-सॅबी परेरा

एकत्र येण्यासाठी आणि पुढील आयुष्य एकमेकांसोबत जगण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये केवळ प्रेम असणे पुरेसे आहे काय? असेलही कदाचित किंवा नसेलही, पण ‘Is Love Enough?’ या प्रश्नापुढे “SIR’ हा शब्द तोही कॅपिटल मधे जोडला जातो तेव्हा हा प्रश्न ज्याला पडलाय ती व्यक्ती आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचं दायित्व ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती या दोघी दोन वेगळ्या सामाजिक / आर्थिक / वैचारिक प्रतलावर राहणाऱ्या आहेत हे लक्षात घ्यावं लागतं आणि मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वाटतं तितकं साधं, सोपं, सरळ नाहीये हे ध्यानात येतं. प्रेम आंधळं असतं, त्यामुळे प्रेमात पुरेपूर बुडालेल्या व्यक्तीला Is Love Enough? असा प्रश्न पडणे (ठेचकाळून त्याचे किंवा तिचे डोळे उघडेपर्यंत तरी) शक्य नाही. प्रेमाच्या डोहात गटांगळ्या खातानाही वास्तवाची दोरी हातात घट्ट पकडून ठेवणाऱ्या प्रॅक्टिकल व्यक्तीलाच हा प्रश्न पडू शकतो. . . Is Love Enough? SIR!

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

एका सर्वसुखसोयी संपन्न घरात राहणाऱ्या मालकाच्या आणि त्याच घरात घरगडी, स्वयंपाकी, ड्रायव्हर इत्यादी नात्याने राहणाऱ्या नोकर वर्गाच्या गरजा, आवडीनिवडी, आचारविचार, जीवनाचे प्राधान्यक्रम वेगळे असतात आणि ते साहजिकही आहे. ज्यांच्यावर आपले प्रेम आहे त्यांना जगविण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्यापासून दूर कुणाच्या तरी घरच्या नोकरीवर अवलंबून असलेला वर्ग एकीकडे आहे. दुसरीकडे, कुणीतरी वेळच्यावेळी वाढलेली गरमागरम रोटी, धुऊन इस्त्री केलेला कपडा आणि टापटीप ठेवलेलं मकान ह्या आपल्या गरजा समजून घेतंय आणि वेळच्यावेळी त्या पूर्ण करतंय म्हणून त्यांच्यावर अवलंबून असलेला वर्ग आहे. तसं पाहिलं तर हा मालक आणि नोकर ह्यांच्यातला कोरडा व्यवहार आहे. पण या साध्या सरळ व्यवहारात हाडामांसाचा आणि विशेष म्हणजे हृदय असलेला माणूस नावाचा प्राणी सामील असल्याने तो बऱ्याचदा व्यवहाराची लक्ष्मणरेषा ओलांडून पुढे जातो. मग कोरड्या व्यवहाराचा चिखल होतो, सरळ धाग्यांचा गुंता होतो.

घरकाम करणारी मोलकरीण बाई (Maid) आणि त्या घराचा मालक या दोघांतील नातेसंबंधावर आधारित नेटफ्लिक्सवर “Is Love enough? SIR” नावाचा चांगला सिनेमा आहे, हे मी ऐकून होतो. “नातेसंबंध” या शब्दाच्या चादरीखाली ओटीटी वाले जे काही दाखवितात त्याचा श्वास गुदमरवणारा, घामाघूम करणारा, दीर्घ धक्केदायक अनुभव असल्याने हा सिनेमा सहकुटुंब पाहण्याचा धोका मी पत्करला नाही. पण या सिनेमाने “तसलं” काहीही न दाखवता सुखदाश्चर्याचा धक्का दिला.

अमेरिकेत लेखक म्हणून करियर करणारा अश्विन, भावाच्या अचानक मृत्यूमुळे आपल्या कुटुंबाचा कन्स्ट्रक्शन बिझनेस सांभाळण्यासाठी भारतात परतलेलाय. आतापर्यंत तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत होता. नुकतंच त्याचं ब्रेकअप झालंय, गर्लफ्रेंड सोडून गेलीय. आता त्या प्रशस्त फ्लॅटमध्ये राहताहेत अश्विन आणि घरकाम सांभाळणारी रत्ना. अश्विन हा श्रीमंत आहे, देखणा आहे, सुसंस्कृत आहे, भावनाप्रधान आहे. तर महाराष्ट्राच्या कुठल्याशा गावात वयाच्या एकोणिसाव्या वर्षी विधवा झालेली रत्ना आपल्या कुटुंबाला आपला भार होऊ नये आणि आपल्या बहिणीला शिक्षण घेता यावे म्हणून चार पैसे कमविण्यासाठी मुंबईत अश्विनच्या घरी घरकाम करतेय. आणि हो, जमलं तर तिला आपलं फॅशन डिझायनर होण्याचं स्वप्नंही पूर्ण करायचंय.

आपल्या मालकाला खायला, प्यायला, कधी काय हवंय, काय नकोय हे समजण्याचं व्यवसायदत्त शहाणपण रत्नाकडे आहे. आणि आपल्या मोलकरणीला सन्मानाने वागणूक देण्याची, तिच्या प्राधान्यक्रमाची चौकशी करण्याची आणि तिचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी निस्वार्थी हात देण्याची दानत अश्विनकडे आहे. या परस्परपूरक स्वभावामुळे दोघांना एकमेकांची एकप्रकारची सवय (किंवा ज्याला कंडीशनींग म्हणता येईल) झाली आहे.

