– सुनिता कुलकर्णी

समजा, तुमचा एखादा चाहता आहे… तो तुमच्यासाठी काय करेल असं तुम्हाला कुणी विचारलं तर…? उत्तर देण्यासाठी खूप वेळ डोकं लढवावं लागेल ना?

पण भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएल टीमचा सध्याचा कप्तान असलेल्या महेंद्रसिंग धोनीला या प्रश्नाचं उत्तर द्यायला एका सेकंदाचाही वेळ लागत नाही. कारण त्याचे चाहते त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. हो, अगदी वाट्टेल ते.

आता गेली १२ वर्षे दुबईमध्ये नोकरी करणारा तिशीचा गोपीकृष्णनच बघा ना. आपल्या या लाडक्या क्रिकेटपटूला अभिवादन करायचं म्हणून या पठ्ठयाने चक्क तमीळनाडूमधल्या कुद्दालोर जिल्ह्यातल्या अरंगूर जवळच्या गावातलं आपलं घरच धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच सीएसके या आयपीएल टीमच्या पिवळ्या रंगाने रंगवून टाकलंय. त्याबरोबरच त्याने पोन सेल्वारसू या चित्रकला शिक्षकांना बोलवून धोनी, चेन्नई सुपर किंग्जचा लोगो ही चित्रं काढून घेतली. सीएसकेने आपल्या ट्वीटरवर या घराची छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत.

दुबईहून परतलेला गोपीकृष्णन सांगतो, सध्या धोनीचं आणि त्याच्या टीमचं फारसं बरं चाललेलं नसल्यामुळे त्याच्याबद्दल लोक सारखे नकारात्मक बोलत असतात. माझे मित्रही त्याच्यावर सारखी टीका करतात. मला ते अजिबात सहन होत नाही. कारण माझ्यासाठी धोनी हा धोनी आहे. हे इतरांना कळावं यासाठी मी माझं घर चेन्नई सुपर किंग्जच्या रंगात रंगवायचं ठरवलं. त्यासाठी मी निप्पॉन पेंट वापरला कारण ते सीएसकेच्या प्रायोजकांपैकी एक आहेत. हे घर सीएसकेच्या खऱ्याखुऱ्या चाहत्याचं घर वाटावं यासाठी मी दर्शनी भागात धोनीचं चित्र काढून घेतलं. त्यासाठी चित्रकार बोलावला. या रंगावर मी दीड लाख रुपये खर्च केले आहेत.

धोनीचं चित्र काढणारे पोन सेल्वराजू सांगतात, मी स्ट्रोक मॉडेल पद्धतीने काढलेलं धोनीचं चित्र लोकांना लांबूनही स्पष्ट दिसू शकेल. हे चित्र पूर्ण करायला मला तीन दिवस लागले. मी चित्राचं मानधन म्हणून फार पैसे आकारले नाहीत कारण गोपीकृष्णनच धोनीप्रेम मला माहीत आहे आणि मीही धोनीचा, सीएसकेचा चाहता आहे. गोपीकृष्णनच्या या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाल्यानंतर आता मला जगभरातून धोनीच्या चाहत्यांचे इतके फोन येत आहेत की माझ्या श्रमांचं चीज झालं आहे असं मला वाटतं.

धोनीप्रेमात रंगलेल्या गोपीकृष्णनच्या या घराची माहिती समाजमाध्यमांमधून पसरल्यापासून घर बघण्यासाठी चाहत्यांची रीघ लागली आहे. गोपीकृष्णन सांगतो, गेल्या तीन दिवसात ५०० हून जास्त लोक येऊन गेले आहेत. लोक घरासमोर, धोनीच्या चित्रासमोर उभं राहून सेल्फी काढतात. घराच्या दर्शनी भागातच धोनीचं इतकं मोठं चित्र बघून थरारून गेलो असं सांगतात. धोनीवर टीका करणाऱ्यांना आता तरी आम्हा चाहत्यांच्या दृष्टीने असलेलं त्याचं महत्त्व कळेल. आणि ते धोनीबद्दल चांगलं बोलतील. इंडियन एक्स्प्रेसच्या जनार्दन कौशिक यांनी हे वृत्त दिलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिकेटरसिकांना स्टेडियमवर जाऊन मॅच बघायची परवानगी नाही. अन्यथा गोपीकृष्णनला दुबईत थांबून सीएसकेच्या सगळ्या मॅचेस बघायची इच्छा होती. त्याचा हा आवडता संघ पुन्हा एकदा उसळी मारून वर येईल आणि धोनी पुन्हा एकदा आयपीएल विजेत्याचा चषक उंचावताना दिसेल याची त्याला खात्री आहे.