजना करेल अशी आशा आहे. कारण कितीही झालं तरी आशेवरच हे जग सुरु आहे.