समजा तुम्ही एखाद्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलाय आणि तिकडे गायकाने अचानक तुमच्यासमोर लावणी गायला सुरुवात केली तर?? किंवा तुमच्या आवडच्या रॉक स्टारच्या शो साठी तुम्ही गेलात…आणि सर्वांना धक्का देत त्याने हातात तानपुरा घेत शास्त्रीय संगीत सुरु केलं तर?? चाहते म्हणून कृत्रिमपणाची भावना तुम्हाला नक्कीच येईल. आयपीएलच्या तेराव्या हंगामातला पहिला सामना शनिवारी अबु धाबीत पार पडला. जगभरात आणि भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन युएईत केलंय. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी मैदानात प्रेक्षकांना हजर राहण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. परंतू आयपीएल ही स्पर्धा नुसती खेळाची नाही ती स्पर्धा ग्लॅमर-इव्हेंट आणि शो बाजीची आहे. ओपनिंग सेरेमनी, चिअरलिडर्स, बॉलिवूड स्टार्सची मैदानात हजेरी असे ठळक इव्हेंट हे या स्पर्धेदरम्यान चर्चेचा विषय बनतात.

खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चौकार-षटकार लगावल्यानंतर, विकेट गेल्यानंतर म्युझिकच्या तालावर नाचणाऱ्या चिअरलिडर्स हा देखील आयपीएलचा एक महत्वाचा भाग मानला जातो. परंतू यंदा करोनामुळे या सर्व गोष्टींवर काट मारण्यात आली. परंतू क्रिकेटचे सामने आणि ते देखील प्रेक्षकांविना?? हे समीकरणं कसं बरं जुळवायचं?? यासाठी उपाय काढण्यात आला तो म्हणजे प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाज, टाळ्या-शिट्ट्या…चिअरलिडर्सच्या रेकॉर्डेड डान्स मूव्ह्ज यांचा…लॉकडाउन पश्चात खेळवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्येही हा पर्याय वापरण्यात आला आहे. परंतू आयपीएलमध्ये उत्साह खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी केलेला हा खटाटोप प्रेक्षकांच्या तितकासा रुचलेला दिसत नाहीये.

प्रदीर्घ काळानंतर भारतीय चाहत्यांना क्रिकेटची पर्वणी मिळत असल्यामुळे अनेकांनी पहिला सामना टिव्हीसमोर बसून पाहिला. परंतू सामन्यादरम्यान प्रेक्षकांचे रेकॉर्डेड आवाजाचे व्हिडीओ, चिअरलिडर्सचा डान्स या सर्व गोष्टी कृत्रिम वाटत होत्या. अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त करत यावर काहीतरी उपाय काढण्याची मागणी केली. पाहूयात चाहत्यांच्या काही मोजक्या प्रतिक्रिया…

क्रिकेटचा सामना मैदानात जाऊन पाहणं हा जसा एक अनुभव असतो तसाच तो घरात बसून टीव्हीवर पाहणंही एक वेगळा अनुभव असतो. कॉमेंट्रीची जादू, संध्याकाळच्या वेळी घरात आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत एकत्र येऊन सामने पाहणं. उत्कंठावर्धक क्षणांमध्ये कॉमेंट्रेटर्सचा वाढलेला आवाज हे सर्व क्षण चाहते एन्जॉय करतात. ज्यावेळी प्रेक्षक मैदानात सामना पाहण्यासाठी हजर असतात त्यावेळी त्यांचा असणाऱ्या आवाजाची मजा ही काही वेगळीच असते. परंतू आयपीएलमध्ये राबवलेली रेकॉर्डेड आवाज आणि चिअरलिडर्सची पद्धत ही निरस करणारी आहे. साधा फटका खेळल्यानंतरही अवास्तव वाढणारा आवाज आणि गोंधळ हा घरात बसून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या आनंदात मिठाचा खडा टाकणारा ठरतो. सुनील गावसकर, सायमन डुल, पॉमी एम्बांग्वा आणि इतर चांगल्या कॉमेंट्रेटर्सचा आवाज ऐकताना मध्येच वाढणारा प्रेक्षकांचा आवाज हा अनेकांचा रुचला नाही. ज्यामुळे Whats App ग्रूप, सोशल मीडियावर अनेकांनी आज पहिल्यांदा आवाज म्यूट करुन सामना पहावा लागतोय अशी भावना व्यक्त केली.

आता ही झाली एक बाजू…आयपीएल स्पर्धेला मिळालेलं ग्लॅमर लक्षात घेता मैदानात प्रेक्षकांविना सामना खेळणं हे अनेकदा खेळाडूंसाठी निराशाजनक ठरु शकतं. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांची दाद मिळणं, त्यांच्याकडून हुरुप मिळणं या गोष्टी गरजेच्या असतात. भारतात बहुतांश वेळा रणजी सामने हे प्रेक्षकांविना खेळवले जातात. काही सामन्यांचं थेट प्रसारणही केलं जातं. परंतू या सामन्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत नाही. यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मैदानात चाहते हजर नसल्यामुळे सामना पाहताना माहोल तयार होत नाही. दर्दी क्रिकेट चाहत्यांचा अपवाद वगळला, तर असे सामने पाहणाऱ्यांची संख्या ही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइततीच असेल.

त्यामुळे ही बाजू लक्षात घेतली, तर आयपीएलमध्ये खेळाडूंसाठी रेकॉर्डेट आवाज, टाळ्या-शिट्ट्या, चिअरलिडर्सच्या डान्स मूव्ह्ज या सर्व गोष्टी योग्य वाटायला लागतात. परंतू यातही मध्यमार्ग शोधण्याची गरज वाहिनीला आहे. खेळाडूंचा मैदानात हुरुप वाढवणं जेवढं गरजेचं आहे तेवढचं घरात बसून सामना पाहणारा प्रेक्षकही महत्वाचा आहे. त्याची नाराजी ओढवून कसं बरं चालेल??