– शेफ यशोधन देशमुख

श्रावण म्हटलं की सगळीकडे निसर्गाची हिरवाई दिसते आणि मन कसं एकदम एकदम प्रसन्न होतं. याच श्रावणात भाजी मंडईमध्ये मुबलक प्रमाणात झालेले पालेभाज्यांचे आगमन म्हणजेच विविध जीवनसत्वांचा खजिनाच नाही का..!

माठ, मेथी, मुळा, आंबटचुका, पालक, शेपू अशा अनेक भाज्यांमधून आपल्याला विविध सूक्ष्म पोषक घटक म्हणजेच मायक्रोन्यूट्रिएन्ट्स मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध होतात. पण असं असलं तरी घरातल्या लहान मुलांनाच काय, अगदी मोठ्यांनाही पालेभाज्या खायला काही मनापासून आवडत नाही. पालेभाज्या म्हटलं की मुलं तर जरा जास्तच नाक मुरडतात. मग समस्त मातांसमोर एक गहन प्रश्न उभा राहतो की आता करायचे तरी काय? या मुलांसाठी बनवायचं तरी काय?

श्रावणातील भाज्यांचा समावेश कशा रीतीने आहारात करता येईल, हा एक लाखमोलाचा प्रश्न आहे. कारण मुलांच्या वाढीच्या काळात त्यांना पालेभाज्यांमधून मिळणा-या विविध जीवनसत्वांची निश्चितच गरज असते. म्हणूनच हा प्रश्न सोडवायचा मार्ग आपण आज शोधणार आहोत.

आजकाल मुलांना फास्ट फूड म्हणजेच पास्ता, पिझ्झा आणि रीसोटो (इटालियन खिचडी) यांसारखे पदार्थ खूपच आवडतात.

चला तर मग, आपल्या श्रावणातल्या या पौष्टिक भाज्यांपासून एक पौष्टिक रीसोटो बनवायला शिकूया.

लाल माठ आणि पालक रीसोटो

साहित्य

१ जुडी लाल माठ

१ जुडी पालक

१ वाटी इंद्रायणी अथवा आंबेमोहोर तांदूळ

२ चमचे बारीक चिरलेला लसूण

२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

१/२ काळीमिरी पूड

चवीनुसार मीठ

२ चमचे बटर

२ चमचे क्रीम

कृती

माठ आणि पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावेत.

कढईत बटर गरम करून त्यात लसूण मिरची टाकून मिनिटभर परतून घ्यावे.

आता त्यात चिरलेला माठ आणि पालक टाकून थोडेसे मीठ घालावे आणि २ मिनिटे परतून घ्यावे. आता त्यात १ वाटी तांदूळ टाकून मिनिटभर परतावं आणि अर्धी वाटी पाणी घालावं.

आता सारखे थोडे थोडे करून पाणी घालत रीसोटो शिजवावा. असे केल्याने रिसोटो राईस हलका आणि फुलण्यास मदत होते. साधारणपणे १५ ते १८ मिनटे शिजल्यानंतर त्यात काळीमिरी पूड मीठ आणि क्रीम घालून गरमागरम सर्व्ह करावे.