News Flash

BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??

चेन्नई सुपरकिंग्ज गुणतालिकेत तळातल्या स्थानावर

आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज हा नुसता संघ नाही तर ते एक वेगळं समीकरण आहे. २००८ साली महेंद्रसिंह धोनी नावाच्या तुलनेत नवख्या खेळाडूकडे चेन्नईच्या संघाची सूत्र आली आणि बघता बघता आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर धोनीने चेन्नई सुपरकिंग्जला मोठं केलं. तुम्हाला मुंबई इंडियन्सचे चाहते काही ठराविक शहरांमध्ये सापडतील, पण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी धोनी आणि चेन्नई सुपरकिंग्जचा एकतरी फॅन तुम्हाला सापडेलच. दोन वर्षांच्या बंदीचा काळ सोडला तर १० वर्षांच्या कालावधीत धोनीने एकहाती चेन्नईचा भार आपल्या खांद्यावर सांभाळला. १० हंगामांपैकी प्रत्येक हंगामात क्वालिफाय फेरीत प्रवेश, ८ वेळा अंतिम फेरीत प्रवेश, ३ वेळा विजेतेपद असं भरपूर यश चेन्नईने आतापर्यंत अनुभवलं. परंतू २०२० वर्षात चेन्नईच्या संघासाठी सगळंच विपरीत घडत गेलंय.

सुरुवातीला रैना आणि हरभजन यांनी स्पर्धेआधीच घेतलेली माघार, रैना हॉटेलमधील रुमवरुन नाराज असल्याच्या बातम्या समोर येणं, संघातील प्रमुख खेळाडूंना करोनाची लागण, स्पर्धेदरम्यान महत्वाच्या खेळाडूंचं दुखापतग्रस्त अशा एक ना अनेक आव्हानांचा चेन्नईने यंदाच्या हंगामात सामना केला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात हरवून दणक्यात सुरुवात केलेल्या चेन्नई सुपरकिंग्जची गाडी नंतर घसरली ती घसरलीच. आतापर्यंतच्या हंगामात असं चित्र कधीचं दिसलं नसेल ते या हंगामात दिसतंय. सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज संघ थेट गुणतालिकेत तळातल्या स्थानावर घसरला. संघाच्या खराब कामगिरीबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नाराजी होतीच. परंतू राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनीने, आमच्या संघातील काही यंगस्टर्समध्ये स्पार्क दिसला नाही असं म्हणत पुन्हा एकदा वादाला तोंड फोडलं आहे.

आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं असेल की धोनी सामन्यानंतर बोलताना नेहमी प्रोसेस या शब्दाचा वापर करतो. एखादा खेळाडू खराब कामगिरी करत असला तरीही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला धीर देऊन त्याच्याकडून चांगलं काम करवून घेण्याकडे धोनीचा कल असतो. आतापर्यंत आपण अनेकदा याचा अनुभव घेतला आहे. पण यंदाचा हंगाम पाहता धोनी ज्या यंगस्टर्सबद्दल बोलतो आहे, अशा किती यंगस्टर्सना धोनीने तेराव्या हंगामात संधी दिली?? प्रोसेसवर विश्वास ठेवणारा धोनी संघाची खराब कामगिरी झाल्यानंतर पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतोय का असा प्रश्न आता मनात यायला लागतो. खरं पहायला गेलं तर चुकीच्या खेळाडूंना दिलेला वारंवार पाठींबा आणि सुरेश रैनाने घेतलेली माघार हे प्रकरण हाताळण्यात चेन्नईचा संघ यंदा अयशस्वी ठरला. संपूर्ण हंगामात चेन्नईचा संघ सुरेश रैनाचा पर्यायी खेळाडू शोधू शकला नाही. वॉटसन, धोनीचं वाढतं वय, फलंदाजीत पहिल्यासारखं न राहिलेलं सातत्य या सर्व गोष्टींचा फटका चेन्नईला यंदा बसला.

केदार जाधव हा यंदाच्या हंगामात पूर्णपणे फेल गेलेला खेळाडू ठरला. ८ सामन्यांमध्ये फक्त ६२ धावा अशी कामगिरी केल्यानंतरही धोनीही केदारवर मेहेरनजर कायम आहे. संघ संकटात सापडलेला असतानाही अगदी अगदी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापर्यंत केदार जाधवला धोनीने संधी दिली. याच जागी तामिळनाडूचा एन. जगदीशन हा फक्त एक सामना खेळला, या सामन्यात त्याने ३३ धावा केल्या आणि नंतर तो परत संघाबाहेर गेला. जी गोष्ट जगदीशनसोबत झाली तिच महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडबद्दल. ऋतुराज हा स्थानिक क्रिकेटमध्ये आणि भारत अ संघाकडून सलामीच्या जागेवर खेळलेला खेळाडू…परंतू आयपीएलमध्ये धोनीने मुरली विजयवर सलामीसाठी विश्वास दाखवला. भारतीय संघातून बाहेर फेकला गेलेला मुरली विजय हा यंदा आपण कसोटी क्रिकेट खेळत असल्याच्या थाटात सुरुवातीचे काही सामने खेळला.