सिनेमात, अश्विन आणि रत्ना या दोघांत घडणारे प्रसंग आणि संवाद अगदी कोणत्याही मालक आणि घरकामवाल्या व्यक्तीत होतील इतकेच सहज आणि नाममात्र आहेत. त्यामुळे वरवर पाहता त्यांचं हे नातं ठळकपणे समोर येत नाही असं वाटू शकतं. सिनेमात दाखविलेल्या प्रसंगांतून अश्विन आणि रत्ना या दोघांची एक्मेकांतली भावनिक गुंतवणूक दिसत नाही किंवा संवादातून फुलणारं प्रेमही आपल्या कानांना ऐकू येत नाही असंही आपल्याला वाटू शकतं. मात्र, त्या दोघांना एकमेकांबद्दल खोलवर, अगदी आतून काहीतरी वाटतेय हे नक्की! हे वाटणं त्यांनाही जाणवतं अन आपल्यालाही जाणवतं. पण त्यांना एकमेकांबद्दल जे काही वाटते ती कणव आहे, सहानुभूती आहे, नुसतीच परस्परांची सवय आहे कि प्रेम आहे हे आपल्याला नक्की ठरवता येत नाही. कारण यातली कोणती भावना कुठे सुरु होते आणि कुठे संपते, हे ठरवणारा तुमचा माझा प्रत्येकाचा लिटमस पेपर वेगळा असतो.

रत्ना भावनिकरीत्या जरी अश्विनकडे झुकलेली असली तरी हृदयापेक्षा डोक्याने विचार करणारी असल्याने तिने वास्तवाचा हात कधीच सोडलेला नाहीये. अश्विनचं आणि आपलं विश्व वेगळं आहे आणि ती दोन्ही विश्व समांतर जात असल्याने एकमेकांना भेटण्याची, एकजीव होण्याची अजिबात शक्यता नाहीये हे रत्नाला पुरतं ठाऊक आहे. “लाईफ कभी खतम नही होती” हे तिचं वाक्य तिचा जीवनविषयक दृष्टीकोन अधोरेखित करते. आपल्या सो-कॉल्ड प्रेमाचे, त्यातून उद्भवणाऱ्या नात्याचे कौटुंबिक, सामाजिक परिणाम काय होतील ह्याची तिला स्पष्ट कल्पना आहे. म्हणूनच त्या दोघांतील एकमेव नाजूक क्षणी ‘मला तुझी रखेल बनण्यात इंटरेस्ट नाही’ असं ती ठासून सांगू शकते.

याउलट अश्विनला आपल्या या नात्याच्या भविष्यातील परिणामाची तमा नाही. तमा नाही म्हणण्यापेक्षा त्याने परिणामांचा विचारच केलेला नाहीये. मुळातच संवेदनशील असलेला अश्विन ब्रेकअप नंतर अधिकच हळवा झालाय आणि रत्नाला शिलाई मशिन देऊन, पार्टीच्या वेळी जाहीरपणे तिची बाजू घेऊन, तिच्या बहिणीच्या लग्नासाठी मदत करून, “सबको सपने देखनेका हक है” अशी तिच्या स्वप्नांना हवा देऊन अश्विन आपल्या प्रत्येक कृतीतून आपल्यापुरती प्रेम करण्याची गरज भागवून घेत आहे.

जोवर रत्ना अश्विनची मेड आहे, जोवर घरकामासाठी त्याला तिची गरज आहे तोवर त्याने तिच्या गरजांची दखल घेणे हे आपल्या Employee ची काळजी घेणाऱ्या उत्तम Employer चं लक्षण असलं तरी रत्नाने आपल्या नात्याला नकार दिल्यानंतर, ती घर सोडून निघून गेल्यानंतर, स्वतः अश्विननेही देश सोडून अमेरिकेत जायचे नक्की केल्यानंतर त्याला तिच्या भवितव्याची, तिच्या स्वप्नांची काळजी करण्याची आणि त्यासाठी तजवीज करण्याची जरुरत नव्हती. तरीही तो ते करतो. आणि आपलं प्रेम हे खरं प्रेम होतं, उथळ व्यवहार किंवा त्या त्या वेळेची तात्पुरती शारीरिक-मानसिक गरज नव्हती हे ठसवतो.

एका सरळ रेषेत सांगितलेली गोष्ट, साधे-सोपे खऱ्या आयुष्यातील वाटावेत असे संवाद, फारसे ट्विस्ट आणि टर्न्स नसणारा, नाट्यमय प्रसंग नसणारा, संथ लयीत चालणारा असा हा सिनेमा आहे. रोहेना गेराचं संयत दिग्दर्शन, तिलोत्तमा शोमने समजून उमजून केलेली रत्नाची भूमिका, तिने मराठी संवादासाठी पकडलेला अचूक सूर, विवेक गोम्बरचा नैसर्गिक अभिनय, गीतांजली कुलकर्णी आणि इतरांनी दिलेली योग्य साथ यामुळे हा सिनेमा जरूर बघणेबल झाला आहे.

सॅबी परेरा