समीर जावळे, जळगाव

जळगावात महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील आणि आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात काँटे की टक्कर होईल अशी चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. जळगावचे भाजपाचे विद्यमान खासदार ए टी पाटील यांचे तिकीट कापण्यात आले. हे तिकीट स्मिता वाघ यांना दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले. यामुळे जळगाव भाजपात अंतर्गत बंडाळी माजली आहे. या वादाचा फायदा राष्ट्रवादीला होईल अशी चर्चा आहे. तर गिरीश महाजन यांनी तीन लाख मताधिक्याने जिंकून येऊ असा त्यामुळेच जळगाव लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित मानले जाते आहे.

जळगावातील सामान्य व्यापारी, सराफा व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली असता जळगावात चुरशीची लढत होईल असेच मत बहुतांश लोकांनी व्यक्त केले. रावेरमधे रक्षा खडसेंचा विजय निश्चित मानला जातो आहे. मात्र जळगावात काँटे की टक्कर रंगण्याची चिन्हं दिसत आहेत. वंचित बहुजन आघाडीने अंजली बाविस्कर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम होणार नाही अशीही चर्चा आहे. एकंदरीत जळगाव मतदारसंघाचा विचार केला तर जळगावात दुरंगी लढत होईल आणि भाजपाच्या अंतर्गत बंडाळ्यांमुळे निवडणूक चुरशीची होईल अशी चर्चा आहे.