टी-२० क्रिकेटमध्ये तुमचा सलामीचा फलंदाज बॉल वाया घालवत असेल तर संघाला चांगली सुरुवात कशी मिळणार?? शेन वॉटसन हा प्रतिभावान आणि अनुभवी खेळाडू आहे…पण वयोमानापरत्वे त्याच्या शरिराची हालचाल सुरुवातीसारखी होत नाही हे वारंवार सिद्ध झालंय. ज्या थोड्याफार सामन्यांमध्ये ऋतुराजला संधी मिळाली तिकडेही तो धावा जमवण्याच्या दडपणाखाली मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पण हे दडपण त्याच्यावर आलं ते सलामीला मुरली विजयने केलेल्या कासवछाप खेळाने हे धोनी सोयीस्करपणे विसरतोय का?? यंदाच्या हंगामात धोनीने सॅम करनवर जेवढा विश्वास दाखवला तेवढा त्याने स्वतःवर दाखवला नसेल. गोलंदाजी, फलंदाजीत सलामीच्या स्थानावर बढती, मिडल ऑर्डर असे सर्व प्रयोग आणि संधी सॅम करनला देऊन झाली. परंतू गोलंदाजीतलं यश वगळता इतर क्षेत्रात करनची कामगिरी यथातथाच आहे. फाफ डु-प्लेसिस हा एकमेव खेळाडू चेन्नईकडून आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करतो आहे. परंतू दुर्दैवाने त्याला इतर कोणत्याही खेळाडूची म्हणावी तशी साथ मिळालेली नाही.

मिचेल सँटनर, इम्रान ताहीर यासारखे गुणवान आणि अनुभवी खेळाडू यंदा CSK कडून राखीव खेळाडूंच्या बेंचवर बसून राहिले. ब्राव्होला संधी मिळाली पण दुखापतीमुळे तो पुन्हा एकदा बाहेर फेकला गेला. खरं सांगायला गेलं तर चेन्नईच्या खेळाडूंमध्ये यंदा विजयाची भूकच दिसली नाही. मैदानावर स्थिरावण्यासाठी १०-१२ चेंडू वाया घालवणं, फटकेबाजी न करणं, फलंदाजीचा चुकलेला क्रम, धोनीने चुकीच्या खेळाडूंवर दाखवलेला विश्वास…अशा गोष्टी चेन्नईला मारक ठरल्या आहेत. मग अशावेळी काही यंगस्टर्समध्ये स्पार्क दिसला नाही हे कारण देऊन धोनी पळवाट शोधण्याचा प्रयत्न करतोय का असं वाटत राहतं. स्पर्धा म्हटली की जय-पराजय या गोष्टी आल्याच. एखाद्या हंगामात एखादा संघ खराब कामगिरी करतो हे देखील समजून घेण्यासारखं आहे. पण चुकांचं लंगड समर्थन करण्यासाठी तरुणांना जबाबदार धरण्याने काहीच साध्य होणार नाही.

यंदाच्या हंगामातलं चेन्नईचं आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. एक पराभव आणि चेन्नई यंदा साखळी फेरीतून बाहेर जाईल. परंतू चेन्नईसाठी खरं आव्हान हे पुढच्या हंगामात असणार आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता BCCI २०२१ साली होणारं मेगा ऑक्शन रद्द करुन आहे त्या खेळाडूंनिशीच स्पर्धा खेळवण्याचा विचार करत आहे. असं झालं तर CSK ला पुन्हा एकदा आहे त्या खेळाडूंनिशीच मैदानात उतरावं लागेल. यंदाच्या वर्षासाठी करोनामुळे सरावासाठी पुरेसा वेळ न मिळणं हे कारण देता येईल, पण चेन्नईला जुने दिवस आणायचे असतील तर धोनीला या सर्व गोष्टींची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा सुरळीत बसवावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 1:31 pm

Web Title: ipl 2020 dhoni blame some of youngsters but what about opportunity experts not agree with his statement psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 CSK कात टाकणार; पुढील सामन्यांत मिळणार यंग ब्रिगेडला संधी
2 Ctrl C + Ctrl V : IPL च्या नकली गोंगाटामध्ये मुंबईतल्या इंजिनीअर्सची कामगिरी
3 IPL 2020: अरेरे… ‘कॅप्टन कूल’ धोनीची ‘ती’ खास परंपरा खंडीत
Just Now!
X